For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समाज, संस्कृती समृद्ध होण्यासाठी साहित्याची गरज

11:50 AM Jan 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
समाज  संस्कृती समृद्ध होण्यासाठी साहित्याची गरज
Advertisement

संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर : 40 वे कडोली मराठी साहित्य संमेलन उत्साहात

Advertisement

बेळगाव / कडोली : समाज, संस्कृती अन् साहित्याचं एक वेगळं नातं आहे. साहित्यामुळे समाजाला वेगळी दिशा मिळते, समाज, संस्कृती समृद्ध होण्यासाठी साहित्याची गरज आहे. मात्र, जेथे मूल्ये जपली जात नाहीत तेथे समाज आणि संस्कृतीचा ऱ्हास होतो. अशा परिस्थितीत भेदाच्या पलीकडे जाऊन समाज, संस्कृती आणि माणूस म्हणून जगायला शिकविणाऱ्या साहित्याची गरज भासते, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र) येथील साहित्यिक प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले. मराठी साहित्य संघ कडोली आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी कडोली येथील श्री दूरदुंडेश्वर विरक्त मठाच्या आवारात 40 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. डॉ. प्रल्हाद लुलेकर म्हणाले, माणसाला माणूस म्हणून घडविणे ही साहित्याची जबाबदारी आहे. साहित्याने डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, साहित्यिक, संशोधक, तज्ञ घडविले. मात्र, माणसाला माणूस म्हणून घडवायचं राहून गेलं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

महात्मा ज्योतीराव फुलेंकडून आलेला माणुसकीचा धर्म साहित्यात दिसतो. फुलेंनी शेतकऱ्यांसाठी वास्तववादी लेखन केले. त्यामध्ये शेतकऱ्यांचा आसूडचाही समावेश आहे. वारकरी संप्रदायालाही साहित्याची जोड मिळाली, हे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, संत मीराबाई अशा संतांचे साहित्य वाचल्यानंतर लक्षात येते. देशात एका बाजूला प्रचंड श्रीमंती  तर दुसऱ्या बाजूला दारिद्र्याच्या विषमतेमध्ये सर्वसामान्यांची घुसमट होते. छत्रपती शिवरायांचे कार्य मोठे असून त्यांनी स्वराज्य निर्माण केले. रयतेच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा पहिला राजा म्हणून त्यांची ओळख आहे. शिवराय हे केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीला आदर्श आहेत. डॉ. बाबासाहेब दलितांसाठी न जगता त्यांनी शेतकऱ्यांसाठीही मोठा लढा उभारला आहे. त्या काळी पाटबंधारे खात्याचा अभ्यास करून विजेचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला, असेही ते म्हणाले.

Advertisement

दुसऱ्या सत्रात काव्यतरंगचा कार्यक्रम रंगला

काव्यतरंगअंतर्गत स्थानिक कवींनी रंगत आणली. बाप, जुनं गाव, मराठी संस्कृती, स्मार्ट सिटी, जरा जगण्यासाठी अशा विविध कविता सादर करून वाहवा मिळविली. यावेळी गिरीधर गौंडाडकर यांनी ‘नेहमी झाडाखाली बॉयफ्रेंड भेटला गं बाई’ कविता सादर करून प्रेमाने भारावून जाणाऱ्या तरुणाईचे वास्तव मांडले. प्रा. मनीषा नाडगौडा यांनी ‘साथ मोबाईलची’ या कवितेतून मोबाईलचा वाढलेला अतिरेक आणि त्यामुळे समाजात घडत असलेल्या वाईट गोष्टी दाखवून दिल्या. किरण पाटील यांनी ‘ओरबाडणे’ या कवितेतून समाजात सत्ता, राजकारण आणि इतर विविध ठिकाणी ओरबाडण्याचे प्रकार सुरू असल्याचे दाखवून दिले. निळूभाऊ नार्वेकर यांनी ‘डोईवर पाटी’, अक्षता यळ्ळूरकर यांनी ‘नात्याच्या बाजारात’, रोशनी हुंद्रे यांनी ‘कालिकारुपी’, परशराम मोटराचे यांनी ‘सारं काही शक्य’, सुवर्णा पाटील यांनी ‘बाबाचे आनंदाश्रू’, मधू पाटील यांनी ‘माझा नातू वैरी नाही’, स्नेहल बर्डे यांनी ‘बाप’, अस्मिता अळतेकर यांनी ‘सुदीन’, सुधाकर गावडे यांनी ‘लिहिलं पाहिजेत’, सीमा कणबरकर यांनी जुनं गाव’, शिवाजी शिंदे यांनी ‘लाल रक्त’, अशोक सुतार यांनी ‘वांगे’, नितेश पाटील यांनी ‘मराठी संस्कृती’, चंद्रशेखर गायकवाड यांनी ‘स्मार्ट सिटी’, उमेश देसाई यांनी ‘बापच इथे वैरी’, बसवंत शहापूरकर यांनी ‘जरा जगण्यासाठी’ अशा कविता सादर केल्या.

