80 लाख लोकांचा जीव घेणारा पर्वत
पर्वतामध्ये लपलाय हजारो टनाचा खजिना
दक्षिण अमेरिकेतील बोलीविया या देशात चांदीच्या अनेक खाणी आहेत. परंतु या देशात सेरो रिको नावाचा एक रहस्यमय पर्वत असून तो माणसांचा गिळंकृत करत असल्याचे म्हटले जाते. या पर्वतामुळे दर महिन्याला 14 महिला येथे विधव होत असतात.
सेरो रिको पर्वताखाली सुमारे 500 वर्षे जुनी चांदीची खाण असून यात हजारो टन चांदीचा साठा आहे. एकेकाळी स्पेनच्या शासकांनी येथे मोठ्या प्रमाणात खनन करविले होते. स्पॅनिश वसाहतवादाच्या काळादरम्यान या पर्वतामधून प्रचंड प्रमाणात चांदी मिळविण्यात आली होती. परंतु येथे खनन सुरू असताना याच्या भुयारांमध्ये अडकून 80 लाखाहुन अधिक लोकांनी जीव गमावला होता. याचमुळे या पर्वताला माणसांना गिळंकृत करणारा पर्वत असे नाव मिळाले होते. आजही येथील खाणींमध्ये 15 हजारांहून अधिक कामगार काम करतात. यातील अनेक जणांचा मृत्यू होत असतो. येथे काम करणारे लोक वयाच्या 40 वर्षांपर्यंतच जगू शकतात.
भुयारांनी भरलेला हा पर्वत येथे काम करणाऱ्या पुरुष अन् युवकांसाठी मृत्यूचा सापळा आहे. कारण येथे सातत्याने खनन करण्यात आल्याने पर्वताला मोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे आता तर हा पूर्ण पर्वतच कोसळण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. खननादरम्यान यात प्रचंड प्रमाणात धूळ निर्माण होत असल्याने कामगारांच्या फुफ्फुसांना मोठी ईजा पोहोचली आहे. याचमुळे या कामगारांचा मृत्यू तुलनेत लवकर होत असतो.
मृत्यूपासून वाचण्यासाठी येथील लोक सैतानाची देखील प्रार्थना करतात. ते खाणींची सैतान देवता एल टियोला मद्य आणि सिगारेटसोबत कोकाच्या पानांचा प्रसाद अर्पण करतात. प्रत्येक भुयारात एल टियोची एक मूर्ती देखील आहे. दर शुक्रवारी लोक येथे प्रसाद अर्पण करण्यासाठी एकत्र येतात आणि शिंग असलेल्या देवतेचे गुणगान करतात.
येथे सर्वाधिक मृत्यू सिलिकोसिसमुळे होतात. कामगारांच्या फुफ्फुसांमध्ये धूळ पोहोचत असल्याने प्रतिरक्षण प्रणाली कमकुवत होते. फुफ्फुसांमध्ये धूळ साचत असल्याने क्रोनिक ब्रोंकाइटिसची लक्षण म्हणजेच ताप, छातीत वेदना, वजन कमी होणे, अशक्तपणा आणि अखेरीस मृत्यू हेत असतो. येथे काम करणारे लोक कोकाची पानं चघळत असतात. यामुळे धूळीचा प्रभाव कमी करण्यास मदत होत असल्याचे त्यांचे सांगणे आहे.
येथील खाणीत आता पूर्वीप्रमाणे चांदीचे उत्पादन होत नाही. परंतु तरीही येथील खाणकाम जोरात सुरू असते. पर्वताखाली पोतोसी नावाचे एक शहर आहे. या शहराला जगातील सर्वाधिक उंचीवर वसलेल्या शहरांपैकी एक मानले जाते. येथे हजारोंच्या संख्येत लोक राहत असतात. परंतु या शहरातील बहुतांश लोक हे सेरो रिको पर्वतात निर्माण करण्यात आलेल्या भुयारांमध्ये काम करतात.