उंदीर चालवू लागले कार
वैज्ञानिकांनी केली कामगिरी
माणसांना कार चालविताना तुम्ही पाहिलेच असेल. चित्रपटांमध्ये माकड स्टेअरिंग पकडून असल्याचेही पाहिले असेल. परंतु कधी उंदरांना कार चालविताना पाहिले आहे का? अलिकडेच वैज्ञानिकांनी उंदरांना कार चालविण्याचे प्रशिक्षण दिले आहे.
अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ रिचमंडने उंदरांच्या एका समुहाला प्लास्टिकने निर्मित छोट्या कार्स चालविणे शिकविले आहे. याच्या बदल्यात उंदरांना फ्रूट लुप्स ब्रँडचे सीरियल खाण्यास दिले जाते, जे धान्यापासून तयार केले जाते.
उंदरांचा मेंदू माणसांप्रमाणेच असतो. त्यांच्यात कुठलेही कौशल्य लवकर शिकून घेण्याची क्षमता असते असे या अध्ययनाच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. केली लॅम्बर्ट यांनी सांगितले आहे. सर्वप्रथम वैज्ञानिकांनी छोटी प्लास्टिक कार तयार केली जी विजेने धावत होती. त्यांनी प्लास्टिकच्या डब्यात अॅल्युमिनियम प्लेट बसविली होती आणि मग त्याला चाकं जोडली होती. त्यानंतर या डब्यात कॉपर वायर जोडण्यात आली. कार चालविण्यासाठी उंदीर अॅल्युमिनियम प्लेटवर बसतात आणि कॉपर वायरला स्पर्श करतात. यामुळे सर्किट पूर्ण होते आणि गाडी पळू लागते. उंदीर स्वत:हून दिशा निवडू शकतात.
जे उंदीर खेळणी आणि अन्य उंदरांसोबत राहत होते, ते अधिक सहजपणे गाडी चालवू शिकतात असे वैज्ञानिकांना आढळून आले आहे. तर उंदरांना गाडी चालविण्यास अत्यंत प्रोत्साहन मिळत असल्याचे दिसून आले आहे. उंदरांना अस्वच्छता, दगड आणि प्लास्टिकच्या गोष्टी सर्वाधिक पसंत असतात, परंतु आता आम्ही उंदीर प्लास्टिकची कार चालवित असल्याचे पाहत आहोत.