महापालिकेला सुचले उशिरा शहाणपण
पावसाळा तोंडावर आल्यानंतर नाले सफाईची धडपड : नाल्यातील कचऱ्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळे
बेळगाव : शहर व उपनगरातील नाल्यांची खरतर पावसाळ्यापूर्वी सफाई करणे गरजेचे होते. मात्र, उशिरा जागे झालेल्या महापालिकेकडून पावसाळा तोंडावर आल्यानंतर नाल्यांची सफाई करण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. त्यामुळे यंदा तरी पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई पूर्ण होणार का? हे मात्र पहावे लागणार आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले व गटारींची सफाई करण्यात यावी, अशी मागणी यापूर्वी झालेल्या बांधकाम व आरोग्य स्थायी समिती बैठकीत अधिकाऱ्यांना अनेकवेळा करण्यात आली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी केवळ आज करतो, उद्या करतो असे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रकार केला. त्याचबरोबर सर्वसाधारण बैठकीतदेखील शहरातील नाले व गटारींच्या सफाईचा प्रश्न चांगलाच गाजला. कोनवाळ गल्लीसह काही नाले धोकादायक बनले असतानादेखील त्यांच्या दुरुस्तीकडे महापालिकेने सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे.
एखादी दुर्घटना घडली तर त्याला महापालिका जबाबदार राहणार, असा आरोप देखील बैठकीत करण्यात आला होता. बहुतांश नाल्यांमध्ये प्लास्टिकच्या कचऱ्याचा ढीग साचला आहे. त्यामुळे पोकलॅन किंवा जेसीबीच्या साहाय्याने नाल्यांची सफाई करणे गरजेचे आहे. दरवर्षीप्रमाणे नाल्यातील कचऱ्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होऊ नयेत, पुराचे पाणी रस्त्यावर येण्यासह सांडपाणीदेखील अनेक वेळा रस्त्यावर आले आहे. त्यामुळे याचा फटका बेळगावकरांना सहन करावा लागत असून रोगराईदेखील पसरण्याची भीती आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नाल्याची सफाई करणे गरजेचे होते. पण पावसाळा तोंडावर आला असताना नाल्यांची सफाई करण्याची धडपड महापालिकेने चालविली आहे. विविध ठिकाणी पोकलॅन व जेसीबी लावून नाल्यातील जलपर्णी व केरकचरा काढला जात आहे.