जगातील सर्वात धोकादायक पायऱ्या
ऑस्ट्रियामधील ‘स्वर्गाची शिडी’ किंवा ‘स्काय लॅडर’ला जगातील सर्वात धोकादायक पायऱ्या मानले जाते. तसेच याला जगातील सर्वात धोकादायक पूलांपैकी एक मानण्यात येते. याची लांबी 140 फूट तर जमिनीपासून उंची 2296 फूट इतकी आहे. हा ब्रिज दोन पर्वतांच्या शिखरांना जोडतो. साहसी लोकच या शिडीवरून चढून जाऊ शकतात. परंतु एकदा यात ते यशस्वी ठरल्यावर त्यांना अत्यंत सुंदर नैसर्गिक दृश्य दिसून येते. याच्या सुंदरतेची तुलना ‘स्वर्गा’शी करता येऊ शकते.
खोल दरी, उंच पर्वत आणि घनदाट जंगलांनी वेढलेला मैदानी भागामुळे येथील दृश्याला वेगळेच परिमाण लाभले आहे. शिडीखाली अत्यंत धोकादायक आणि खोल दरी असून त्याकडे पाहिल्यास भीतीच वाटू लागते. शिडीवरून चढत जात शिखरावर पोहोचल्यावरच सुटकेचा निश्वास सोडता येतो. ही स्काय लॅडर साहसवीरांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. ही शिडी लोखंडाने तयार करण्यात आली आहे. या मार्गाला वाया फेराटा म्हटले जाते, ज्याद्वारे डोनेरकोगल गेल पर्वताच्या शिखरापर्यंत पोहोचता येते. डोनेरकोगल डेचस्टीन पर्वतांमध्ये गोसाउकमच्या उत्तरेस एक उंच पर्वत आहे. याची चढाई अत्यंत भीतीदायक आहे, ही चढाई करण्यास यशस्वी ठरल्यावर पर्वतावर सुंदर नैसर्गिक दृश्य पहायला मिळते. परंतु स्काय लॅडर निश्चितपणे हृदयाचे ठोके गतिमान करणारा आहे.