शतकातील सर्वात महागडे चित्र
1500 कोटींपेक्षा अधिक मिळाली किंमत, मर्लिन मुन्रोचे आयकॉनिक पेंटिंग
आयकॉनिक अमेरिकन अभिनेत्री मर्लिन मुन्रोचे चित्र 1500 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीत विकले गेले आहे. हे चित्र न्यूयॉर्कमधील लिलावात सर्वात महागडय़ा किमतीत विकण्यात आले. चित्रकार एंडी वारहोल यांनी अभिनेत्रीच्या निधनाच्या 2 वर्षांनी 1964 मध्ये हे चित्र साकारले होते. लिलावातून मिळालेल्या रकमेतून अनाथ मुलांना मदत केली जाणार आहे.
मर्लिन मुन्रोच्या पेंटिंगचे नाव ‘शॉट सेज ब्ल्यू मर्लिन’ आहे. ही कलाकृती मॅनहॅटनच्या क्रिस्टी मुख्यालयात केवळ 4 मिनिटांमध्ये 1500 कोटींपेक्षा अधिक किमतीत विकले गेले आणि याचबरोबर हे 20 व्या शतकातील सर्वात महागडी कलाकृती ठरली. खरेदीदाराचे नाव अद्याप समोर आलेले नाही. चित्राकरता मिळालेली रक्कम थॉमस अँड डोरिस अम्मान फौंडेशन झ्यूरिचला दिली जइा&ल. हे फौंडेशन कलाकृतींचा लिलाव आयोजित करत त्यातून मिळालेल्या रकमेतून अनाथ मुलांना मदत करत असते.
यापूर्वी पाब्लो पिकासो यांच्या ‘वुमन ऑफ अल्जीयर्स’ या चित्राला 2015 मध्ये 1385 कोटी रुपयांची किंमत मिळाली होती. 20 आणि 21 व्या शतकाशी संबंधित कला विभागाचे प्रमुख एलेक्स रॉटर यांनी शॉट सेज ब्ल्यू मर्लिनला मिळालेली किंमत अत्यंत चांगली असल्याचे म्हटले आहे.
कोण आहे मर्लिन मुन्रो?
मर्लिन मुन्रोचा जन्म 1926 मध्ये लॉस एंजिलिस येथे झाला होता. मर्लिन एक अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल होती. तिने तीन विवाह केले होते आणि यातील पहिला विवाह वयाच्या 16 व्या वर्षी केला होता. मर्लिन मुन्रोचे नाव अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांच्यापासून गायक प्रँक सिनात्रा आणि बेसबॉलपटू जो डिमॅगियो यांच्याशी जोडले गेले होते. अभिनेत्रीचा 1962 मध्ये ड्रग ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला होता. काही लोक याला हत्या देखील ठरवतात, परंतु आजपर्यंत तिच्या मृत्यूचे रहस्य कायम आहे.