For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चंद्रमा

05:16 AM Nov 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
चंद्रमा
Advertisement

‘गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण’ या जुन्या गोड बालगीतामध्ये ती छोटी बहीण वहिनीला आपल्या घरी कसे आणायचे हे सांगताना म्हणते, ‘वहिनीला आणायला चांदोबाची गाडी, चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी’. चांदोबाची गाडी हे जगातले सर्वात मोठे वैभव तिला वाटते. चंद्र हा ग्रह पृथ्वीपासून प्रचंड दूरवर असला तरी पृथ्वीवरच्या माणसांच्या मनातल्या, हृदयातल्या अवकाशात तो सदैव तरळतो आहे. जन्माला आलेल्या बाळापासून ते वयाची ऐंशी वर्षे ओलांडलेल्या, सहस्रचंद्रदर्शन झालेल्या आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांशी चंद्राचे जवळचे नाते आहे.

Advertisement

सुप्रसिद्ध विदूषी दुर्गाबाई भागवत म्हणतात, प्राचीन काळापासून मानवाने चंद्राला गर्भाचा अधिष्ठाता देव मानले. चंद्र हा कालरूपी असून त्याच्या एक पासून ते बारा पावलात प्राणीसृष्टीची गर्भावस्था चिंतकांनी ध्यानात घेतली. चंद्र गर्भपिशवीच्या शिवणी शिवतो आणि आपल्या अमृतमय किरणांनी तो गर्भामध्ये जीवनाचा अंकुर रुजवतो म्हणूनही असेल कदाचित, त्याचे मानवी सृष्टीशी बहुआयामी नाते आहे. स्त्रियांचा भाऊ, मुलांचा चांदोमामा, प्रियकर-प्रेयसीचा प्रेमाचे गुज वाटून घेणारा जिवलग मित्र, एकांताचा सोबती आणि आयुष्याच्या उत्तरार्धात आठवणींची उजळणी करणारा काळप्रतिनिधी चंद्र. वैज्ञानिकदृष्ट्या चंद्र फारच वेगळा आहे. चंद्रावर ध्वनी नाही. पंधरा दिवसांची काळोखी रात्र व पंधरा दिवस चोवीस तास सूर्यदर्शन, हवा नाही. पाणी नाही. चंद्रावर गुरुत्वाकर्षण शक्ती फार कमी प्रमाणात आहे. तिथे निसर्गसौंदर्य नाही, परंतु मानवी समाजाला याच्याशी काहीही देणे घेणे नाही. रोजच्या जगण्याशी त्याचा चंद्राशी संबंध आहे. लग्नकार्य, मुहूर्त, सणवार, ग्रहण, जन्मपत्रिका या चंद्राशी निगडित आहेत. चंद्राचे नाते थांग न लागणाऱ्या मनाशी आहे. म्हणून तो देवदेवतांशी जोडलेला आहे.

आकाशातला चंद्र मानवाच्या जवळ येतो तो प्रतिबिंबातून. श्रीरामांनी लहानपणी चंद्र खेळायला आणून दे म्हणून कौसल्या मातेजवळ हट्ट धरला. तेव्हा तिने आरसा आणून त्यातले चंद्राचे प्रतिबिंब दाखवून रामाचे मनोरथ पूर्ण केले. श्रीरामांचा जन्म झाला तो भरदुपारी बारा वाजता. सूर्यवंशात. त्यामुळे सूर्याला एवढा आनंद झाला की सूर्यास्त होण्याचे काही चिन्ह दिसेना. श्रीरामांचा मानवी रूपातील विष्णूचा अवतार बघण्यासाठी तो उत्सुक होता. पूज्य डोंगरे महाराज म्हणतात, ‘श्रीरामजन्मामुळे सर्वांनाच आनंद झाला. फक्त एक चंद्र तेवढा दु:खी राहिला. तो रामांजवळ जाऊन रडत रडत म्हणाला, आपण या सूर्याला काही समजावून सांगा. बारा तासांपासून हा एकाच जागी उभा आहे’. गदिमा गीतरामायणात म्हणतात, ‘दोन प्रहरी कां ग शिरी सूर्य थांबला’..  चंद्र हा विष्णूसखा आहे म्हणून श्रीराम चंद्राला म्हणाले, तू धीर बाळग. या जन्मात सूर्याला लाभ झाला. कृष्णावतारात मी चंद्रवंशात प्रकट होऊन तुला लाभ देईन. पूज्य डोंगरे महाराज सांगतात की श्रीकृष्ण रात्री बारा वाजता प्रकट झाले तेव्हा जगात वसुदेव देवकी आणि आकाशात चंद्रमा फक्त जागे होते. बाकी संपूर्ण जग गाढ निद्रेत होते. चंद्रसख्याला श्रीरामांनी वचन दिले की माझ्या नावापुढे तुझे नाव लागेल. म्हणून श्रीरामचंद्र हे नाव भक्तांच्या सदैव मुखी आहे.

