कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाकिस्तानात लोकशाहीवर लष्कराची कुरघोडी

11:11 AM May 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पी. जे. एस. पन्नू ,लेफ्टनंट जनरल (निवृत्त)

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांची पदोन्नती ‘फिल्ड मार्शल’ या सर्वोच्च स्थानी झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानवर लष्कराची पकड अधिक घट्ट झाली आहे. परिणामी पाकिस्तानातील लोकशाही आणि लोकशाही संस्थांवर दूरगामी विपरीत परिणाम होताना दिसत आहे. किस्तानचे लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर यांची अचानकपणे ‘फिल्ड मार्शल’ या सर्वोच्च पदावर नियुक्ती झाल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. आतापर्यंत कधीही लष्कर प्रमुख या पदावर असणाऱ्या व्यक्तीला अशाप्रकारे अचानक आणि अल्पावधीत इतके उच्च पद मिळालेले नाही. विशेषत: भारताबरोबरच्या सशस्त्र संघर्षात पाकिस्तानच्या लष्कराचा पराभव झाल्यानंतर असे घडणे अशक्यच मानण्यात आले असते. भारताने पाकिस्तानविरोधात पहलगाम येथील क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर ‘सिंदूर’ अभियान चालवून पाकिस्तानचे कंबरडे मोडले.

Advertisement

त्यानंतर पाकिस्तानला आपल्या ‘डीजीएमओ’च्या माध्यमातून भारताकडे शस्त्रसंधीचा प्रस्ताव पाठविण्याची वेळ आली. त्याआधी भारताच्या वायुदलाने पाकिस्तानमधील 11 वायुतळ उद्ध्वस्त केले होते. अखेरीस पाकिस्तानला अमेरिकेच्या चरणी लोळण घ्यावी लागली. भारताने पाकिस्तानच्या डीजीएमओचा शस्त्रसंधी प्रस्ताव स्वीकारला आणि हा संघर्ष तात्पुरता थांबला. ‘सुंभ जळला तरी...’ यानुसार पाकिस्तानने त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आपला पराभव मान्य न करता जणू आपलाच विजय झाला आहे, अशा खोट्या अविर्भावात अपप्रचार सुरू केला. यासाठी पाकिस्तानने आपली सर्व अपप्रचार यंत्रणा कामाला लावली. याचाच परिणाम म्हणून जनरल मुनीर या पराभूत लष्करप्रमुखाला ‘फिल्ड मार्शल’ हे पद देण्यात आले आहे. या पदोन्नतीचा आणखी एक अर्थ असा काढला जात आहे की, ही पदोन्नती खरे तर चकवा देणारी आहे. ‘फिल्ड मार्शल’ झाल्यामुळे आता मुनीर यांना लष्करावर अधिकार गाजवता येणार नाही. मात्र दुसऱ्या अर्थाने ते आता अधिक सामर्थ्यशाली झाले असून लष्कर प्रमुख पदाबरोबरच त्यांना फिल्ड मार्शलचेही अधिकार प्राप्त झाले आहेत, असे काही तज्ञांचे मत आहे.

Advertisement

अपरिचित लष्करप्रमुख

काही काळापूर्वी असीम मुनीर यांनी अत्यंत वाद्ग्रस्त विधान केले होते. पाकिस्तानी लोक हे हिंदूंपेक्षा भिन्न असून त्यांची संस्कृती, महत्त्वाकांक्षा, सवयी इत्यादी सर्व वेगळे आहे. यातूनच द्विराष्ट्रवादाचा जन्म झाला असून या द्विराष्ट्रवादातून पाकिस्तान जन्माला आला आहे, असे ते विधान होते. द्विराष्ट्रवाद हा पाकिस्तानच्या गळ्याची नस असून हा वाद नेहमी जिवंत राहिला पाहिजे तरच पाकिस्तान जिवंत राहिल, असे प्रतिपादन त्यांनी केले होते. या त्यांच्या वाद्ग्रस्त विधानानंतर ते अकस्मात प्रकाशात आले. त्यांचे हे विधान हवेत विरते न विरते तोच या विधानापासून स्फूर्ती घेऊन दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे निरपराध आणि निशस्त्र पर्यटकांवर क्रूर हल्ला करून 26 जणांचे प्राण घेतले. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून हिंदू धर्मीयांच्या हत्या करण्यात आल्या. या हल्ल्याचा संबंध मुनीर यांच्या वाद्ग्रस्त विधानाशी जोडला जाणे स्वाभाविकच होते. हा हल्ला हमासने इस्त्रायलमध्ये घुसून तेथील ज्यूंवर केलेल्या हल्ल्याशी मिळता जुळता होता. भारताने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला ‘सिंदूर’ या अभियानाच्या माध्यमातून घेतला. 7 मे या दिवशी पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करून ते भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आले. भारताच्या या अकस्मात कारवाईमुळे पाकिस्तानला धक्का बसला. त्यानंतरचे तीन दिवस दोन्ही देशांमध्ये सशस्त्र संघर्ष होत होता.

