‘म्हादई’ सभागृह समिती दीड वर्षापासून सुस्त
अनेकवेळा आश्वासने देऊनही बैठक नाहीच : कर्नाटकाकडून मात्र जोरदार प्रयत्न सुरूच
पणजी : कर्नाटक सरकार म्हादई प्रकल्पासाठी धडपडत असून केंद्र सरकारवर दडपण आणून परवान्यांची मागणी करीत असताना गोवा सरकारने म्हादईसाठी नेमलेली सभागृह समिती मात्र ‘सुस्त’ राहिल्याचे दिसून येत आहे. गणेशचतुर्थीनंतर बैठक घेण्याचे सुतोवाच जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले होते परंतु आता गणेशचतुर्थी होऊन महिना उलटला तरी बैठक न झाल्यामुळे गोवा सरकारच्या कारभाराबाबत शंका घेण्यास जागा निर्माण झाली आहे. जानेवारी 2023 मध्ये विधानसभा अधिवेशनात म्हादई प्रश्नावर चर्चा कऊन पुढील रणनीती ठरवण्यासाठी सभागृह समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर लगेच फेब्रुवारी 2023 मध्ये बैठक घेण्यात आली, तथापि त्यानंतर गेल्या दीड वर्षात आतापर्यंत एकही बैठक घेण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. ती बैठक घेण्याचे आश्वासन शिरोडकर यांनी अनेकवेळा दिले. विरोधी आमदारांनी मध्यंतरी बैठकीसाठी आवाज उठवला होता परंतु आता सध्या तरी सर्वच पातळीवर म्हादई प्रकरणी सामसूम असल्याचे दिसून येत आहे. सभागृह समितीमध्ये भाजप, काँग्रेस, मगो, आरजी, आप, गोवा फॉरवर्ड, अपक्ष अशा सर्व पक्षीय आमदारांचा समावेश आहे.