Advertisement

शिवाच्या माथ्यावर अर्धा चंद्र आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘जेथ निववील ऐशिया आशा । हरे चंद्रमा आधा ऐसा । वहिजत असे शिरसा । निरंतर?’ समुद्रमंथनातून जे विष निघाले ते हलाहल श्री शंकराने प्राशन केले तेव्हा त्याच्या अंगाचा दाह झाला. तो दाह शांत करण्यासाठी शिवाने मस्तकी अर्धा चंद्र धारण केला तेव्हा कुठे त्याचा ताप शांत झाला. माऊली म्हणतात, जिथे पूर्ण चंद्र आहे, ज्ञानाचा पूर्ण चंद्र उगवलेला आहे तिथे माणसाला समाधान मिळणारच. चंद्र हा शीतल आहे. श्री गणपतीच्या बारा नावातील नववे नाव भालचंद्र आहे. शिवशंकराचे सेवक, भक्त शिवगण यांचा गर्व नाहीसा व्हावा म्हणून एक दिवस बालगणेशाने विश्रांती घेत पहुडलेल्या शिवाच्या मस्तकावरील चंद्र हळूच काढून खेळायला घेतला. शंकर विश्रांतीतून जागे झाल्यावर त्यांच्या लक्षात आले की मस्तकी चंद्र नाही. त्यांनी शिवगणांना विचारल्यावर ते म्हणाले, गणेश चंद्र खेळायला घेऊन गेला. शिवशंकर म्हणाले, जा गणेशाला घेऊन या. शिवगणांनी गणेशाला पकडून उचलून, सर्व शक्ती पणाला लावून आणण्याचा प्रयत्न केला परंतु गणेश हाती लागला नाही तेव्हा त्यांना गणेशाचे सामर्थ्य कळले. निरुपाय होऊन त्याच्यापाशी बसून, त्याला निरखून ते पाहू लागले तेव्हा चंद्रासह भगवान शंकर त्याच्यापाशीच बसलेले त्यांना दिसले तेव्हा त्यांचा गर्व नष्ट झाला.

श्रीसूक्तम् मध्ये लक्ष्मीला ‘चंद्रां’ असे म्हटले आहे. चंद्र हा थंड, आनंददायी, आल्हाददायक आहे. पूजनीय पांडुरंगशास्त्राr आठवले म्हणतात, चंद्रामध्ये तृप्ती आहे, संतोष आहे. शास्त्राrजी संतोष कशाकशातून येतो हे समजावून सांगताना म्हणतात, संतोष अगतिकतेतूनही येतो. म्हणजे कोह्याला द्राक्ष आंबट या म्हणीनुसार एखादी गोष्ट मिळणे शक्य नसते तेव्हा अगतिकतेमधून तृप्ती येते तो संतोष नाही. अज्ञानातून येणारा संतोष म्हणजे एखादी असाध्य गोष्ट मिळवणे सोपे नसते तेव्हा असंतुष्टता येते. चंद्रां या शब्दात संतोष समजून, ज्ञानपूर्वक आलेला परिपूर्ण संतोष आहे. ज्या संतोषातून प्रसन्नता व परिपूर्णता येते ती लक्ष्मी म्हणजे ‘चंद्रां’ होय. चंद्र आणि लक्ष्मी समुद्रमंथनातून उत्पन्न झाल्यामुळे ती चंद्राची सख्खी बहीण आहे.

शंभर वर्षांपूर्वी जात्यावर ओव्या गाणाऱ्या स्त्रियांनी समुद्राला विचारले, तू सतत का ओरडतोस? तुझे काय हरवले आहे? तुझी वेदना कोणती? त्यावर उत्तर कोणते?  तर ----‘समुद्रा रे बाबा, किती टाहो तू फोडशी? पुत्र तुझा गोरा गोरा, जाऊन बसला आकाशी..’ त्याचा चंद्र हा गोरागोमटा मुलगा आकाशात जाऊन बसला म्हणून समुद्र सारखा ओरडतो.

जसे सूर्यस्नान असते तसे चंद्रस्नान करावे असे शास्त्र सांगते. चंद्रस्नानामुळे मनाचा मळ निघून जातो. चित्त स्थिर होते. असे स्नान पौर्णिमा या तिथीला चंद्रप्रकाशात राहून करतात. स्वामी मुक्तानंदांना दिल्लीमध्ये चंद्रावरून आणलेल्या मातीचे संशोधन करणारे वैज्ञानिक भेटले होते. त्यांनी स्वामींना सांगितले की ही माती हातात घेऊन बसले की मन शांत होते. शून्य होते. काहीच स्फुरत नाही. जे अमेरिकन, रशियन चंद्रावर जाऊन परत आले त्यांची मनोवृत्ती बदलली असा रिपोर्ट आहे. चंद्राचा असा महिमा आहे. जसा रोज सूर्यनमस्कार तसाच रोज चंद्रालाही नमस्कार करावा. चित्तस्थिरता मागून घ्यावी आणि तृप्ती, शांतता अनुभवावी. सुखाने जगावे. मनावरचे औषध फक्त चंद्रमा आहे.

-स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :

.