कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वाट चुकलेली शिमगोत्सव मिरवणूक

06:38 AM Mar 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्यात 15 मार्चपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय शिमगोत्सवाची दि. 29 रोजी मांद्रे येथे सांगता होणार आहे. शिमगोत्सव संपला तरी कवित्त्व राहिले, या उक्तीनुसार पहाटेपर्यंत चाललेल्या मिरवणूका हा यंदा चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला. प्रथेप्रमाणे राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या फोंडा तालुक्यातून या सार्वजनिक शिमगोत्सवाला सुऊवात झाली. सायंकाळी सुरू झालेली ही मिरवणूक आटपायला पहाट उजाडली. फोंड्यातून सुरू झालेला हा विलंबित राग पुढे मडगाव, पणजी, वास्को या शहरामध्येही सुरूच राहिला आणि संपूर्ण उत्सवाचाच बेरंग करून टाकला.

Advertisement

 

Advertisement

फोंड्यासह राजधानी पणजी व राज्याच्या विविध तालुक्यांमध्ये होणारा हा शिमगोत्सव पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थिती लावतात. लोककला पथके, पारंपरिक जती गात ‘ओस्सयऽऽ’च्या तालावर वाजत गाजत निघणारे रोमटामेळ आणि पौराणिक देखाव्यांवर आधारित भव्य आकाराचे स्वयंचलित देखावे, हे या मिरवणुकीचे आकर्षण अगदी लहान मोठ्यांना असते. यंदाच्या शिमगोत्सवात काहीतरी चांगले, आगळेवेगळे पाहायला मिळणार, याच उत्सुकतेने आलेल्या हजारो लोकांचा या कलापथकांनी अपेक्षाभंग केला. शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी करुन तासन्तास थांबलेल्या प्रेक्षकांना यंदा एक वेगळाच शिमगा पाहायला मिळाला. आयोजकांसह, कलापथपे व सरकारचाही निष्काळजीपणाच त्यातून उघड झाला. ज्या जनतेच्या नावावर, शिमगोत्सव मिरवणुकीच्या आयोजनावर काही कोटी खर्च करायचे आणि तिलाच अशा उत्सवातून आनंद मिळणार नसल्यास ही उधळपट्टीच म्हणावी लागेल.

गोव्यात शिमगोत्सवाची परंपरा तशी फार जुनी आहे. येथील बहुजन व कष्टकरी समाजाचा हा महत्त्वाचा सण असून गावोगावी पारंपरिक शिमगा खेळून झाल्यावर सार्वजनिक शिमगोत्सवाला दणक्यात सुऊवात होते. गोव्यातील शिमगोत्सव मिरवणूक हे लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारे वेगळे वैशिष्ट्या मानले जाते. राजस्तरीय स्पर्धेमुळे त्याला व्यापक स्वऊप आले आहे. हल्ली राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकार पर्यटन खात्यामार्फत कार्निव्हल आणि शिमगोत्सवावर कोट्यावधी रुपये खर्च करते. जगभरातील पर्यटकांना गोमंतकीय कलेचे दर्शन व्हावे, हा त्यामागील उद्देश आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या मिरवणुका पाहिल्यास पर्यटक सोडाच गोमंतकीय जनतेलाही या कलापथकांचे दर्शन दुर्मीळ होऊ लागले आहे. स्थानिक आयोजकांनी शिमगोत्सवाची महिन्याभरापासून तयारी करायची आणि त्यातून काहीच निपजणार नसल्यास, हा खटाटोप कशासाठी व कुणासाठी, असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

गेल्या एक-दोन वर्षांमध्ये निवडणुकांच्या आचारसंहितेमध्ये शिमगोत्सव मिरवणुका अडकू लागल्याने सादरीकरण घाईगडबडीत करावे लागते, अशा कलापथकांच्या तक्रारी होत्या. यंदा त्याला मोकळीक मिळाली. प्रथेप्रमाणे फोंडा शहरातून शिमगोत्सव मिरवणुकीला सुरुवात झाली. आयोजकांनी जय्यत तयारी करूनही कला पथकांनी वेळेशी दगा दिला. वेशभूषा कलाकार आणि काही लोककला पथकांनी थोडी-फार करमणूक केली तेवढीच. पुढे रेंगाळत चाललेली मिरवणूक रोमटामेळामध्येच अडकून पडली. त्यात काही चित्ररथ देखावेही फसले. हा गोंधळ आयोजक व पोलिसांनाही आटोक्यात आणणे कठीण होऊन बसले. त्यामुळे साधारण दहा तास चाललेल्या या मिरवणुकीत, ना धड रोमटामेळ नाचले व ना चित्ररथ देखावे दिसले. फोंड्यातील हा फसलेला प्रयोग पुढे मडगाव, पणजी, वास्को या सर्वच ठिकाणी फसत गेला.

