दगड कथा...1
एका तळ्याकाठी खूप दगड पडलेले होते. लहान मोठे डोंगरावरती दगड होते. या तळ्यात प्राणी पाणी प्यायला आले की जाता जाता हे दगड पायाने ढकलून, दगडाने खेळणं हा त्यांचा एक छंद असायचा. कधी कधी या तळ्याकडे काही माणसे यायची आणि चांगले चांगले दगड शोधून मूर्ती बनवण्यासाठी घेऊन जायचे. पण काही दगड मात्र या प्राण्यांनी ठोकरल्यानंतर तुकडे तुकडे होऊन पडायचे. कोणीच त्यांची दखल घ्यायचे नाही. हे सगळे दगड आता निराश झाले, दु:खी झाले आणि देवाला विनवणी करू लागले की देवा आमचाही जन्म दुसऱ्याच्या उपयोगासाठी कसा येईल तेवढे बघा. आम्ही नुसतं तिथे पडतो. कोणीही येतं, आम्हाला ठोकरतं आणि पुढे जातं. देवाला त्यांची खूप दया आली. देवाने सगळ्या पृथ्वीवरच्या दगडांना वरती स्वर्गात बोलावून घेतले. सर्वांची समजूत काढली आणि सांगितलं, तुम्हालाही असा चांगला उपयोगी प्रकार होता येईल. मी असं उत्तम काहीतरी देईन की तुमचं जीवन लाखमोलाचं होईल. आता देवाने काही दगडांच्या पोटामध्ये अनमोल रत्न ठेवून पृथ्वीच्या गर्भामध्ये पाठवले. लोकांना पाचू, माणिक, मिळू लागले, काही दगडांनी शिंपल्याचा आकार घेऊन आपल्या पोटात मोती घेतले, तर काही दगडांचे प्रवाळ बनले, काही दगडांना वेगळे रंग दिले, काही दगडांना वेगळे आकार दिले पण तरीही तिथे खूप दगड शिल्लक राहिलेच. आता एवढ्या दगडांचं करायचं काय. सगळे लोक देवाला हसायला लागले. दगड घेऊन बसलेला दगडांच्या खाणीचा मालक असं त्याचं सगळं रुप दिसत होतं. देवांनी त्याच्या कारखान्यामध्ये असलेल्या रंगांमध्ये काही दगड टाकले. वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये वेगवेगळे दगड गेले. आता ते सगळे दगड रंगीत झाले की नाही हे पाहताना एकेक दगड उचलू लागला आणि जमीनीवर तिकडे फेकू लागला, या सगळ्या कारभारात काही बारीक दगडांच्या पेट्या सांडून गेल्या. त्या पेट्या वेगवेगळ्या झाडांनी आपल्या फांद्यांवर ठेवून घेतल्या. त्या दगडांभोवती आपापल्या चवीनुसार गर ठेवले, आता त्यांची झाली चिंचा, बोरं, चेरी, आवळे, बदाम, सुपारी, पण मोठे काही दगड नारळ बनून उंच झाडांवर अडकले. पण बिया मात्र परत परत जन्माला येऊन परोपकारी बनल्या.
काही दगड मात्र गुणगुणत इकडे तिकडे फिरत होते. देवाने त्यांना गाणारे दगड, ताल निर्माण करणारे दगड बनवले आणी वेगवेगळ्या मंदिरात बसवले. लोक आवर्जून येत व दगडावरुन हात फिरवून त्यांचं गाणं, ताल कान देऊन ऐकत.