युवा पिढीने शिवरायांचा आदर्श घेण्याची गरज
सुदर्शन शिंदे यांचे युवकांना आवाहन : मण्णूरमध्ये अवतरली शिवसृष्टी
वार्ताहर /हिंडलगा
‘आज प्रत्येकाच्या घरोघरी शिवरायांच्या प्रतिमा आणि पुतळे आहेत. प्रत्येक मराठी माणसाला शिवरायांचा अभिमान आहे. पण शिवरायांचे केवळ नाव न घेता त्यांचे विचार देखील आत्मसात केले पाहिजेत. तसेच आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवरायांनी दाखविलेल्या वाटेवर युवा पिढीने चालण्याची गरज निर्माण झाली आहे, असे मत युवा व्याख्याते सुदर्शन शिंदे यांनी व्यक्त केले. मण्णूर येथील हिंदवी स्वराज्य युवा संघटनेतर्फे सालाबादप्रमाणे आयोजित शिवजयंती 2024 निमित्त नुकतेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष तानाजी तरळे होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी मंडोळकर, अमोद मुचंडीकर, जयवंत बाळेकुंद्री, एल. के. कालकुंद्री, लक्ष्मण मंडोळकर, अशोक चौगुले, मल्लाप्पा चौगुले, किरण चौगुले, रमेश नाईक, प्रसाद मोरे, वैजनाथ चौगुले, संतोष केंचनावर, महेश चौगुले, महेश बाळेकुंद्री, अभिषेक काकतकर, संगीता पुजारी, तलाठी वीणा, जयश्री नाईक, रेखा तरळे, स्नेहल शहापूरकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. पुढे बोलताना शिंदे यांनी शिवरायांचा इतिहास आणि आज शिवरायांच्या विचारांची युवा पिढीला असलेली गरज यावर भाष्य केले.
आजच्या युवा पिढीने केवळ शिवरायांच्या नावाचा वापर न करता त्यांच्या विचाराचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन केले. व्याख्यानानंतर गावातील युवक व युवतीनी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करून आपल्या कलेचे दर्शन घडविले.कार्यक्रमाच्या निमित्ताने मण्णूरमध्ये शिवसृष्टी अवतरली होती. हिंदवी स्वराज्य युवा संघटना दरवर्षी शिवजयंतीचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करते. यावर्षीही संघटनेने सुदर्शन शिंदे यांचे शिवव्याख्यान आयोजित केले होते. सुदर्शन शिंदे यांच्या व्याख्यानाला लोकांनी जोरदार टाळ्यांनी दाद दिली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनावर आधारित सादर केलेल्या नृत्यांना गावकऱ्यांनी व उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष तानाजी तरळे, कार्यकारी मंडळ व कार्यकर्ते महिनाभर परिश्रम घेत होते. नागरिक व देणगीदारांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. सूत्रसंचालन सुजित मंडोळकर तर महेश काकतकर यांनी आभार मानले.