For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नावे यापूर्वीच दिलीय, कारवाई का नाही?

03:03 PM Nov 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
नावे यापूर्वीच दिलीय   कारवाई का नाही
Advertisement

पूजा नाईकच्या दाव्याने  पोलिसांच्या निक्रीयतेवर प्रश्नचिन्ह : विद्यमान मंत्रिमंडळातील तो मंत्री कोण? घोटाळ्याचे गूढ वाढले,अनेक खात्यांतील नोकऱ्यांसाठी 17 कोटी 68 लाखांचा व्यवहार

Advertisement

पणजी : राज्यभर गाजत असलेल्या कथित नोकऱ्यांसाठी रोकड घोटाळ्यातील सूत्रधार पूजा नाईक हिने पुन्हा एकदा एक घणाघाती दावा करीत नोकऱ्या घोटाळ्यातील संबंधित मंत्री आणि अधिकारी यांची नावे यापूर्वीच पोलिसांना दिली होती, असे सांगितले आहे. त्यामुळे जर नोकऱ्यांसाठी पैसे घेणाऱ्यांची नावे पूजा नाईकने पोलिसांना यापूर्वीच दिली होती तर मग कारवाई का केली नाही, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पूजा नाईक यांच्याद्वारे दोन अधिकरी नोकरीच्या या घोटाळ्यात करोडो ऊपये स्वीकारण्यात गुंतलेले असूनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने आता पोलिसांच्या निक्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

पूजा नाईक हिने सांगितले की, पैसे घेतलेल्या अधिकाऱ्यांची नावे पोलिसांना दिली होती, परंतु त्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. क्राईम ब्रँच पोलिसांकडे जबाब नोंदवताना पुन्हा एकदा मंत्री व अधिकाऱ्यांची नावे सांगितली आहेत. अधिकाऱ्यांची नावे आपली चौकशी करण्यात येत असलेल्या संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिलेली होती. जी नावे पोलिसांसमोर सांगितली होती, ती नावे पुन्हा एकदा क्राइम ब्रांचसमोर सांगितली आहेत, असेही पूजा नाईक हिने स्पष्ट केले आहे.

Advertisement

मंत्र्याचेही नाव उघड केले

ज्या मंत्र्याकडे हे पैसे पोहचले आहेत, त्या मंत्र्याचेही नाव क्राईम ब्रँचकडे उघड केलेले आहे. या मंत्र्यानेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख करून दिली होती, असाही दावा पूजा नाईक यांनी केला आहे. ज्या लोकांकडून नोकरी मिळवून देतो म्हणून रुपये स्वीकारले होते, ते लोक वैयक्तिकरित्या रुपयांसाठी आपल्याकडे तगादा लावत होते. त्यामुळे आपण ज्या नोकऱ्यांसाठी करोडो ऊपडे मंत्र्यापर्यंत पोहचवले ते परत मिळावेत, यासाठी प्रयत्न करीत होते.

गणेशचतुर्थीला मिळणार होती रोकड

ही रक्कम गेल्या गणेशचतुर्थीपर्यंत देण्याचे संबंधित मंत्र्याने व अधिकाऱ्यांनी मान्य केले होते. तरीही टाळाटाळ होत असल्याने अखेर नावे उघड करावी लागल्याचेही पूजा नाईक यांचे म्हणणे आहे.

तरीही अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जरी नोकरी घोटाळ्याचा तपास सखोलपणे केला जाईल, असे सांगितले असले तरी पूजा नाईक हिच्या दाव्यानुसार पोलिसांना यापूर्वीच मंत्र्याचे व अधिकाऱ्याचे नाव सांगूनही त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न आता लोकांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे विद्यमान मंत्रिमंडळातील संबंधित मंत्री कोण आणि या घोटाळ्यात गुंतलेल्या अधिकाऱ्यांची भूमिका काय होती, हे आता जनतेसमोर येणे गरजेचे बनले आहे.

सर्व खात्यातील नोकऱ्यांसाठी व्यवहार

नोकऱ्या मिळवून देण्यासाठी संबंधित मंत्र्याने अधिकाऱ्यांची ओळख करून दिली होती. या अधिकाऱ्यांमार्फतच नोकऱ्यांसाठी कोट्यावधी रुपये पुरविले जात होते. 630 नोकऱ्यांसाठी 17 कोटी 68 लाख ऊपये मंत्र्यांपर्यंत पोहच केलेले आहेत. या सर्व नोकऱ्या केवळ एका खात्यापुरत्या मर्यादित नसून, सर्व सरकारी खात्यातील नोकऱ्यांसाठी हा व्यवहार झाला होता, असा धक्कादायक खुलासा पूजा नाईक यांनी केला आहे.

नोकरी घोटाळ्याची पुन्हा चौकशी सुरू : मुख्यमंत्री

पूजा नाईक यांनी नोकरी घोटाळ्यात मंत्री आणि अधिकारी गुंतले असल्याचा दावा केल्याने या प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू केलेली आहे. पूजा नाईक यांनी ज्या लोकांची नावे घेतली आहेत, त्यांचीही चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. फोंड्यात घडलेल्या नोकरी घोटाळा तपासासाठी पूजा नाईक हिने नव्याने एफआयआर नोंद करावा. त्याचीही चौकशी करण्यात येईल. याबाबत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी या नोकऱ्या घोटाळ्याची चौकशी योग्य तऱ्हेने झाली नसल्याचे आपल्या कानावर घातले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सत्य समोर येणे गरजेचे : सुदिन ढवळीकर

पूजा नाईक यांनी केलेले आरोप गंभीर असले तरी या नोकऱ्या घोटाळ्यातील त्याही प्रमुख सूत्रधार आहेत. त्यामुळे स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी ती आरोप करत असू शकते. तरीही तिने केलेल्या आरोपांची क्राईम ब्रँचतर्फे चौकशी होणे गरजेचे आहे. नोकऱ्या घोटाळ्यात सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. नोकऱ्या मिळवून देण्यासाठी जो प्रकार फोंड्यात घडला आहे, त्याचा तपास पोलिसांनी योग्य तऱ्हेने केलेला नाही. पोलिस तपासात अनेक त्रुटी आहेत. लोकांमध्ये संशय बळावत आहे. त्यामुळे सत्य समोर येणे गरजेचे आहे, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

सरकार अस्तित्वात असल्याचे सिद्ध करा : सरदेसाई

हे आता स्पष्ट झाले आहे की गोवा पोलिसांकडून नोकरीसाठी रोख घोटाळ्याची चौकशी म्हणजे डोळेझाक आहे. आरोपी पूजा नाईक हिने वर्षभरापूर्वी नावे उघड केली, तरीही ती नावे आरोपपत्रातून गायब आहेत. एका कॅबिनेट मंत्र्यानेही फोंडा पोलिसांची चौकशी सदोष असल्याचे मान्य केले. भाजप सरकार नोकऱ्या विकून गोव्याचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे. गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचेही मौन आहे. त्यामुळे डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेच्या प्रश्नावर बोलून आणि प्रत्यक्ष कृती करुन दाखवावे की, गोव्यात अजूनही सरकार अस्तित्वात आहे, असे गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी सामाजिक माध्यमावरून म्हटले.

Advertisement
Tags :

.