सर्वात विषारी पक्षी
चुकूनही करू नका स्पर्श, अन्यथा...
विषारी साप आणि विषारी बेडकांबद्दल ऐकले असेल, परंतु पक्षी देखील विषारी असतात असे कधी ऐकले आहे का? एका पक्ष्याला जगातील सर्वात विषारी पक्षी मानले जाते. या पक्ष्याचे नाव हुडेड पिटोहुई असून त्याला स्पर्श करण्याचा अर्थ मृत्यूला निमंत्रण देणे असा आहे, त्याच्या पंखांना स्पर्श केला तरीही तुमच्या हातांमध्ये जळजळ सुरू होत शरीरात त्याचे घातक विष फैलावू शकते. हे विष पॅरालिसिस आणि मृत्यूचे कारण देखील ठरू शकते. हुडेड पिटोहुई न्यू गिनीत आढळून येणारा एक साँगबर्ड आहे, याचे शास्त्राrय नाव पिटोहुई डायक्रोस आहे. न्यू गिनी एक बेट असून ते इंडोनेशियाच्या पूर्व दिशेला दक्षिण प्रशांत महासागरात आहे. पिटोहुईच्या जवळपास 6 प्रजाती असून यातील हुडेड पिटोहुई सर्वात घातक आहे. हा दस्तऐवजात नोंद होणारा पहिला विषारी पक्षी आहे. हुडेड पिटोहुईच्या पोटाचा रंग लाल असतो, तर याचे शीर, पंख आणि शेपूट काळ्या रंगाचे असते, याचे मजबूत पाय आणि चोच शक्तिशाली असते.
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून ‘सर्वात विषारी पक्षी’ घोषित याचा शोध 1989 मध्ये जॅक डंबाचर यांनी लावला होता. डंबाचर हे न्यू गिनीमध्ये पक्ष्यांसाठी जाळे विणत होते, जाळ्यात हुडेड पिटोहुई पक्ष्याची एक जोडी अडकली होती, डंबाचर यांनी यातील एका पक्ष्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या बोटांचा चावा घेतला होता. यानंतर त्यांनी बोट तोंडात धरले होते, परंतु यामुळे त्यांची जीभ आणि ओठ सुन्न पडले होते. हुडेड पिटोहुईची त्वचा, पंख आणि अन्य पेशींमध्ये बॅट्राकाटॉक्सिन नावाचे न्यूरोटॉक्सिन आढळून येते, जे निसर्गात आढळून येणारे अत्याधिक विषारी घटक असून ते पॅरालिसिस आणि मृत्यूचे कारण ठरू शकते. या पक्ष्याची त्वचा आणि पंख त्याच्या शरीरातील सर्वात विषारी भाग आहेत, याच्या चोचेद्वारे ओरखडा जरी उमटला तरी लोकांना ते सुन्न करू शकते. या विषाचे अधिक प्रमाण शरीरात पोहोचल्यास लकवा होऊ शकतो आणि मृत्यूही होण्याची शक्यता आहे. या पक्ष्याला न खाण्याचा सल्ला दिला जातो. हा पक्षी बॅट्राकाटॉक्सिनयुक्त स्वत: होत नाही, तर हे विष तो आहारातून प्राप्त करतो. हा पक्षी हे विष स्वत:चे भक्ष्य असलेल्या प्राणी आणि रोपांमधून प्राप्त करतो. न्यू गिनीच्या जंगलांमध्ये भृंग संभाव्य स्रोत असून या पक्ष्याची त्वचा आणि पंख विषारी असल्याने त्याचे संरक्षण होत असते.