सर्वात अनोखा बेडुक
निसर्गाचे रहस्य कधीच संपत नाही, निसर्गात असे कोट्यावधी जीव आहेत, ज्याबद्दल माणसाला अद्याप पूर्ण माहिती मिळविता आलेली नाही. अशाच एका जीवाची कहाणी एखाद्या भयपटातील व्यक्तिरेखेसारखी आहे. एका बेडकाचे डोळे डोक्यावर नव्हे तर तोंडाच्या आत आहेत. कॅनडाच्या ओंटारियोमध्ये शोधण्यात आलेले हे प्रकरण आहे.
वैज्ञानिकांनी याला ‘इंट्रोस्पेक्टिव फ्रॉग’ (आत्मचिंतन करणारा बेडुक) नाव दिले आहे, कारण याला जग पाहण्यासाठी स्वत:चे तोंड उघडावेच लागते. हे जेनेटिक म्यूटेशनचे दुर्लभ उदाहरण असून ते एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंटदरम्यान झाले आहे. आंsटारियो प्रांताच्या बर्लिंग्टन काउंटीत एक हायस्कूल विद्यार्थिनी डीड्रे स्वत:च्या घराच्या परिसरात खेळत होती, अचानक तिची नजर एका अजब बेडकावर पडली. हा बेडुक स्वत:चे डोळे बंद करून बसला होता, जणू तो झोपल्यासारखा तेथे होता. डीड्रेने उत्सुकतेपोटी त्याला पकडून हातात घेतले. परंतु त्याचे डोळे तिला दिसले नाहीत. बेडकाने तोंड उघडताच डीड्रे अचंबित झाली. बेडकाच्या तोंडाच्या आत दोन चमकदार डोळे होते. प्रथम या बेडकाने दुसरा बेडुक गिळला असावा असे तिला वाटले, परंतु जवळून पाहिल्यावर हे डोळे बेडकाच्याच शरीराचा हिस्सा असल्याचे तिला कळले.
डीड्रेने याला पाळून ‘गोलम’ हे नाव दिले. लॉर्ड ऑफ द रिंग्समधील एका पात्राचे नाव असून ते अंधारात राहत असते. डीड्रेने यानंतर स्थानिक प्रसारमाध्यमाला या बेडकाविषयी कळविले. तेथील हॅमिल्टन स्पेक्टेटर वृत्तपत्राचे छायाचित्रकार स्कॉट गार्डनर यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहिल्यावर ते देखील दंग झाले. त्यांनी या बेडकाचे छायाचित्र टिपले. यात बेडकाचे तोंड उघडे होते आणि आतून डोळे बाहेर डोकावत होते. छायाचित्र इतके विचित्र होते की, रेडिओवर लाइव्ह रिपोर्टिंग करावे लागले. मी कधीच असे काही पाहिले नव्हते. हा बेडुक सामान्य दिसत होता, परंतु तोंड उघडताच तो भीतीदायक वाटतो, असे गार्डनर यांनी सांगितले आहे.
जेनेटिक म्युटेशन
वैज्ञानिकांनुसार हे मॅक्रोम्युटेशन (मोठे जेनेटिक म्युटेशन) आहे. सामान्य बेडकाच्या एम्ब्रायोमध्ये डोळे डोक्यावर विकसित होतात. रेटिना लेन्सला इंड्यूस करतात आणि आयबॉल बाहेर येतो. परंतु गोलमच्या प्रकरणात विकास प्रक्रिया बिघडली असावी. प्राध्यापक जेम्स बोगर्ट (टोरंटो विद्यापीठ) यांनी या प्रकरणी संशोधन केले. डोळे उलट्या दिशेने वाढल्याने ते तोंडात विकसित झाल्याचा त्यांचा अनुमान होता. जीन रेग्युलेशनमध्ये गडबड किंवा पर्यावरणीय घटक देखील याचे कारण असू शकते. याचबरोबर पॅरासाइटिक इंटरफेरेन्सही शक्य आहे, परंतु साइड बाय साइड सिमेट्रीतून हे बहुधा जन्मजात असावे असे वाटत असल्याचे प्राध्यापक बोगर्ट यांनी सांगितले आहे.