सर्वात महाग टोल रोड पेंसिल्वेनियात
घरातून वाहन बाहेर काढताच लागतो कंजेक्शन चार्ज
जर तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात कारने प्रवास केला असेल तर कुठे ना कुठे टोल भरावा लागला असेल. अनेकदा तर एकाच शहरात लोकांना टोल भरावा लागतो. काही टोल नाक्यांकडून स्थानिकांना मासिक पास जारी करून दिलासा दिला जातो. तर महागड्या टोलमुळे काही रस्त्यांवरुन कारने प्रवास करणे महाग ठरते. जगातील सर्वात महाग टोल कुठे आहे हे जाणून घेणे याचमुळे रंजक ठरणार आहे.
जगातील सर्वात महाग टोल रोड पेंसिल्वेनियात आहे. पेंसिल्वेनियाच्या टर्नपाइक रोडवर एका टोकाहून दुसऱ्या टोकाकडे जाण्यासाठी तुम्हाला सुमारे 113 डॉलर्स म्हणजेच 9300 रुपये खर्च करावे लागतात. या रस्त्यावर प्रत्येक एका मैलाच्या प्रवासासाठी 31 सेंटचा टोल भरावा लागतो. हा टोल रोड फिलाडेल्फियापासून ओहियोच्या सीमेपर्यंत सुमारे 360 किलोमीटर लांबीचा आहे.
पेंसिल्वेनियाच्या टर्नपाइकनंतर ऑस्ट्रियाच्या ग्रॉसग्लॉकनर हाय अल्पाइन रोडच्या पूर्ण लांबीपर्यंत ड्राइव्ह करण्यासाठी 45.43 डॉलर्सचा टोल भरावा लागतो. यानंतर क्रोएशियात ए-1 मोटरवेसाठी 38.42 डॉलर्सचा टोल भरावा लागतो. टोलप्रकरणी सर्वात महाग देश म्हणून स्वीत्झर्लंड ओळखला जातो. तेथे सरासरी टोल शुल्क 26.52 डॉलर्स आहे. तर ऑस्ट्रिया 16.31 डॉलर्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकेत सरासरी टोल 5.38 डॉलर्स असून त्याचा क्रमांक 11 वा लागतो.
वाहनांवर लागणारा कंजेक्शन टॅक्स
पीक आवर्सदरम्यान विशेष शहरी क्षेत्रांमध्ये येणाऱ्या वाहनांवर कंजेक्शन टॅक्स आकारला जातो. रस्त्यावरील गर्दी हाताळण्यासाठी, हवा प्रदूषण कमी करणे आणि ग्रीनहाउस गॅस उत्सर्जन कमी करण्यासाठी हा कर आकारण्यात येतो. याच करामुळे लंडन शहरात वाहन रस्त्यावर आणताच कर लागू होतो. फेब्रुवारी 2003 मध्ये लंडनचे महापौर केन लिव्हिंगस्टन आणि टीएफएलकडून सादर हे शुल्क आता शहराचा महत्त्वाचा हिस्सा ठरले आहे.
किती आणि कधीपर्यंत लागू?
कंजेक्शन टॅक्स सोमवारपासून शुक्रवारपर्यंत सकाळी 7 ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत लागू असतो. दैनंदिन शुल्काची सुरुवार 5 पाउंड म्हणजेच सुमारे 500 रुपये निश्चित करण्यात आली होती. आता हे शुल्क वाढून 15 पाउंड म्हणजेच 1560 रुपये प्रतिदिन झाले आहे. यामुळे लंडन शहराला मोठा लाभ झाला आहे. शुल्कामुळे 2003 साली वाहतुकीत 15 टक्क्के घट झाली. तर लंडनमध्ये बसच्या वापरात 30 टक्के वृद्धी झाली. हे शुल्क जसजसे वाढत गेले, तसतशी लंडनमधील वाहतूक कोंडी कमी होत गेली.