मुनीर यांच्या विधानाचे कारण

मुनीर यांनी असे चिथावणीखोर आणि प्रक्षोभक विधान करण्यामागे विशिष्ट कारण आहे. पाकिस्तानातील आकाराने सर्वात मोठे असणाऱ्या बलुचिस्तान या प्रांतात पाकिस्तान प्रशासन आणि पाकिस्तानचे लष्कर यांच्या विरोधात मोठे बंड होत आहे. बलुचिस्तानच्या बंडखोरांनी पाकिस्तानच्या लष्कराला ‘सळो की पळो’ करून सोडले आहे. पाकिस्तानात अन्यत्रही बंडखोरी वाढत होती. या बंडखोरीवर नियंत्रण ठेवण्यात पाकिस्तानी लष्कराला अपयश येत होते. त्यामुळे लष्करप्रमुख या नात्याने मुनीर यांची प्रतिमा खराब होत होती. माजी क्रिकेटपटू इम्रान खान याच्या समर्थकांनीही पाकिस्तानी लष्कराला आव्हान देण्यास प्रारंभ केला होता.

इम्रान खान यांच्या समर्थकांनी पाकिस्तानी सेनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरावरच हल्ला करून आपली चुणूक दाखविली होती. या सर्व घडामोडींमुळे मुनीर यांचे लष्करप्रमुख पद धोक्यात येऊन ते बॅकफूटवर गेले होते. त्यांच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह लागले होते. अशा स्थितीत स्वत:चे सामर्थ्य वाढविण्याची आवश्यकता त्यांच्यासाठी निर्माण झाली. हे करण्यासाठी त्यांनी पाकिस्तानच्या दुबळ्या सरकारवर दबाव टाकून सर्व सेनादल प्रमुखांना पाच वर्षांचा कालावधी मिळवून दिला होता. आजही पाकिस्तानी लष्करावर राजकीयदृष्ट्या बहिष्कृत अशा शक्तींकडून, पाकिस्तानविरोधी बलुची बंडखोरांकडून आणि अफगाणिस्तानस्थित लढाऊ बंडखोरांकडून मोठा दबाव येत आहे. या मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष इतरत्र हटविण्यासाठी आणि स्वत:ची पकड अधिक मजबूत करण्यासाठी मुनीर यांनी हे प्रक्षोभक विधान केले होते.

दूरगामी परिणाम

मुनीर यांच्या पदोन्नतीमुळे पाकिस्तानच्या लष्करी आणि राजकीय परिस्थितीवर दूरगामी परिणाम होणार आहेत. ‘फिल्ड मार्शल’ हे पंचतारांकित पद असून अनेक देशांमध्ये ते लष्करातील सर्वोच्च पद मानण्यात येते. ज्या लष्करप्रमुखांनी युद्धात असामान्य सामरिक नेतृत्व कौशल्य प्रदर्शित केले आहे, अशांनाच हे पद देण्यात येते. ‘फिल्ड मार्शल’ हे पद एका अर्थाने शोभेचेच असते आणि ते क्वचितच दिले जाते. पाकिस्तानात हे पद प्रथम जनरल मोहम्मद आयुब खान यांना 1959 मध्ये देण्यात आले होते. त्यावर्षी त्यांनी सरकारविरुद्ध बंड करून सत्ता ताब्यात घेतली होती. ‘फिल्ड मार्शल’पद मिळाल्यानंतर आयुब खान यांनी लष्कर प्रमुख पदाचा त्याग केला होता. त्यांची ‘फिल्ड मार्शल’पदी पदोन्नती त्यांच्या अधिकाराचे प्रतिक आणि त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारी म्हणून मानली गेली होती.

भारतात दोन ‘फिल्ड मार्शल’

भारतानेही आपल्या दोन लष्कर प्रमुखांना ‘फिल्ड मार्शल’ हे पद दिले आहे. जनरल के. एम. करिअप्पा हे भारताचे प्रथम ‘फिल्ड मार्शल’ होते. नंतर जनरल सॅम माणेकशॉ ‘फिल्ड मार्शल’ झाले. दोघांनाही त्यांनी युद्धात गाजविलेल्या अतुलनीय पराक्रमामुळे आणि नेतृत्व गुणामुळे हे पद देण्यात आले होते. हे पद केवळ सन्मानदर्शक अशा स्वरुपाचे होते. हे पद मिळाल्यामुळे त्यांच्या लष्करी उत्तरदायित्वात कोणतीही वाढ झाली नव्हती. भारत आणि पाकिस्तान यांच्या ‘फिल्ड मार्शल्स’मध्ये हा महत्त्वाचा फरक असून त्याची नोंद घेतली पाहिजे.

