कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देव तारी त्याला कोण मारी’चा प्रत्यय

06:58 AM Mar 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दहा टनी काँक्रीट मिक्सर कारवर कलंडूनही दोघे आश्चर्यकारकरित्या बचावले : वैभवनगरनजीक महामार्ग फाट्यावर दुर्घटना

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

डॉ. पराप्पा मग्याप्पा बाळीकाई (वय 37), निंगाप्पा तिप्पाण्णा कोप्पद (वय 32) दोघेही राहणार भागोजीकोप्प, रा. रामदुर्ग अशी बचावलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

अपघातानंतर काँक्रीट मिक्सर चालकाने तेथून पलायन केले आहे. अग्निशामक दलाचे जवान, पोलीस व नागरिक यांच्या प्रयत्नातून अपघातानंतर काही मिनिटात कारमधील दोघा जणांना सुखरूप बाहेर काढणे शक्य झाले. काँक्रीटने भरलेले वाहन कारवर कलंडल्याने कार पूर्णपणे निकामी झाली आहे. तरीही आश्चर्यकारकरित्या कारमधील दोघे जण बचावले.

घटनेची माहिती समजताच गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राज अरस, वाहतूक विभागाचे एसीपी जोतिबा निकम, उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत तोटगी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. महामार्गाला लागूनच सर्व्हिस रोडवर बेळगावच्या प्रवेशद्वारावर घडलेल्या या अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली होती.

काँक्रीट  मिक्सर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने घटना

उपलब्ध माहितीनुसार डॉ. पराप्पा व निंगाप्पा हे दोघे आपली वॅगनआर कार वैभवनगर येथील शोरुमला घेऊन जात होते. सर्व्हिसिंगसाठी हे दोघे बेळगावला आले होते. वैभवनगरजवळ सर्व्हिस रोडवर केए 25 एमडी 6506 क्रमांकाची कार उभी करून ते आपल्या एका नातेवाईकाची प्रतीक्षा करत होते. त्यावेळी भरधाव काँक्रीट  मिक्सर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटून ते वाहन थांबलेल्या कारवर कलंडले. काँक्रीट  मिक्सर वाहनामध्ये तब्बल तीन टन काँक्रीट होते.  वाहनासह त्याचे वजन सुमारे दहा टन इतके होते. या वाहनाच्या वजनामुळे कार संपूर्ण झेजरली. या अपघातानंतर कारमधील दोघा जणांनी फटीतून आपले हात बाहेर काढून मदतीची याचना केली. लगेच अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अग्निशामन अधिकारी शशीधर निलगार, वाय. जी. कोलकार, महांतेश शिंगण्णावर, कल्लाप्पा येळ्ळूरकर, नजीरसाब पैलवान, दीपक गरग आदी घटनास्थळी दाखल झाले.

तातडीने दोन क्रेन मागवण्यात आल्या. क्रेनसोबत आलेल्या दहाहून अधिक जणांनी सुरुवातीला कारवर कलंडलेले काँक्रिट मिक्सर वाहन बाजूला काढले. त्यानंतर कारमध्ये अडकलेल्या दोघा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मदतकार्यात भाग घेणारे गौस सय्यद म्हणाले, तातडीने साऱ्यांच्या सहकार्याने मदतकार्य राबविल्यामुळे कारमधील दोघे जण सुखरूप बाहेर आले. कारची अवस्था पाहिली तर कारमधील कोणीही वाचतील, अशी आशा नव्हती. मात्र, केवळ दैव बलवत्तर म्हणून हे दोघे या भीषण अपघातातून बचावले आहेत

आमच्यासाठी हा पुनर्जन्मच!

तब्बल दहा टन काँक्रीट मिक्सर वाहन कारवर उलटले, त्यावेळी आपण व आपला मित्र डॉ. पराप्पा कारमध्ये होतो. वाहनाच्या वजनाने कार चेपत चालली होती. जसजशी कार चेपत होती, तसा आमचा श्वास गुदमरत होता. या दुर्घटनेतून आम्ही दोघे सुखरूप बाहेर पडणार, याची आशाच नव्हती. तरीही अधिकाऱ्यांनी, लोकांनी आम्हाला धीर दिला. तब्बल 45 मिनिटांच्या प्रयत्नानंतर आम्हाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. आमच्यासाठी हा पुनर्जन्मच आहे, अशा शब्दात जखमी निंगाप्पा कोप्पद यांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article