आदिमानवाला प्रेरक दूधसागर खोरे
आदिमानवाचे जीवन सभोवताली असणाऱ्या निसर्ग आणि पर्यावरणाने प्रभावित झाले होते आणि त्यामुळे दिवस-रात्र, अष्टोप्रहर निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या आदिमानवाला त्या काळातले खडतर जीवन जगण्याचे बळ प्राप्त झाले होते. आकाशाच्या खुल्या छताखाली किंवा पावसाळ्यात शिलाश्रयात राहणाऱ्या मानवी प्राण्याला ज्याप्रमाणे ऊन, पाऊस, वादळवारा यांच्याशी सामना करावा लागत असे तसेच बऱ्याचदा जंगली श्वापदांच्या हल्ल्यांशी तोंड द्यावे लागायचे.
दक्षिण गोव्यातल्या धारबांदोडा तालुक्यातल्या सोनावल गावात जेथे दूधसागर नदीचे खोरे आहे तेथून याच नदीच्या काठावरच्या कुळे, शिगाव, बिंबल आदी गावात बऱ्याच ठिकाणी आदिमानवाच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा आढळलेल्या आहेत. त्यावरून अश्मयुगीन जीवनाच्या पैलूंचे दर्शन घडते. कर्नाटकाच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात अणशी-दांडेली व्याघ्र राखीव क्षेत्रातल्या कॅसलरॉक या निसर्ग समृद्ध गावाच्या परिसरात काटला आणि पाळणा या मुख्य नाल्यांच्या आणि बारामाही वाहणाऱ्या असंख्य ओहोळांचा उगम समुद्र सपाटीपासून 800 मीटर उंचीवर होतो. तेथून हे जलस्रोत एकत्र होऊन दूधसागर धबधब्याच्या रुपात 310 मीटर उंचीवरून सोनावल गावात कोसळतात आणि निसर्गातल्या दिव्यत्वाची प्रचिती आदिम काळापासून देतात.
दूधसागरचा धबधबा पश्चिम घाटातले नितांत रमणीय असेच नैसर्गिक स्थळ असून, काळ्या कातळांवरून कोसळणाऱ्या या धबधब्यालाच इथल्या भूमीपुत्रांनी मानवी शक्तीच्या रुपात पाहिले आणि पूजलेले आहे. दूधसागर नावाने ओळखली जाणारी ही नदी खालच्या पट्ट्यात खांडेपार म्हणून ओळखली जाते आणि खांडेपारलाच मुख्य मांडवीच्या पात्राशी एकरुप होते. बारा चौरस किलोमीटरचे दूधसागरचे खोरे पट्टेरी वाघ, बिबटा, कोळसुंदे, रानमांजर, अस्वल, शेकरू, खवले मांजर यासारख्या प्राण्यांबरोबर मलाबारी राखाडी धनेश, मोठा धनेश, सर्पगरुड, ब्राह्मी घार सारख्या पक्षी जीवनाने समृद्ध आहे. 25.6 किलोमीटर लांबीच्या खांडेपार नदीच्या खोऱ्यात सदाहरित जंगलाबरोबर पानगळतीची वृक्षसंपदा आहे. नैसर्गिक गुंफा, मांसयुक्त जंगली श्वापदे, मोसमी खाण्यायोग्य फळे-फुले, कंदमुळे आणि दगडाची ओबड-धोबड शस्त्रे बनविण्यासाठी उपलब्ध दगड-गोटे यामुळे आदिमानवाला दूधसागराच्या खोऱ्याची मोहिनी पडली नाही तर नवल मानावे लागेल!
पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. शंकर साळी यांनी 1965 साली दूधसागर खोऱ्याला भेट दिली असता त्यांना प्रागैतिहासिक काळातील आदिमानवाच्या वापरातले एकमुखी गारगोटीचे शस्त्र आढळले. 1983 साली पुणेच्या डेक्कन कॉलेजच्या डॉ. ए. आर. मराठे यांना मध्य प्रागैतिहासिक आणि उत्तर प्रागैतिहासिक कालखंडातली आदिमानवाशी निगडीत एकमुखी आणि द्विमुखी दगडी कोयता, तासणी, टोकदार छिन्नीसारखी शस्त्रे दूधसागर नदीच्या खोऱ्यात शिगाव ते कुळे परिसरात आढळली होती. त्यानंतर कर्नाटक विद्यापीठाचे पुरातत्वज्ञ लुथेर गौडेल्लेर आणि रवी कोरीसेट्टर यांनी संयुक्तरित्या हाती घेतलेल्या शोधमोहिमेत उत्तर प्रागैतिहासिक काळातील हातकुऱ्हाडी, कोयते, चाकूसारखी दगडी शस्त्रे आढळली होती. कुळे, शिगाव, बिंबल आणि सोनावल या दूधसागर नदीच्या काठी वसलेल्या गावांत अश्मयुगीन मानवाच्या बऱ्याच पाऊलखुणा संशोधकांना आढळल्या कारणाने हे खोरे इतिहासपूर्व काळापासून आदिमानवाला आकर्षिक करीत होते, याची कल्पना येते.