राज्यस्तरीय शिमगोत्सव हे गोव्यातील एक सांस्कृतिक वैशिष्ट्या म्हणून माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी तीस वर्षांपूर्वी शिमगोत्सवासह गोव्यातील काही लोकोत्सव सार्वजनिक व्यासपीठावर आणताना त्यांना राजाश्रय दिला. स्पर्धांच्या माध्यमातून ही परंपरा जपली जाईल व कला पथकांना पुढे येण्यास प्रोत्साहन मिळेल, हा त्यामागील शुद्ध हेतू होता. सुऊवातीला काही मोजक्याच शहरांमध्ये ही मिरवणूक आयोजित केली जात होती. सायंकाळी लवकर सुरू होऊन वेळेत आटोपली जायची. अर्थात त्यावेळी मोजकीच पथके व रोमटामेळही मर्यादित असत. सायंकाळी 4 वा. सुरू होणारी मिरवणूक रात्री जेमतेम 10 वा.पर्यंत संपायची. त्यानंतर निकाल व बक्षिसवितरणही व्हायचे.

कालांतराने प्रत्येक तालुक्यामध्ये आणि आपल्या मतदारसंघातही शिमगोत्सव व्हावा, या मंत्री-आमदारांच्या अट्टहासामुळे या मिरवणुकीला वेगळेच स्वरुप प्राप्त झाले. त्यात राजकीय रंगही नकळतपणे मिसळत गेले. रोमटामेळांचा आकडा व त्यात सहभागी होणाऱ्या तालगड्यांची संख्याही 300 ते 400 वर पोहोचली. स्वयंचलित चित्ररथ देखाव्यांचे स्वरुपही विस्तारल्याने त्यांचे व्यवस्थापन व नियोजन आयोजकांच्या हाताबाहेर पोहोचले. स्पर्धांच्या निकालावरून वाद व भांडण-तंटे होऊ लागल्याने प्रत्येक निकाल दुसऱ्या दिवशी जाहीर करण्याचा पर्याय आयोजकांनी निवडला आहे पण वेळेचे व्यवस्थापन कोलमडत गेले. हल्ली कला सादरीकरणापेक्षा त्यातील टोकाच्या स्पर्धेमुळे रोमटामेळ व चित्ररथांमध्ये लागणारी चुरसही नियमांच्या चौकटी तोडीत आहे. आयोजक व स्पर्धकांमधील सहयोगाचा अभाव त्यात दिसतो.  निवडणुकीच्या काळात आचारसंहिता सुरू असताना होणाऱ्या मिरवणुका वेळेत सुरू होऊन आटोपल्या जातात. ही एकंदरीत व्यवस्था हाताळणारी यंत्रणा हे करू शकते तर स्थानिक आयोजक कुठे कमी पडतात, हे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

राज्यात तब्बल 17 ठिकाणी होणाऱ्या शिमगोत्सवातून पोलीस यंत्रणेवरही प्रचंड ताण येत असून हे सर्व हाताळताना एका व्यवस्थेला वेठीस धरले जाते, याचे भानही सुटत आहे. काही ठिकाणी चाललेल्या स्पर्धांमध्ये लांबलचक रोमटामेळ पथके केवळ परीक्षकांच्या प्लॅटफॉर्मजवळच सादरीकरण करून वेळ मारून नेत असल्याचा अनुभवही लोकांना येऊ लागला आहे. कलेचे दर्शन लोकांना घडविण्यापेक्षा स्पर्धा व मानधनाच्या उद्देशानेच येणाऱ्या पथकांवर नियंत्रण हवे. काही ठिकाणी आयोजकांनी या प्रकारांना आळा घालण्यासाठी शिस्त व कडक नियम घालून पाहिले. त्यातून फारसा फरक पडलेला नाही. शिमगोत्सवाची ही मिरवणूक एका वेगळ्याच मार्गाने जात असल्याचे शिक्कामोर्तब यंदा त्यावर झाले.

रोमटामेळांसाठी महिनाभर तयारी करायची. चित्ररथ उभारण्यासाठी काही लाख खर्चून रात्री जागवायच्या आणि त्याला लोकाश्रय मिळत नसल्यास या कलांनाही फारसे महत्त्व राहणार नाही. कलापथकांनी निदान याचे भान ठेवून आयोजकांशी सहकार्य साधल्यास या कला कालानुरुप अधिकाधिक वृद्धिंगत होत राहतील व जनतेलाही त्यातून खरा आनंद मिळेल. वाट चुकलेली ही मिरवणूक निदान पुढच्यावर्षी तरी मार्गावर येईल का?

सदानंद सतरकर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article