पाकिस्तानवर परिणाम

पाकिस्तानात ‘फिल्ड मार्शल’ हे पद अधिकाराचे प्रतीक आहे. पाकिस्तानात लष्कराचे तेथील सरकार आणि प्रशासनावर पूर्ण नियंत्रण असते. ‘फिल्ड मार्शल’ या पदाला त्या देशात प्रत्यक्ष कायदेशीर संरक्षण नसले तरी या पदावरील व्यक्ती राजकीय प्रभाव दाखवू शकतो. त्यामुळे या पदावरील व्यक्तीचे कोणत्याही राजकीय आव्हानापासून संरक्षण होऊ शकते. ‘फिल्ड मार्शल’पदी असलेल्या व्यक्तीला त्या पदावरून कसे हटवावे, यासंबंधीची कोणतीही तरतूद पाकिस्तानी कायद्यामध्ये नाही. त्यामुळे पाकिस्तानात ‘फिल्ड मार्शल’ हे पद केवळ सन्मानदर्शक नसून ते प्रत्यक्ष राजकीय आणि लष्करी अधिकाराचे द्योतक आहे.

पाकिस्तान लष्कराच्या मुठीत

मुनीर यांच्या पदोन्नतीमुळे पाकिस्तानी लष्कराची तेथील राजकारण आणि प्रशासन यांच्यावरील पकड अधिक मजबूत झाली आहे. यामुळे पाकिस्तानातील लोकशाही संस्थांना धोका निर्माण झाला आहे. या पदोन्नतीमुळे पाकिस्तानात काही काळापुरता राष्ट्रवाद प्रबळ होईल किंवा स्थिरताही निर्माण होईल. तथापि दीर्घकालीन परिणामांचा विचार करता तेथील नागरी सरकार आणि विभागीय संबंध यांच्यात अस्थिरता निर्माण होऊ शकते. पाकिस्तानमधील जटील नागरी-लष्करी संबंधांचे प्रतिबिंब या पदोन्नतीत पडलेले दिसून येते. तसेच पाकिस्तानचे प्रशासन आणि पाकिस्तानचे इतर देशांशी असणारे संबंध यांच्यावरही या पदोन्नतीचा दूरगामी विपरीत परिणाम होऊ शकतो. ही पदोन्नती मुनीर यांच्यासाठी पाकिस्तानचे पुढचे अध्यक्ष बनण्याची पहिली पायरी ठरू शकते. यामुळे पाकिस्तान आता पुन्हा एकदा तेथील लष्कराच्या आणि पंजाबी प्रभावाच्या कचाट्यात सापडला आहे.

भारताची सावध भूमिका

मुनीर यांच्या पदोन्नतीकडे भारत अत्यंत सावधपणाने पाहत आहे. मुनीर यांचा धार्मिक कट्टरतावाद आणि सीमापार तणाव निर्माण करण्याची प्रवृत्ती यामुळे भारत त्यांच्या पदोन्नतीकडे संशयाने पाहत आहे. पहलगाम हल्ला आणि तत्सम इतर घटना यांच्या माध्यमातून मुनीर यांची ही प्रवृत्ती स्पष्टपणे समोर आली आहे. त्यांची पदोन्नती विभागीय अस्थिरतेला निमंत्रण देणारी ठरू शकते, अशी भारताची भावना आहे. त्यामुळे भारताने सदैव सज्ज राहण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताच्या हल्ल्यांमुळे मोठी हानी

7 मे या दिवशी भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये लष्कर ए तोयबा आणि त्याची उपशाखा असणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या तळांची प्रचंड हानी झाली. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी प्रारंभी दि रेजिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या संघटनेने स्वीकारली होती. भारताच्या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाले. त्यांच्यात अनेक महत्त्वाच्या दहशतवाद्यांचा समावेश होता. त्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराचे दहशवाद्यांशी असलेले संबंध निर्विवादपणे सिद्ध झाले. भारताच्या अचूक आणि विध्वंसक हल्ल्यामुळे भांबावलेल्या पाकिस्तानने उसने अवसान आणून भारतावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे यांच्या साहाय्याने भारतातील नागरी वस्त्यांना तसेच काही सेना तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

भारताने हे सर्व हल्ले परतवून तर लावलेच याशिवाय पाकिस्तानच्या 11 वायुतळांवर अचूक हल्ले चढवून ते पूर्णत: उद्ध्वस्त केले. वास्तविक हा पाकिस्तानचा पराभव होता पण पाकिस्तानने आपल्या मिडियाला हाताशी धरून हा आपला विजय असल्याचे भासविले. त्यामुळे मुनीर यांना विजयी योद्धा म्हणून मिरविण्याची खोटी संधी प्राप्त झाली. या सर्व गदारोळात मुनीर यांच्या साहाय्याला पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयही धावून आले. मुनीर यांना पाकिस्तानातील नागरिक आणि राजकीय नेते यांच्या विरोधात कोर्टमार्शल करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने प्राप्त करून दिला. त्यामुळे पाकिस्तानच्या लष्कराला विरोध करणाऱ्या राजकीय संघटना आणि नेत्यांविरोधात मुनीर यांच्या हाती एक प्रबळ शस्त्र आले. या शस्त्राचा उपयोग करूनच मुनीर यांनी पाकिस्तानच्या दुबळ्या आणि कणाहीन सरकारवर दबाव टाकून स्वत:ची ‘फिल्ड मार्शल’पदी पदोन्नती करून घेतली असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article