For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विद्यार्थिनीची हत्या...कोणाच्या पथ्यावर?

06:30 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
विद्यार्थिनीची हत्या   कोणाच्या पथ्यावर
Advertisement

कर्नाटकात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून अलीकडेच हुबळीत झालेल्या कॉलेज विद्यार्थीनीच्या हत्त्येचा मुद्दा राजकीय पटलावर चांगलाच तापू लागला आहे. बाहेरही उकाडा असह्या होत असून निवडणुकीत प्रचार करणाऱ्यांची चांगलीच दमछाक उडताना दिसते आहे. हुबळीतील विद्यार्थीनीच्या हत्त्येचा मुद्दा तापवत ठेवत याचा फायदा लोकसभा निवडणुकीत उठवण्याचा भाजपाने चंग बांधल्याचे दिसत आहे. कर्नाटकात लोकसभा निवडणुकीत धामधूम सुरू आहे. सत्ताधारी काँग्रेस व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजप-निजद युतीमध्ये सत्तासंघर्ष रंगला आहे. ऐन निवडणुकीत हुबळी येथील बीव्हीबी कॉलेजची विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हिची भीषण हत्या झाली आहे. विद्यार्थिनीच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. नेहाचा वर्गमित्र फय्याजला अटक झाली आहे. सरकारने या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपविली आहे. हुबळी पोलिसांकडून सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण आपल्या ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी फय्याज हा बेळगाव जिल्ह्यातील मुनवळ्ळीचा. त्याचे आईवडील दोघेही शिक्षक. कौटुंबिक कारणामुळे ते दोघे अलिप्त राहतात. फय्याज आपल्या आई व बहिणीसोबत रहात होता. नेहाची हत्या म्हणजे लव जिहादचाच प्रकार आहे, असा उघड आरोप केला जात आहे. हे प्रकरण हाताळण्यात सुरुवातीपासूनच सरकारला अपयश आले की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Advertisement

नेहाची हत्या कॉलेज कॅम्पसमध्ये झाली आहे. त्याचे व्हिडिओ फुटेज सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये घुसून जर विद्यार्थिनींच्या हत्या होत असतील तर यापुढे आम्ही कॉलेजला जायचे तरी कसे? असा प्रश्न राज्यभरातील वेगवेगळ्या कॉलेजच्या विद्यार्थिनी उपस्थित करू लागल्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नेहाला न्याय द्या, या मागणीसाठी संपूर्ण राज्यात आंदोलन सुरू केले आहे. भाजपही आंदोलनात मागे पडला नाही. ऐन निवडणुकीत परिस्थिती आपल्या हाताबाहेर चालली आहे, हे लक्षात येताच काँग्रेस व इतर विद्यार्थी संघटनाही आंदोलनात उतरल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा यांनी विद्यार्थिनीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे.

हत्या झालेल्या नेहाचे वडील निरंजन हिरेमठ हे काँग्रेसचे नगरसेवक आहेत. सुरुवातीला त्यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारवर पर्यायाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या टीकेची झोड उठविली होती. त्याला कारणही होते. हत्येनंतर लगेच एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती उघडकीस आली. 18 एप्रिल रोजी सायंकाळी ही घटना घडली. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी वैयक्तिक कारणातून आणि प्रेम प्रकरणातून विद्यार्थिनीची हत्या झाल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे साहजिकच नेहाच्या वडिलांचा पारा चढला. वैयक्तिक कारण काय असू शकते? माझ्या मुलीने तर प्रेमाला नकार दिला आहे. जर तिने होकार दिला असता तर तिचा खून झाला नसता, असे सांगत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांविरुद्ध नेहाच्या वडिलांनी जोरदार टीका केली. केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांना विनंती करताना ‘आता तुम्हीच न्याय द्या’ अशी मागणी केली. त्याचे व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाले.

