आक्रमणांवेळी मठ परंपरेने गोव्याला सांभाळले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार : श्रीरामांच्या सर्वात उंच मूर्तीचे अनावरण,पर्तगाळ जिवोत्तम मठाची सार्ध पंचशताब्दी,रामायण थीम पार्कचे शानदान उद्घाटन
काणकोण : गोव्यावर ज्या ज्या वेळी संकटे आली आणि आक्रमणे झाली त्या प्रत्येकवेळी अध्यात्म आणि सेवा या बळावर समाजात स्थिरता आणतानाच प्रेरणा देण्याचे काम मठ परंपरेने केलेले आहे. भक्ती आणि संत परंपरेचा वारसा असलेल्या तसेच 550 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या श्री गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठाकडे यापुढे भारतातील एक महत्वाचे आध्यात्मिक केंद्र म्हणून पाहिले जाईल, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काणकोण तालुक्यातील पर्तगाळी येथील श्री प्रभू रामचंद्राच्या 77 फूट उंचीच्या भव्य कांस्य मूर्तीचे अनावरण केल्यानंतर जनसमूदायाला संबोधित करताना काढले.
शुक्रवारी दुपारी 3.30 वा. खास हेलिकॉप्टरने पर्तगाळी येथे उभारलेल्या हेलिपॅडवर पंतप्रधानांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम पर्तगाळी मठाचे प. पू. श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांच्या समवेत 77 फूट उंचीच्या भव्य मूर्तीचे अनावरण केले. त्याच ठिकाणी तयार केलेल्या थीम पार्कचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधानांनी श्री प्रभू राम आणि श्री वीर विठ्ठल मंदिराला भेट दिली. या मठाचा जीर्णोद्धार आणि अन्य बांधकामांनी आपण प्रभावित झालो असून साधू-संतांच्या सान्निध्यात मनाला शांती मिळते, असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प. पू. श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराज, राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, क्रीडामंत्री डॉ. रमेश तवडकर, केंद्रीय मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, उपाध्यक्ष आर. आर. कामत उपस्थित होते.
पर्तगाळी मठ दिशा दाखविणारे केंद्र
पर्यावरण हा धर्म, धरती ही माता आणि मठाच्या प्रकृतीचा मान राखणाऱ्या अशा भागाला आणि या मठाला भेट देतानाच भव्य अशा प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचे अनावरण आपल्या हातातून होत आहे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. हा मठ म्हणजे लोकांना दिशा दाखविणारे केंद्र आहे. पूर्वसुरींनी ज्या भावनेने मठाची स्थापना केली ती भावना पुढे नेताना साधना व सेवा यांना जुळवून नेण्याचे काम आणि समाजाला अध्यात्म्याकडे नेण्याचे काम विद्यमान स्वामी महाराज करत असल्याचे पंतप्रधान मोदीं पुढे म्हणाले.
श्रीराममूर्ती उभारुन नवा अध्याय सुरु
या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची उभारणी करून मठाने एक नवीन अध्याय सुरू केला आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी ज्ञान, प्रेरणा, साधना यांचे हे केंद्र बनेल. मागच्या दीड ते दोन वर्षांत लाखो श्रद्धाळू भक्तांनी रामनाम जप केला. बद्रीनाथ येथून श्रीराम दिग्विजय रथयात्रा सुरू झाली. गुरू परंपरेला साजेसा द्वैत सिद्धांत मठ परंपरेने पुढे नेला. हा मठ त्यागाबरोबरच विनम्रता, संस्कार आणि सेवा या मूल्यांना स्थिर ठेवणारे, धर्माबरोबरच मानवता व संस्कृतीचे रक्षण करणारे तसेच विद्यार्थी, वृद्ध, गरीब लोकांसाठी कल्याणकारी योजना आणणारे केंद्र बनणार आहे, असे मोदी यांनी सांगितले. गोव्यावर अनेक संकटे आली, तरी येथील मंदिर संस्कृती अबाधित राहिली असे सांगून त्यासाठी योगदान दिलेल्या सर्व शक्तींचे पंतप्रधानांनी यावेळी कौतुक केले.
स्वत:च्या, देशाच्या विकासासाठी नऊ संकल्प करा
स्वत:च्या विकासाचे, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी एकतेच्या मंत्रासह नऊ संकल्प करा. 1. पर्यारवरण रक्षण करा, 2. वृक्षारोपण करा, 3. स्वच्छता राखा, 4. स्वदेशी वापरा, 5. देशदर्शन करा, 6. नैसर्गिक साधनांचा स्वीकार करा, 7. आरोग्याची काळजी घ्या, 8 योग-खेळ रोज करा 9, गरिबांची सेवा करा, अशा नऊ संकल्पांचा स्वीकार करण्याचे आवाहन मोदीजींनी केले. परंपरा जिवंत असेल, तरच समाज पुढे जाऊ शकेल. देशाच्या पर्यटनात गोव्याचे फार मोठे योगदान आहे. युवकांनी सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि राष्ट्रसेवा या क्षेत्रांकडे लक्ष द्यायला हवे, असेही प्रधानमंत्री म्हणाले.
... हा 140 कोटी भारतीयांचा गौरव
प. पू. स्वामी महाराजांनी आपला जो गौरव केला आहे तो भारतातील 140 कोटी जनतेचा गौरव असल्याचे मत पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कोकणीतून केली. श्री गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठाच्या सार्ध पंचशताब्दीनिमित्त यावेळी पंतप्रधानांनी 550 रुपयांचे नाणे आणि टपाल तिकिटाचे अनावरण केले. सुरुवातीला पंतप्रधान मोदी यांनी प. पू श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांना पुष्पहार घातला. यावेळी स्वामी महाराजांनी पंतप्रधानांचे पुष्पहार आणि शालजोडी घालून स्वागत केले. मठाचे आद्य श्रीमद् मध्वाचार्य यांची चांदीची प्रतिमा याप्रसंगी पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना प्रदान करण्यात आली.