सर्वभक्षक अशा काळाने इतिहासाच्या उदरात गडप केलेल्या हजारो वर्षांच्या प्राचीन वारशाच्या असंख्य पैलूंचा शोध घेण्याची अपूर्व कामगिरी दूधसागर नदीच्या खोऱ्यात पुरातत्त्वज्ञांनी केल्याकारणाने हा परिसर आदिमानवांसाठी सातत्याने आकर्षणबिंदू ठरला होता, याची जाणीव होते. लाखो वर्षांपूर्वी दूधसागर नदीचे खोरे वृक्षवेलींनी नटलेले एक निबिड अरण्य होते. त्याचप्रमाणे आदिमानवाला दगडी हत्यारे बनविण्यासाठी लागणारा गारगोटीसारखा दगड उपलब्ध होता.
या दगडाची सहज आणि सफाईदारपणे हत्यारे बनविण्याचे कौशल्य येथील आदिमानवाला लाभले होते. त्याची प्रचिती गेल्या पन्नास वर्षांत पुरातत्त्वज्ञांनी हाती घेतलेल्या शोधमोहिमांतून आलेली आहे. जगात अन्यत्र जी अश्मयुगीन हत्यारे प्राप्त झालेली आहेत, ती गारगोटीच्या दगडापासून बनवलेली आहेत आणि असा दगड दूधसागर खोऱ्यात उपलब्ध होत असतो. तुलनात्मकदृष्ट्या भूस्तर रचना, ठिकठिकाणी नदीच्या खोऱ्याच्या परिसरात आढळलेली दगडी हत्यारे याद्वारे आदिमानवाच्या आतापर्यंतच्या अनिश्चित मार्गाचा शोध लागण्यास साहाय्य झालेले आहे.
अश्मयुगीन कालखंडात पर्जन्यवृष्टीचे प्रमाण हे सध्यापेक्षा जास्त होते आणि हवामानही दमट होते. तसेच नद्यांची पात्रेसुद्धा बरीचशी विशाल झालेली होती. दूधसागर नदीच्या खोऱ्यात अश्मयुगीन मानवाच्या जगण्यासाठी आवश्यक पाणी, कंदमुळे, घनदाट अरण्यात जंगली श्वापदांचा मुक्त संचार आणि त्यांची शिकार करण्यासाठी दगडी हत्यारांची गरज पूर्ण करणारा कच्चा माल उपलब्ध होते. त्याकाळी तोडणे, कापणे, छिद्रे पाडणे, भोसकणे, कुटणे, वाटणे, छिलके काढणे आदी कामांसाठी हत्यारांची गरज महत्त्वाची होती. त्याकाळात दूधसागर खोऱ्यात वावरणारा आदिमानव निसर्गावरतीच बहुतांश गोष्टींसाठी अवलंबून होता आणि हत्यारांच्या निर्मितीसाठी कोणत्या दगडाचा कसा वापर करायचा, याचा सारासार विचार करण्याची कुवत त्याच्याजवळ होती.
निसर्गाच्या प्रक्रियेत जे दगड चपटे, सपाट, अणकुचीदार लांबट स्वरुपात आढळायचे ते त्याने हत्यारे बनविण्यासाठी निवडले आणि जुजबी ठाकठोक करून त्यांचा वापर आरंभला. आकाराने रुंद आणि एका बाजूला धार असलेली हत्यारे त्याने दगडापासून ज्या चिपा काढल्या, त्याच्यापासून बनविली होती. त्यांचा धारदार बाजूचा आकार आणि ही हत्यारे हातात धरून त्यांनी जनावराच्या मांसाचे तुकडे आणि वेळप्रसंगी वृक्ष तोडण्यासाठी वापर केला होता.
वेगवेगळ्या आकारातल्या दगडी हत्यारांचा उपयोग कोणकोणत्या कारणांसाठी करायचा याचे ज्ञान त्याला अनुभवाद्वारे प्राप्त झाले होते. कर्नाटकातल्या कॅसलरॉक येथील कातळावरून कोसळणारा दूधसागर धबधबा आणि सोनावल ते शिगावपर्यंतचे या नदीचे खोरे अश्मयुगात आजच्यापेक्षा भिन्न होते. असे असले तरी या नदीचे एकंदर स्वरुप पाहता, करंझोळ येथील देवराई, गूढरम्यतेला कवेत धरणारी देवचाराची कोंड आणि बारामाही वाहणारा नदीचा प्रवाह... आदी बाबी या परिसरातल्या हजारो वर्षांच्या इतिहासाची साक्ष देत असतात आणि आधुनिक मानवालाही अचंबित करतात.
- राजेंद्र पां. केरकर