भाजपच्या नवीन अध्यक्षाचे कोडे सुटणार
भाजपचा नवीन अध्यक्ष कोण होणार? हे एक मोठे कोडेच झालेले आहे. राजधानीच्या राजकीय वर्तुळात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे नाव सध्या फार पुढे आहे म्हणतात. मनोहरलाल खट्टर, प्रल्हाद जोशी, धर्मेंद्र प्रधान हे देखील रेसमध्ये आहेत असे मानले जाते. पक्षामधील ताज्या चर्चेनुसार मात्र सध्याचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा उत्तराधिकारी हा महिला वर्गातील असावा असेही सुरु आहे. असे झाले तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आंध्र प्रदेशच्या माजी प्रदेश अध्यक्ष डी पुरंदरेश्वरी आणि तामिळनाडूच्या विनती श्रीनिवासन यांची नावे घेतली जात आहेत. या साऱ्या दक्षिणेतील आहेत.
1980 साली स्थापन झालेल्या भाजपमध्ये अजून महिला अध्यक्ष झालेली नाही. ज्या साऱ्या जणांची नावे चर्चेत आहेत, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळचे मानले जातात. त्यातील बरेचजण संघाशी जोडलेले आहेत. सीतारामन या पक्षात नव्या आहेत तशाच पुरंदरेश्वरीदेखील. यापैकी कोणीही भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर त्याचा अर्थ ते नड्डा यांच्यापेक्षा फारसे वेगळे नसणार. मोदी पंतप्रधान झाल्यापासून अमित शहा सोडले तर कोणताही तालेवार नेता भाजपचा प्रमुख झालेला नाही/ बनवला गेलेला नाही. मोदी-शहा यांच्या मर्जीने पक्ष चालावा यासाठी असे करण्यात आले.
जगातील सर्वात मोठा पक्ष असला तरी भाजपच्या अंतर्गत काय चालले आहे हे फारसे कोणाला माहित नसते. भाजपच्या अंतस्थ गोटातील माहिती केवळ दोघांनाच माहित आणि ते दोघे कोण हे साऱ्या जगाला माहित आहे. हे दोघेजणच पक्षातील अंतस्थ गोट आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संमतीविना भाजपचा अध्यक्ष बनत नसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व असूनही भाजपला गेल्या लोकसभा निवडणुकीत बहुमत न मिळाल्याने संघ सध्या जास्त सक्रिय झाला आहे असे सांगण्यात येते. संघाच्या प्रतिनिधी सभेची बैठक सध्या राजधानीत सुरु आहे. शहा यांनी पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलताना संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी नवा अध्यक्ष नेमला जाईल, असे सांगितले असल्याची चर्चा सगळीकडे आहे.
याचा अर्थ येत्या पंधरवड्यात नड्डा यांचा उत्तराधिकारी नेमला जाईल असा होतो. भाजपच्या इतिहासातील न•ा यांची अध्यक्षीय कारकीर्द सगळ्यात मोठी आहे. पक्षअध्यक्षाचा कालावधी केवळ तीन वर्षे असतो पण लोकसभेसह विविध निवडणुका आल्याने न•ा यांचा कार्यकाळ जवळजवळ 6 वर्षाचा झाला. नड्डा हे भाजपच्या संघटनेतील फारसे थोर नेते नव्हेत पण मोदींचा वरदहस्त लाभल्याने त्यांची बल्लेबल्ले झाली. भाजप अंतर्गत काय राजकारण चालले हे फारसे बाहेर समजत नसले तरी नड्डा यांचा उत्तराधिकारी निवडताना 13 महिन्यांचा कालावधी उलटल्याने कोणा कोणाचा घाम निघाला हे दिसून येत आहे.
विविध राज्यांमध्ये ज्या पद्धतीने भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नेमणूकांची लगबग सुरु झालेली आहे त्याचा अर्थ राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा याबाबतचे गहन कोडे सोडवले गेलेले आहे/ सुटण्याच्या मार्गावर आहे, असे दिसते आहे. एक सोंगटी बसली तर इतर सोंगट्या आपसूक बसतील. भूपेंद्र यादव बनोत अथवा इतर कोणीही भाजप अध्यक्ष बनो तो पंतप्रधानांच्या विश्वासातीलच असणार हे मानले जाते. नवीन नेमणूकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्णपणे होकार असेल तरच हे शक्य आहे. आणि याबाबतच उलटसुलट तर्क लावले जात आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून भाजप आणि संघामध्ये सारे काही आलबेल नाही असे चित्र दिसत असल्यानेच नवीन भाजप अध्यक्षाची निवड एव्हढी लांबली आहे हे आता राजकीय वर्तुळात फारसे गुपित राहिलेले नाही.