ग्रंथदिंडीने संमेलनाला प्रारंभ : पाचही सत्रांतून समाजप्रबोधन  

संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. येथील ज्योतिर्लिंग मंदिराजवळ उज्वला उच्चूकर यांच्या हस्ते पालखी पूजन झाल्यानंतर ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. ढोलताशा आणि टाळमृदंगाच्या गजरात ग्रंथदिंडी भारावून गेली होती. प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, बहिणाबाई चौधरी, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले आदी थोर पुरुषांच्या वेशभूषा केल्या होत्या. झुंज ढोलताशा पथक, हिरकणी आणि शिवमुद्रा लेझीम पथक, कलमेश्वर भजनी मंडळ, कलमेश्वर वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ, ज्योतिर्लिंग महिला भजनी मंडळ, कस्तुरबा महिला मंडळ, संमेलनाध्यक्ष डॉ. प्रल्हाद लुलेकर, मान्यवर साहित्यिक, संघाचे कार्यकर्ते, मंडळांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटन समारंभ

स्वामी विवेकानंद नगरीत ग्रंथदिंडी आल्यानंतर कस्तुरबा महिला मंडळाच्या सुवासिनींनी आरती ओवाळून साहित्यिकांचे स्वागत केले. त्यानंतर मयूर वूडक्राफ्ट्स बेळगावचे श्रीकांत पाटील यांच्या हस्ते ग्रंथदालनाचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. कै. आनंद शट्टुप्पा चौगुले संमेलन मंडपाचे उद्घाटन प्रगतशील शेतकरी सुनील चौगुले यांच्या हस्ते झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन  निवृत्त अधिकारी मोहन पुरी यांच्या हस्ते, सरस्वती प्रतिमा पूजन सुधा भोसले यांच्या हस्ते, सावित्रबाई फुले प्रतिमा पूजन मुंबई पोलीस निरीक्षक सुभाष मॅगेरी यांच्या हस्ते, संत ज्ञानेश्वर प्रतिमा पूजन पशूवैद्य मारुती पंढरी यांच्या हस्ते, महात्मा जोतिबा फुले प्रतिमा पूजन कलमेश्वर कृषी अभिवृद्धी व्यवसाय संघाचे अध्यक्ष कल्लाप्पा देसाई यांच्या हस्ते, सांगाती व्यासपीठाचे उद्घाटन सांगाती सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत खोराटे यांच्या हस्ते झाले. सिव्हिल इंजिनिअर आणि गव्ह. कॉन्ट्रॅक्टर शिवाजी अतिवाडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून 40 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

साहित्यिक व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यानंतर साहित्य संघाचे अध्यक्ष भरमाण्णा डोंगरे यांनी प्रास्ताविकात गावचा इतिहास सांगितला. स्वागताध्यक्ष रणजीत गिंडे यांनी व्यासपीठावरील साहित्यिक, मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी संमेलनाचे उद्घाटक शिवाजी अतिवाडकर व प्रा. शशिकांत खोराटे यांची भाषणे झाली. यावेळी प्रायोजक म्हणून सहकार्य केलेले मराठा को-ऑप. बँक, जिजामाता महिला सहकारी बँक, नवहिंद को-ऑप. सोसायटी, सह्याद्री को-ऑप. सोसायटी, कलमेश्वर को-ऑप. सोसायटी, श्रीराम को-ऑप. सोसायटी, सांगाती पतसंस्था शिनोळी, तुकाराम सहकारी बँक, सांगाती महिला पतसंस्था शिनोळी, महेश पाटील (धनुका अॅग्रोटेक लि. बेंगळूर) आदी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. देवस्थान पंच कमिटी कडोलीच्या पदाधिकाऱ्यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संमेलनाचे सूत्रसंचालन सुधीर कुट्रे यांनी केले. आभार किरण होनगेकर यांनी मानले.

