महापालिकेचा विद्युत विभागाच अंधारात
ठोकमानधनावरील कर्मचाऱ्यांवर शहराचा डोलाराॉ
52 पदे रिक्त
ईइएसल कंपनीकडून दुरूस्ती
कोल्हापूर: विनोद सावंत
शहराला प्रकाशमय करणाऱ्या महापालिकेचा विद्युत विभागच अंधारात अशी स्थिती झाली आहे. येथे सध्या तांत्रिक पदावरील एकही कर्मचारी कायम नसून सर्व डोलारा आता ठोकमानावरील कर्मचाऱ्यांवर आहे. नवीन आकृतीबंधनुसार येथे आवश्यक 103 पदे आहे. परंतू सध्या कार्यरत 51 कर्मचारी असून तब्बल 52 पदे रिक्त आहेत. ईइएसल कंपनीने दुरूस्तीचे काम थांबविले आहे. विद्युत विभागात अपुरा स्टाप आहे. यामुळे शहरातील विद्युत खांबावरील वीजपुरवठा आता रामभरोसे झाला आहे.
कोल्हापूर महापालिकेचे प्रमुख असे 50 विभाग आहेत. यामध्ये स्मशानभूमी, अग्शिनम दल, आरोग्य विभाग ज्या प्रमाणे अत्यावश्यक सेवेत येतो. तसेच महापालिकेचा विद्युत विभागही अत्यावश्यक सेवेतीलच आहे. या विभागाकडेच मनपा प्रशासनाचे गेले काही महिने दुर्लक्ष झाले आहे. कायम कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर येथे नव्याने कर्मचारी भरती केले गेलेले नाहीत. चार दिवसांपूर्वीच येथील एक कर्मचारी निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर आता या विभागात तांत्रिक कामाशी संबंधित एकही कायम कर्मचारी शिल्लक राहिलेले नाहीत. सर्व डोलारा हा ठोकमानावर आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांवर आहे.
संपूर्ण शहरातील विद्युत खांबावरील वीजपुरवठा, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृह, महापालिकेच्या मुख्य इमारतीसह सर्व इमारती, उद्यानामध्ये अखंडपणे वीज पुरवठा सुरू ठेवण्याची जबाबदारी या विभागाची आहे. वास्तविक हा विभाग सक्षम असणे आवश्यक आहे. परंतू तसे झालेले नाही. या विभागात नवीन आकृतीबंध आराखड्यानुसार 103 पदे आवश्यक आहेत. परंतू सध्या 51 कर्मचारी कार्यरत आहेत. वायरमन आणि मदतनीस कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. यामुळेच वीजपुरवठा बंद पडल्यानंतर दुरूस्त करण्यासाठी अवधी लागतो. परिणामी नागरिकांना अंधारातूनच ये-जा करावी लागत आहे. उपनगरामध्ये विद्युत खांबावर वीजपुरवठा बंद होत असल्याने चोरीचे प्रकारही होण्याचा धोका आहे.
निवृत्ती कर्मचाऱ्यांकडून काम
येथील उप अभियंता हे पद रिक्त आहे. यामुळे या विभागाची जबाबदारी नेहमी ठोकमानधनावरील कर्मचाऱ्यांवर असते. विद्युत विभागात पूर्वी 3 इलेक्ट्रशियन होते. आता एकही नाही. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहामध्ये साऊंडसिस्टीमसाठीचे काम निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमार्फतच करण्यात येत होते.
कर्मचारी जीव धोक्यात घालून काम
ठोकमानधनावरील कर्मचाऱ्यांवरच विद्युत विभाग काम करत आहे. या महिन्यांपासून त्यांना किमान वेतन मिळाले आहे. परंतू कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना सुविधा नाहीत. विमाही उतरविलेला नाही. विद्युत विभागाची कामे ही जोखमीची असतात. जीव धोक्यात घालूनच त्यांना काम करावे लागत आहे.
13 वर्षापासून ठोकमानधनावर ड्यूटी
विद्युत विभागात वायरमनसह अन्य काही कर्मचारी 2012 मध्ये ठोकमानधनावर रूजू झाले आहेत. 13 वर्षापासून ते एक दिवस कायम होतील, या आशेवर काम करत आहेत. मनपातील 507 रोजंदारी कर्मचाऱ्यांना नुकतेच कायम करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून विद्युत विभागातील ठोकमानधनावरील कर्मचाऱ्यांनाही विशेषबाब म्हणून कायम करणे अपेक्षित आहे.
विद्युत विभागामध्ये निवृत्तीनंतर रिक्त पदे जशी होतील तसे लेबर विभागाला नवीन भरती करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. परंतू त्यास प्रतिसाद काही मिळाला नाही. त्यामुळे कायम कर्मचाऱ्यांची बहुतांशी पदे रिक्त असून कार्यरत ठोकमानधनावर कर्मचाऱ्यांमार्फत कामकाज केले जाते.
अमित दळवी कनिष्ठ अभियंता, विद्युत विभाग
पद आवश्यक सध्या कार्यरत
उप अभियंता 1 0
सहाय्यक अभियंता 1 1
कनिष्ठ अभियंता 4 1
विद्युत पर्यवेक्षक 6 3
विद्युत निरीक्षक 2 2
सहाय्यक अधीक्षक 1 0
वरीष्ठ लिपिक 1 1
कनिष्ठ लिपिक 3 2
वीज तंत्री 4 0
सहाय्यक वीज तंत्री 1 0
वायरमन 28 17
मदतनीस 50 24
शिपाई 1 0
एकूण 103 51