Advertisement

मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर जनक्षोभ भडकला, हे लक्षात येताच दोन्ही नेत्यांनी दिलगिरी व्यक्त केली. खरे तर तपासाअंती गृहमंत्र्यांनी हत्येचे कारण जाहीर केले असते तर कोणीच आक्षेप घेण्याचे कारण नव्हते. लगेच दुसऱ्याच दिवशी वैयक्तिक कारणातून आणि प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचे त्यांनी जाहीर केल्यामुळे सरकारविरुद्ध संपूर्ण राज्यात नाराजीचा सूर दिसून आला. विद्यार्थिनीच्या हत्येनंतर या प्रकरणावर राजकीय नाट्याही रंगले आहे. हे प्रकरण भाजप राजकारणासाठी वापरते आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेगवेगळ्या राज्यात निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या भाषणातही विद्यार्थिनीच्या हत्या प्रकरणाचा उल्लेख झाला. कर्नाटकात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती ढासळली आहे. यावर भाजपने भर दिला आहे. याच काळात असहिष्णुता दर्शविणाऱ्या अनेक घटना राज्यात घडल्या. या घटनांचा उल्लेख करून काँग्रेसच्या राजवटीत हिंदू किती सुरक्षित आहेत? असा प्रश्न उपस्थित करून भाजपने ही प्रकरणे निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनविली आहेत.

शिरहट्टी येथील फकिरेश्वर मठाचे दिंगालेश्वर स्वामीजी यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याविरोधात दंड थोपटले होते. स्वामीजींनी लोकसभा निवडणुकीसाठी अर्जही भरला होता. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांच्या नजरा धारवाड लोकसभा मतदारसंघातील घडामोडींवर खिळल्या होत्या. विद्यार्थिनीच्या हत्या प्रकरणानंतर धारवाडमधील परिस्थिती बदलली आहे. दबावामुळे दिंगालेश्वर स्वामीजींनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. धर्मयुद्ध सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे धारवाड मतदारसंघात स्वामीजींचा पाठिंबा काँग्रेसच्या उमेदवाराला असणार, हे स्पष्ट असले तरी नेहा हत्या प्रकरणानंतर धारवाडमध्ये भाजपचा जोर वाढला आहे. हे लक्षात येताच काँग्रेस नेतेही कार्यप्रवण झाले आहेत. पक्षाचे प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला यांनी नेहाच्या वडिलांची भेट घेऊन ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’, असा विश्वास दिला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही फोनवरून संपर्क साधून कुटुंबियांना धीर दिला आहे. एक-दोन दिवसात भेटायला येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. हत्या प्रकरणानंतर बिघडलेली परिस्थिती हाताळण्यासाठी काँग्रेस नेत्यांची धडपड सुरू झाली आहे.

माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिमोगा लोकसभा मतदारसंघातून येडियुराप्पा यांचे चिरंजीव व विद्यमान खासदार बी. वाय. राघवेंद्र यांच्याविरुद्ध अपक्ष म्हणून ईश्वरप्पा निवडणूक लढवत आहेत. ईश्वरप्पा यांचे चिरंजीव कांतेश यांना हावेरीमधून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी येडियुराप्पा व त्यांचे चिरंजीव, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, खासदार राघवेंद्र यांच्याविरुद्ध आघाडीच उघडली होती. ईश्वरप्पा यांची मनधरणी करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न झाले. घराणेशाही विरुद्ध आपण लढणारच, या भूमिकेवर ते ठाम राहिले. त्यामुळे पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. माजी केंद्रीयमंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत. निवडणूक प्रचारासाठी राज्यात त्यांचा दौरा सुरू आहे. भाजप उमेदवारांचा प्रचार करतानाच येडियुराप्पा आणि त्यांच्या चिरंजीवांबद्दल उघडपणे टीका करण्याचा सपाटा त्यांनी सुरूच ठेवला आहे.

कर्नाटकातील सर्व 28 जागांवर विजय मिळविण्याचा संकल्प करणाऱ्या भाजपमध्ये पक्षांतर्गत असंतोषामुळे अस्वस्थता पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्नाटक दौऱ्यानंतर परिस्थितीत थोडी सुधारणा झाली आहे, असे सर्वेक्षणातील निष्कर्ष आहेत. 28 पैकी 14 मतदारसंघात भाजपची स्थिती चांगली आहे. 6 मतदारसंघात काँटे की टक्कर होणार आहे. तर 3 मतदारसंघात पक्षाचे उमेदवार थोडे पुढे आहेत. 2 मतदारसंघात आव्हाने उभी आहेत, असे रिपोर्ट कार्ड भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या हाती लागले आहे.

Advertisement
Tags :

.