जगातील सर्वात रेडिओअॅक्टिव्ह सरोवर
एका देशाच्या अण्वस्त्रांमुळे धोकादायक स्वरुप
अण्वस्त्रांमुळे शहरे नष्ट होत असल्याचे तुम्हाला ठाऊक असेल. परंतु कधी एखाद्या सरोवराला अण्वस्त्रांमुळे धोकादायक स्वरुप मिळाल्याचे माहित आहे का? हे सरोवर अण्वस्त्रांच्या विस्फोटांमुळे नव्हे तर याच्या निर्मितीत वापरण्यात आलेल्या घटकांमुळे धोकादायक ठरले आहे.
जगातील सर्वात प्रदूषित सरोवर रशियात आहे. याला कराचाय सरोवराच्या नावाने ओळखले जाते. या सरोवराच्या नजीक गेल्यास याच्या पाण्याच्या रंगातूनच याचे धोकादायक स्वरुप स्पष्ट होते. या सरोवराच्या पाण्याचा रंग काळा आहे. हा काळा रंग चिखल, माती किंवा कचऱ्यामुळे प्राप्त झालेला नाही.
हा काळा रंग रेडिओअॅक्टिव्ह पदार्थांमुळे प्राप्त झाला आहे. 70 वर्षांपूर्वी सोव्हिएत महासंघाने या सरोवराच्या नजीक एक गुप्त अण्वस्त्र प्रकल्प स्थापन केला होता. अण्वस्त्रांच्या निर्मितीतून निघणारा कचरा या सरोवरात येऊन पडत होता. याचमुळे हे सरोवर आता जगातील सर्वात किरणोत्सर्गी सरोवर ठरले आहे.
कराचाय सरोवरात अनेक किरणोत्सर्गी घटक आढळून येतात. यात प्लूटोनियम-239, यूरेनियम-238 आणि सेसियम-137 आढळते. प्लूटोनियम-239 एक विषारी आणि किरणोत्सर्गी पदार्थ आहे, ज्याचा वापर अण्वस्त्रांमध्ये केला जातो. तर यूरेनियम-238 एक सामान्य रेडिओअॅक्टिव्ह घटक असून तो वातावरणात मिसळत असतो. सेसियम-137 दीर्घकाळापर्यंत पर्यावरणात राहणारा घटक असून तो आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे.
लोकांना गंभीर आजार
कराचाय सरोवरात असलेल्या किरणोत्सर्गी घटकांच्या संपर्कात आल्याने स्थानिक लोकांना अनेक आरोग्य समस्या देखील होत आहेत. यात कॅन्सर प्रमुख आहे. याचबरोबर लोकांच्या डीएनएमध्ये देखील परिवर्तन होत आहे. तसेच महिलांमध्ये गर्भपाताची उच्च जोखीम दिसून आली आहे.
अमेरिकेतही किरणोत्सर्गी सरोवर
रशियाप्रमाणे अमेरिकेत देखील एक किरणोत्सर्गी सरोवर आहे. या सरोवराचे नाव कॅनियन आहे. हे सरोवर वॉशिंग्टनच्या हनफोर्ड क्षेत्रा असून याचा आकार जवळपास 33 हजार एकरचा आहे. हनफोर्ड साइट हे एक अणुऊर्जा संशोधन केंद्र होते, जे दुसऱ्या महायुद्धादरम्यान निर्माण करण्यात आले होते. या केंद्रामुळेच हे सरोवर किरणोत्सर्गी ठरले आहे.