For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धर्माचे रहस्य

06:22 AM Sep 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
धर्माचे रहस्य
Advertisement

श्रीमद भागवतमध्ये सांगितले आहे (भा 6.3.19) धर्मं तु साक्षाद्भगवत्प्रणीत अर्थात ‘साक्षात पूर्ण पुऊषोत्तम भगवंतानीच धर्माची वास्तविक तत्त्वे अथवा धर्माचे प्रामाणिक नियम निर्माण केले आहेत’. परंतु ह्याचे आकलन होणे सर्वसामान्य व्यक्तींना सहजासहजी शक्मय नाही. यासाठी महाभारतमध्ये धर्मराज युधिष्ठीर महाराज सांगतात, धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायाम् महाजनोयेन गत: स पन्था:  अर्थात ‘धर्मातील तत्त्वे अतिशय रहस्यमय आहेत, यासाठी महाजन म्हणजे हरिभक्त ज्या मार्गाने गेले त्या मार्गावरच चालावे’.

Advertisement

संत तुकाराम हे असे हरिभक्त महाजन आहेत ते धर्माचे गूढ रहस्य समजावताना सांगतात, तीळ जाळिले तांदूळ । काम क्रोध तैसेचि खळ ।। 1 ।।  कारे सिणलासी वाउगा । न भजता पांडुरंगा ।। 2 ।। मान दंभ पोटासाठी । केली अक्षरांची आटी ।। 3 ।।   तप कऊनि तीर्थाटन । वाढविला अभिमान ।। 4।। वाटिले ते धन । केली अहंता जतन ।। 5 ।। तुका म्हणे चुकले वर्म । केला अवघाचि अधर्म ।।6।। अर्थात ‘मनातील काम क्रोध इत्यादी षड्विकार आहेत ते तसेच राहिले तर यज्ञामध्ये तीळ तांदूळ इत्यादी सामुग्री अर्पण करून काय उपयोग? पांडुरंगाची भक्ती न करता उगीच व्यर्थ कष्ट का करतो? केवळ मानसन्मान मिळावा, पोट भरावे म्हणून ग्रंथांचे वाचन केले, तीर्थयात्रा करून, तपस्या करून अहंकार वाढविला, दानधर्म करून धन वाटले पण मी दानशूर आहे हा अहंकार जतन केला तर तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगाची भक्ती करणे हे धर्माचे वर्म आहे हे न समजता धर्माच्या नावानी अधर्म केला असे जाणावे.

श्रीमद् भागवतमध्ये सर्व धार्मिक क्रिया कशासाठी कराव्यात याचे वर्णन करताना सांगितले आहे. (भा 1.2.8) धर्म: स्वनुष्ठित: पुंसां विष्वक्सेनकथासु य: ।नोत्पादयेद्यदि रतिं श्र्रम एव हि केवलम् अर्थात ‘आपल्या स्थितीनुसार धर्माचरण अर्थात कर्तव्यकर्म किंवा विहित कर्म करूनदेखील भगवंतांच्या लीलाकथानामध्ये ऊची उत्पन्न होत नसेल तर असे धर्माचरण केवळ व्यर्थ श्र्रमच होत.’ आपण जे  काही यज्ञ करतो, तीर्थ यात्रा करतो, ग्रंथ वाचतो आणि त्याबद्दल बोलतो, दानधर्म करतो किंवा इतर तथाकथित धार्मिक कार्ये करतो त्यामुळे जर आपल्या हृदयातील षड्विकार म्हणजे काम, क्रोध, मद, लोभ, मोह आणि मत्सर जर नष्ट होत नसतील तर या सर्व क्रिया आपण केवळ धार्मिक असल्याचा अहंकार वाढवितात. धर्माचा मूळ उद्देश आहे भगवंतांना जाणून घेऊन त्यांची सेवा करणे, त्यांच्यावर प्रेम करावयास शिकणे आणि हे ज्ञान दुसऱ्यांनाही देणे. भगवान श्रीकृष्णाची भक्ती हे सर्व वेदिक शास्त्राचे वर्म सोप्या शब्दात सांगावयाचे तर उघड रहस्य आहे. स्वत: भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये हे रहस्य काय आहे हे सांगताना आज्ञा देतात की  (भ गी 18.65 ) मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुऊ । मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे अर्थात ‘सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस.’ म्हणून तुकाराम महाराज या अभंगात सांगत आहेत की हे सर्व समजून घेऊन गीता भागवतशास्त्राच्या आधारे आणि त्यांचे पालन करून स्वत:च्या उदाहरणावरून मार्गदर्शन करणाऱ्या शुद्ध भक्तांच्या आश्र्रयाखाली नम्रपणे पांडुरंगाची भक्ती न करता इतर कर्मकांड करणे हा धर्माच्या नावाखाली अहंकार जोपासण्यासाठी केलेला अधर्म  आहे.

