‘राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार’ पक्षाचे नाव; शरद पवार गटाला मिळणार नवे चिन्ह
►वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निवडणूक आयोगाने मंगळवारी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे स्वत:च्या निर्णयात स्पष्ट केले होते. आयोगाच्या या निर्णयानंतर बुधवारी शरद पवार यांनी नव्या पक्षासाठी तीन नावे आणि निवडणूक चिन्हाचा प्रस्ताव मांडला होता. शरद पवार गटाला आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ हे नाव आयोगाकडून मंजूर करण्यात आले आहे.
शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार ही तीन नावे आयोगासमोर मांडण्यात आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे हातून गेल्यावर शरद पवारांचा गट ‘कपबशी’ हे निवडणूक चिन्ह स्वीकारू शकते. कपबशीसोबत सूर्यफूल आणि उगवत्या सूर्याला स्वत:चे निवडणूक चिन्ह म्हणून स्वीकारण्याचा प्रस्ताव त्यांच्या गटाने ठेवला आहे. आयोगाने शरद पवार गटाला नव्या पक्षाचे नाव आणि चिन्ह निश्चित करण्यासाठी पर्याय सुचविण्याकरता बुधवारी संध्याकाळपर्यंतची मुदत दिली होती. ही मुदत पाळली गेली नसती तर शरद पवार गटाच्या उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली असती.
निवडणूक आयोगाने मंगळवारी अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय जाहीर केला होता. आयोगाने पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला प्रदान केले आहे. निवडणूक आयोगाने 6 महिन्यांपर्यंत चाललेल्या सुनावणीनंतर हा निर्णय दिला होता. आमदारांच्या संख्येच्या बहुमतामुळे अजित पवार गटाच्या बाजूने हा निर्णय दिला गेला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून कॅविएट
सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) कॅविएट दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वकील अभिकल्प प्रताप सिंह यांनी ही याचिका दाखल केली आहे. जर दुसरा गट (शरद पवार गट) सर्वोच्च न्यायालयासमोर स्वत:ची भूमिका मांडत असेल तर अजित पवार गटाच्या विरोधात कुठलाही एकतर्फी आदेश दिला जाऊ नये याकरता ही कॅविएट दाखल करण्यात आली आहे.