2/3 महिन्यांपूर्वी पंतप्रधानांनी नागपूरच्या संघ मुख्यालयाला दिलेली भेट म्हणजे ‘कहींपे निगाहें, कहींपे निशाना’ अशा प्रकारची होती. आपण संघाच्या शब्दाबाहेर नाही असे भासवण्यासाठी पंतप्रधान झाल्यापासून मोदी पहिल्यांदाच मुख्यालयाला भेट द्यायला गेलेले होते. मोदी पंतप्रधान झाल्यापासून वनवासात पाठवले गेलेले संघ नेते संजय जोशी हे अलीकडील काळात खूप सक्रिय असल्याचे दिसले. पक्षातील लहानथोर बरीच मंडळी त्यांना भेटताना दिसली. पूर्वी अशा भेटी गुपचूपपणे व्हायच्या पण आता तसे नाही. तात्पर्य काय तर वेगवेगळ्या बाजूने वेगवेगळे सिग्नल्स दिले जात आहेत. उत्तर प्रदेशात भाजप कोणाला प्रदेशाध्यक्ष बनवत आहे यावर खास लक्ष ठेवले जात आहे. योगी आदित्यनाथ यांची नाराजी सहन करावी लागल्याने भाजपला लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात जबर फटका बसला होता. आता योगींच्या मनात काय आहे हे प्रदेशाध्यक्ष बनवण्याच्या राजकारणावरून स्पष्ट होईल. योगी आणि अमित शहा यांच्यात बराच काळ शीतयुद्ध सुरु आहे, ही गोष्ट लपून राहिलेली नाही. उत्तरप्रदेशात पक्ष अध्यक्षाबाबत रणकंदन सुरु असल्याने राष्ट्रीय अध्यक्षाची निवड झाल्यावर तेथील निवड होऊ शकते.
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या तीन टर्म झालेल्या ममता बॅनर्जी यांना कडवा मुकाबला देण्यासाठी भाजपने नवीन रणनीती आखलेली दिसत आहे. समक भट्टाचार्य या 61 वर्षाच्या संघ तालमीत मोठ्या झालेल्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष बनवून एक नवा डाव खेळला जात आहे. गमतीची गोष्ट अशी की समकबाबूनी मुस्लिम समाजाला देखील राजकीयदृष्ट्या नवीन विचार करावा असे आवाहन करणे सुरु केलेले आहे. बंगालमध्ये मुस्लिम समाज 30 टक्के आहे आणि त्याच्या भरघोस पाठिंब्याने ममतादीदी सत्ता हस्तगत करतात. त्याला सुरुंग लावायचा प्रयत्न सुरु झाला आहे.
नड्डा यांचे उत्तराधिकारी होण्यासाठी केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान देखील उत्सुक आहेत असे बोलले जाते. पण शिवराज हे कोणाच्या ऐकण्यातील नेते नव्हेत हे देखील तितकेच खरे. मोदी पंतप्रधान बनण्यापूर्वी लालकृष्ण अडवाणी यांनी शिवराज हे ‘पीएम मटेरियल’ आहेत असे सांगितले होते. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद आले असून त्याद्वारे राज्यातील राजकारण मुख्यमंत्र्यांच्या मर्जीनेच चालणार असा संदेश गेलेला आहे. भाजप नेतृत्व आणि संघामध्ये दिलजमाई झाली का? आणि कशी? याबाबत तर्कवितर्कच जास्त लढवले जात आहेत. त्यामुळे भाजप जाणकारांतील एका गटाला नजीकच्या भविष्यकाळात न•ा यांचा उत्तराधिकारी कितपत नेमला जाणार याबाबतच दाट शंका आहे. पण असे काही असते तर राज्यातील भाजप अध्यक्षांच्या निवडणुकीचा घाटच घातला गेला नसता असे इतर म्हणत आहेत. तात्पर्य काय तर तडजोडी झालेल्या आहेत/होत आहेत.
पण जर का भाजप अध्यक्ष या महिन्यात नेमला गेला तर त्यानंतर पक्षाच्या काही मुख्यमंत्र्यांना नारळ मिळणार अशी जोरदार चर्चा सुरु झालेली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी दिल्लीचे दौरे वाढवले आहेत. तर उत्तराखंड, ओडिशाचे मुख्यमंत्री गॅसवर आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव देखील अस्वस्थ दिसत आहेत. या संधीचा फायदा घेऊन उत्तर प्रदेशात मंत्रीमंडळात फेरबदल करायचा योगी यांचा बेत आहे, असे बोलले जाते. योगी यांना काहीही करून आपल्या विश्वासू माणसाला प्रदेशाध्यक्ष बनवावयाचे आहे तर दुसरीकडे त्यांचे विरोधक हा बेत उधळवू पाहत आहेत. भाजपचा नवीन अध्यक्ष हा कोणी वजनदार नेता जरी बनला नाही तरी तो कोणाच्या हातचे बाहुले देखील होणार नाही, अशी चर्चा पक्षात ऐकावयास मिळते. याला कारण सावध झालेला संघ त्याच्या कामाकडे बारीक नजरेने बघणार आहे असं दिसत आहे.
सुनील गाताडे