सर्वात महागडे औषध
एक डोसची किंमत 28.5 कोटी रुपये, हीमोफीलियाच्या उपचारासाठी होतो वापर
अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने अलिकडेच जगातील सर्वात महागडय़ा औषधाला मंजुरी दिली आहे. हेमजेनिक्स नावाच्या या औषधाच्या एका डोसची किंमत 3.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 28 कोटी 58 रुपये आहे. हीमोफीलिया बी या आजाराला तोंड देणाऱया रुग्णांच्या उपचारासाठी हे औषध वापरले जाणार आहे.
हीमोफीलिया एक आनुवंशिक आजार आहे. याचे अनेक प्रकार आहेत. परंतु हीमोफिलिया बी अत्यंत दुर्लभ आहे. यात व्यक्तीच्या रक्तात एका प्रोटीनची कमतरता निर्ब्माण होते, जे रक्त गोठवत असते. या प्रोटीनला ‘क्लॉटिंग फॅक्टर’ही म्हटले जाते. या आजाराने पीडित लोकांना किंचित ईजा झाली तरीही त्यांच्या जखमेवर रक्त गोठू शकत नाही आणि रक्त सातत्याने वाहत राहते. अधिक रक्त वाहिल्याने व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो.
एक डोस देणार दिलासा
एफडीएनुसार हेमजेनिक्स औषध हीमोफीलिया बी च्या रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. हे औषध अत्यंत महाग असले तरीही याचा एक डोस आयुष्यभर चालणाऱया उपचाराच्या तुलनेत स्वस्तच ठरणार आहे. अमेरिकेत एका हीमोफीलियाच्या रुग्णाकरता 21-23 दशलक्ष डॉलर्स (171-181 कोटी रुपये) इतका खर्च येतो. परंतु ब्रिटनसारख्या देशांमध्ये हा खर्च कमी आहे. या औषधाच्या किती डोसने या आजारापासून वाचण्यास यश मिळणार हे एफडीएने अद्याप स्पष्ट केलेले नाही. परंतु या औषधाचा एक डोस घेतला तर अनेक वर्षांपर्यंत रक्तस्राव कमी होईल आणि रक्त गोठू लागणार असल्याचे समजते.
सद्यकाळातील उपचार स्वरुप
हीमोफीलियाच्या रुग्णांना सध्या स्वतःच्या रक्तात क्लॉटिंग फॅक्टर रिप्लेस करावा लागतो. सर्वसाधारणपणे प्रत्येक ठिकाणी हीच उपचारपद्धत आहे. या प्रक्रियेत रुग्णांच्या नसांमध्ये क्लॉटिंग फॅक्टर इंजेक्ट केला जातो आणि हा उपचार जीवनभर चालतो. याचबरोबर अधिक रक्तस्राव टाळण्यासाठी किंवा तो रोखण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यावरून देखभाल केली जाते.
पुरुष अधिक पीडित
एफडीएनुसार जगात हीमोफीलियाने दर 40 हजारांपैकी एक व्यक्ती प्रभावित आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. एका अनुमानानुसार अमेरिकेत सुमारे 8 हजार पुरुष या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांना आयुष्यभर या आजारासोबत जगावे लागत आहे.
भारतातही रुग्ण अधिक
भारतात सुमारे 1 लाख 40 हजार लोक हीमोफीलियाने पीडित आहेत. पुरुषांमध्ये दर 10 हजार लोकांमागे एकाला हा आजार असतो. बहुतांश लोक हीमोफीलिया ए ने ग्रस्त असतात. देशातील सुमारे 13 टक्के लोकसंख्या हीमोफीलियाच्या विविध प्रकारांना तोंड देत आहे.