पुढील संमेलन 11 जानेवारी 2026 रोजी

41 वे कडोली मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 11 जानेवारी 2026 रोजी होणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

आधुनिक शेतीवर व्याख्यान : डॉ. संजीव माने

संमेलनाच्या शेवटच्या पाचव्या सत्रात सांगली येथील कृषिभूषण, कृषिरत्न डॉ.संजीव माने यांनी आधुनिक पद्धतीनुसार उसाचे उत्पादन आणि इतर पिकांचे उत्पादन कसे घेतले पाहिजे यावर बोलताना सांगितले की, आधुनिक पद्धतीने शेती करायची असेल तर प्रथमत: जमिनीची सुपिकता कशी करता येईल, यासाठी शेणखताची आवश्यकता आहे. मात्र, शेणखताची उपलब्धता कमी आहे. पर्याय म्हणून गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत वापरणे गरजेचे आहे. दुसरा पर्याय ऊस लागवड करण्याची पद्धत निवडणे गरजेचे आहे. त्यानंतर रासायनिक खतांचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे. भरमसाट रासायनिक खते घातली म्हणजे उसाचे उत्पादन निघत नाही, तर त्याचीही योग्य वेळी आणि योग्य मात्रा दिली पाहिजे. त्यानंतर पाण्याचे व्यवस्थापनही तितकेच महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. शेवटच्या पद्धतीत पीक संरक्षण कसे केले पाहिजे, अलीकडच्या काळात उसावर लोकरी मावासारखा रोग मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यावर योग्य वेळी औषध फवारणी केली तर एकरी उसाचे उत्पादन शंभरी गाठू शकते, असे सांगून आधुनिक शेतीचा प्रयोग करणे गरजेचे असल्याचे डॉ. माने यांनी सांगितले.

कथाकथन स्पर्धेचे बक्षीस वितरण-कथाकथन  

तिसऱ्या सत्रात साहित्य संघाच्यावतीने घेतलेल्या कथाकथन स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. शालेय गटात प्रथम वैभवी मोरे (बालवीर विद्यामंदिर, बेळगुंदी), द्वितीय मनाली बराटे (मराठी विद्यानिकेतन), तृतीय तेजस्विनी बेळगावकर तर उत्तेजनार्थ समृद्धी सांबरेकर व साईनाथ गुरव यांनी पटकावले. खुल्या गटात प्रथम समृद्धी पाटील (पिरनवाडी), द्वितीय अनुजा लोहार (निट्टूर, चंदगड) व तृतीय डॉ. चंद्रकांत आवरे (निपाणी) यांनी पटकावले. कथाकथनकार प्रा. संजय खोचारे यांनी ‘वादाड’ या कथेतून ग्रामीण भागातील एका वांड बैलावर आधारित कथा सादर केली. दुसऱ्या एका ‘वातोर’ कथेतून ग्रामीण भागातील महिलेभोवती फिरणारी गंभीर कथा सादर केली.

निमंत्रितांच्या कवितांनी आली रंगत

निमंत्रितांच्या कविसंमेलनामध्ये इचलकरंजीचे कवी प्रा. रोहीत शिंगे, पुण्याचे कवी अपूर्व राजपूत आणि मिरजेच्या कवयित्री डॉ. अनिता खेबुडकर यांनी सहभाग घेतला. तिन्ही कवींनी आपल्या कवितांचे सुंदर सादरीकरण करून रसिक श्रोत्यांना भरभरून हसविले. कवी अपूर्व राजपूत यांनी ‘चुंबळ’वर कविता सादर करून महिलांसाठी चुंबळ किती महत्त्वाची आहे हे सांगितले. प्रा. रोहीत शिंगे यांनी नवविवाहितेच्या भावना मनात कशा घर करतात यावर कविता सादर करून दाद मिळविली. अनिता खेबुडकर यांची ‘पेरणी’ ही कविता सर्वांना हवीहवीशी वाटणारी ठरली. रोहीत शिंगे यांनी सूत्रसंचालन केले.

Advertisement
Tags :

.