For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बहुप्रतिक्षीत ईएसआय रुग्णालय लवकरच कामगारांच्या सेवेत

01:10 PM Nov 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
बहुप्रतिक्षीत ईएसआय रुग्णालय लवकरच कामगारांच्या सेवेत
Advertisement

केंद्र सरकारकडून पुन्हा निविदा : कामगार वर्गातून समाधान 

Advertisement

बेळगाव : राजकीय प्रतिष्ठा, जागेच्या अभावामुळे 100 खाटांच्या ईएसआय रुग्णालयाची स्थापना गेल्या दोन वर्षापासून रखडली होती. मात्र आता केंद्र सरकारने पुन्हा ईएसआय रुग्णालयासाठी निविदा मागविल्या आहेत. त्यामुळे कामगार वर्गाच्या बहुप्रतिक्षीत ईएसआय रुग्णालयाचा प्रकल्प पुन्हा एकदा जीवित झाला आहे. बेळगावात मोठ्या प्रमाणात लघु आणि मध्यम उद्योग आहेत. यांच्यामुळे 1.50 लाखाहून अधिक कामगारांना रोजगार मिळतो. कामगार खात्याच्या नियमानुसार बेळगावात 150 बेडची ईएसआय रुग्णालय असायला हवे होते. तथापि, सध्या अशोकनगरमध्ये केवळ 50 बेडचे रुग्णालय आहे.. तेही जीर्ण झाल्यामुळे तेथे रुग्णालय चालविणे शक्य नव्हते. यासंदर्भात कामगार आणि नागरिकांकडून अनेक वर्षापासून केंद्रीय कर्मचारी, विमा महामंडळ (ईएसआयसी) ने शहरात 100 बेडचे रुग्णालय बांधावे, अशी मागणी केली होती.

राजकीय दबावामुळे पुन्हा निविदा मागविली

Advertisement

2023 मध्ये केंद्रीय कामगार खात्याने तत्वता मान्यता दिली आहे. तर राज्य सरकारला जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार उद्यमबाग परिसरात जागा निश्चित करण्यासाठी अनेक बैठका झाल्या. परंतु, रुग्णालय स्थापन करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. अखेर रुग्णालयाच्या बांधकामासाठी जागेअभावी केंद्र सरकारने नोव्हेंबर 2024 मध्ये निविदा रद्द केली.  राजकीय दबावामुळे 24 जुलै 2025 मध्ये पुन्हा निविदा मागविण्यात आली आहे. त्यामुळे या क्षेत्रातील लाखो कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना चांगली आरोग्यसेवा मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

उपकरणे हलविण्यासाठी  निविदा

अशोकनगर येथील जुनी इमारत पाडून 152 कोटी रुपयांच्या निधीतून 100 बेडच्या रुग्णालयाच्या बांधकामाची निविदा पूर्ण झाली आहे. निविदेत रुग्णालयाची इमारत, वैद्यकीय उपकरणे खरेदी करणे, कर्मचाऱ्यांची भरती इत्यादी सुविधा निर्माण करण्याची तरतूद आहे. तसेच जुन्या रुग्णालयातील उपकरणे हलविण्यासाठी 5 नोव्हेंबर 2025 रोजी निविदा मागविण्यात आली आहे. बेळगाव, चिकोडी, गोकाक, निपाणी, खानापूर या तालुक्यातील कामगारांना या रुग्णालयाचा लाभ होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने या हॉस्पिटलचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Advertisement
Tags :

.