सर्वात महागडे हॉटेल पाण्यात
जगभरात आता एकाहून एक सरस लक्झरी हॉटेल्स आहेत. या लक्झरी हॉटेल्सचे एक दिवसांचे वास्तव्य भाडे लाखो रुपये असते. परंतु जगातील सर्वात महागडे हॉटेल हे जमिनीवर नव्हे तर पाण्यात आहे. येथे एक दिवस वास्तव्याचे भाडे इतके आहे की त्या रकमेत तुम्ही एक आलिशान कार खरेदी करू शकता. हे हॉटेल पाण्यात असून येथे सर्वप्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध आहेत. येथे तुम्हाला स्वत:चा पर्सनल स्टाफ मिळतो आणि तुम्हाला पर्सनल कुक दिले जातात. तर पाण्याबाहेर फिरण्यासाठी ग्राहकांना प्रायव्हेट हेलिकॉप्टर मिळते, याचबरोबर अनेक साऱ्या लक्झरी सुविधा या हॉटेलमध्ये उपलब्ध आहेत. या हॉटेलचे नाव द लव्हर्स डीप असून ते प्रसिद्ध सबमरीन हॉटेल आहे. हे जगातील सर्वात महाग हॉटेल आहे, कारण हे हॉटेल एका पाणबुडीत आहे आणि कॅरेबियन देश सेंट लूसियामध्ये आहे. येथील वास्तव्याचा एक वेगळाच अनुभव असतो. येथे वास्तव्य केल्यास पाण्यातील आकर्षक दृश्यं पाहता येतात. परंतु याकरता मोठी रक्कमही खर्च करावी लागते.
जगातील सर्वात महाग आणि लक्झरी हॉटेल एक अंडरवॉटर सबमरीन स्पेस आहे. पाणबुडी हॉटेल विशेषकरून साहसी रोमँटिक अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. येथे एक दिवस वास्तव्य करण्यासाठी 292000 डॉलर्स म्हणजे 2 कोटी 17 लाख 34 हजार 450 रुपये खर्च करावे लागतात. सर्वसामान्यांसाठी हे जणू स्वप्न आहे, परंतु जगात असे अनेक अब्जाधीश आहेत, जे याचा अनुभव घेत असतात.
ही पाणबुडी लोकांना खोल निळ्या समुद्राच्या माध्यमातून घेऊन जाते आणि त्यांना समुद्रातील सुंदर दृश्य पाहता येतात. समुद्रात मोठ्या आणि छोट्या माशांना अत्यंत जवळून पाहता येते. येथे खोलीतूनच समुद्राचे दृश्य दिसून येते. या पाणबुडी हॉटेलमध्ये सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध होत असतात.