Advertisement

आणखी एका अभंगात सांगतात युक्ताहार न लगे आणिक साधने । अल्प नारायणे दाखविले ।। 1 ।। कलियुगामाजी करावे कीर्तन । तेणे नारायण देईल भेटी  ।।2 ।। न लगे लौकिक सांडावा वेव्हार । घ्यावे वनांतर भस्म दंड ।। 3 ।।तुका म्हणे मज आणिक उपाव । दिसती ते वाव नामेंविण ।। 4 ।। अर्थात ‘कर्मकांडावर आधारित कोणतीही साधने या कलियुगात करण्याची गरज नाही, कारण नारायणाने म्हणजे भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये भक्तीचा सोपा मार्ग दाखविला आहे. कलियुगामध्ये निरंतर नामसंकीर्तन करावे त्यामुळे नारायणाची भेट होईल. त्यासाठी लौकिक व्यवहार सोडण्याची गरज नाही अथवा अंगावर भस्म लावून दंड घेऊन वनामध्ये जाण्याची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात हरिनाम संकीर्तन शिवाय मला इतर मार्ग कलियुगामध्ये व्यर्थ वाटतात.’

या संदर्भात भगवद्गीता आणि श्रीमद भागवतमध्ये अनेक प्रमाण आहेत.  भगवद्गीतेमध्ये स्वत: भगवान श्रीकृष्ण सांगतात (भ गी 9.14) सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता: । नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते अर्थात ‘हे महात्मेजन, सतत माझे कीर्तन करीत, दृढनिश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने माझी नित्य उपासना करतात.’ श्रीमद भागवतमध्येही वर्णन आहे, (भा 12.3.51) कलेर्दोषनिधे राजन्नस्ति ह्येको महान् गुण: ।कीर्तनादेव कृष्णस्य मुक्तसङ्ग: परं व्रजेत् हे राजन, कलियुग दोषांचा महासागर असूनही त्यात एक महान गुणही आहे. केवळ श्रीकृष्णाचे नामसंकीर्तन केल्याने मनुष्य भवबंधनातून मुक्त होऊन वैकुंठलोकाची प्राप्ती करू शकतो.’ (भा 12.3.52) कृते यद्ध्यायतो विष्णुं त्रेतायां यजतो मखै: । द्वापरे परिचर्यायां कलौ तद्धरिकीर्तनात्  अर्थात ‘सत्ययुगात श्री विष्णूचे ध्यान केल्यावर, त्रेतायुगात यज्ञाने त्यांचे पूजन केल्यावर आणि द्वापार युगात त्यांच्या चरणकमलांची सेवा केल्यावर जे फळ प्राप्त होते, ते कलियुगात केवळ हरिनाम संकीर्तनाने प्राप्त होऊ शकते. (भा 12.3.45) पुंसां कलिकृतान् दोषान् द्रव्यदेशात्मसम्भवान् । सर्वान् हरति चित्तस्थतो भगवान् पुऊषोत्तम: अर्थात कलियुगात वस्तू, स्थान आणि अगदी मनुष्यही दूषित आहेत, परंतु भगवंतावर मन स्थिर केल्यास ते सर्व अमंगळ दूर करतात.’ अशी अनेक प्रमाणे वेदिक शास्त्रामध्ये दिलेली आहेत म्हणून तुकाराम महाराजही सांगतात की मलाही हरिनाम संकीर्तनाशिवाय दुसरा कोणताही सोपा उपाय भगवद्प्राप्तीसाठी कलियुगामध्ये दिसत नाही, हे बुद्धिमान लोकांनी निश्चितपणे जाणले पाहिजे.

याचसाठी कलियुगामध्ये धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हरिभक्त प्रयत्नशील असतात. तुकाराम महाराज याबद्दल सांगतात,  धर्म रक्षावयासाठी । करणे आटी आम्हांसी ।।1।। वाचा बोलो वेदनीती । करू संती केले ते ।।2।। न बाणतां स्थिती अंगी । कर्म त्यागी तो ।।3।। तुका म्हणे अधम त्यासी । भक्ती दूषी हरीची ।।4।। अर्थात  ‘धर्माचे रक्षण करण्याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही वेदांमधील उपदेश लोकांना सांगू आणि पूर्वी संतांनी भागवत धर्माचे जसे आचरण केले तसे आम्ही आचरण करू. हरिभक्तीचे गुण ज्यांनी आत्मसात केले नाहीत आणि आपले विहित कर्म जो सोडून देतो तो लबाड आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जो अधम आहे तो हरिभक्तीला दोष देतो.”

भागवतमध्ये सांगितले आहे. (भा 6.3.22) एतावानेव लोकेऽस्मिन् पुंसां धर्म: पर: स्मृत: । भक्तियोगो भगवति तन्नामग्रहणादिभि: अर्थात ‘मानव समाजातील सर्व जीवांसाठी परम श्रेष्ठ धर्मतत्त्व म्हणजे भगवंताच्या नामग्रहणाने आरंभ होणारी त्यांची भक्तिमय सेवा होय ‘ह्याच भागवत धर्माचे शुद्ध हरिभक्त पालन करतात. प्रत्यक्ष भगवंतापासून चालत आलेल्या संप्रदायातील गुऊ-शिष्य परंपरेमधील शुद्ध हरिभक्त जो या भक्तितत्त्वाचे आपल्या जीवनात तंतोतंत पालन करीत आहे आणि ज्याचे जीवन हरिभक्ती परायण आहे त्याच्याकडूनच धर्मतत्त्वाचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. धर्माचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे म्हणून धर्म काय हे प्रथम समजून घेतले पाहिजे. धर्माचे रक्षण हे वर वर्णन केलेल्या धर्मतत्त्वाचे पालन केल्याने होत असते. यासाठी प्रत्येकाने  प्रयत्नशील असले पाहिजे.

- वृंदावनदास

Advertisement
Tags :

.