जगातील सर्वात घातक विष
केवळ एक ग्रॅम घेऊ शकते हजारोंचा जीव
सायनाइड अत्यंत घातक विष असल्याचे मानले जाते, असेच आणखी एक घातक विष असून त्याला पोलोनियम 210 नाव आहे. परंतु याविषयी लोकांना फारच कमी माहिती आहे. याचे केवळ एक ग्रॅमच हजारो लोकांचा जीव घेण्यास पुरेसे आहे. याचमुळे याला जगातील सर्वात घातक विष म्हटले जाते. पोलोनियम 210 प्रत्यक्षात एक रेडिओअॅक्टिव्ह घटक असून त्यातून निघणारा किरणोत्सर्ग मानवी शरीराच्या अंतर्गत अवयवांसोबत डीएनए आणि इम्युन सिस्टीमलाही वेगाने नष्ट करू शकते. मृत शरीरात याच्या उपस्थितीचा शोध लावणेही अत्यंत अवघड काम करते. भारतात तर याच्या विषाची तपासणी शक्य नाही.
पोलोनियम-210 चा शोध प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ मेरी क्यूरी यांनी 1898 मध्ये लावला होता. त्यांना रसायनशास्त्राच्या क्षेत्रात रेडियमच्या शुद्धीकरणासाठी (आयसोलेशन ऑफ प्योर रेडियम) नोबेल पुरस्कारही मिळाला होता. याचबरोबर त्यांना रेडिओअॅक्टिव्हिटीच्या शोधासाठी भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता. पोलोनियमचे नाव पूर्वी रेडियम एफ ठेवण्यात आले होते, परंतु नंतर ते बदलण्यात आले. पोलोनियम-210 चा मिठाइतका कणही मानवी शरीरात पोहोचल्यास क्षणार्धात मृत्यू ओढवू शकतो. याचा प्रभाव ओळखणे अत्यंत अवघड आहे, कारण हे जर अन्नात मिसळले तर याच्या स्वादाला ओळखता येत नाही. पोलोनियम विषाची पहिली शिकार याचा शोध लावणाऱ्या मेरी क्यूरीच होत्या. त्यांनी याचा एक छोटासा कण गिळला होता, यामुळे त्यांचा त्वरित मृत्यू झाला होता.
याचबरोबर इस्रायलचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जाणारे पॅलेस्टिनी नेते यासिर अराफात यांचा मृत्यूही याच विषामुळे झाला होता असे मानले जाते. याच्या तपासणीसाठी त्यांचा मृतदेह दफन केल्याच्या अनेक वर्षांनी थडग्यामधून बाहेर काढण्यात आला होता. त्यांच्या मृतदेहाच्या अवशेषांमध्ये किरणोत्सर्गी पोलोनियम-210 मिळाल्याचा दावा स्वीत्झर्लंडच्या वैज्ञानिकांनी केला होता.