रिलायन्सच्या बाजारमूल्यात 100 अब्ज डॉलर्सची पडणार भर
नवी दिल्ली : दूरसंचार ते तेल उत्पादनासह विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या दिग्गज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये येणाऱ्या काळात शंभर अब्ज डॉलरपर्यंत वाढ होऊ शकते, असा अंदाज मॉर्गन स्टॅनले यांनी नुकताच वर्तवला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या तीन दशकांमध्ये विविध व्यवसायांमध्ये गती घेताना समभागधारकांना दोन ते तीन पट परतावा दिला आहे. याच दरम्यान प्रत्येक दशकांमध्ये कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 60 अब्ज डॉलर्सने वाढलेले आहे. ब्रोकरेज कंपनी मॉर्गन स्टॅनले यांच्या मते रिलायन्स इंडस्ट्रियलची वाटचाल ही वेगाने होत असून ती आगामी काळातही कायम राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
ही विकासाची गती पाहता रिलायन्स इंडस्ट्रीचे बाजार भांडवल मूल्य 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स अशी वाढ नोंदवू शकते. भारतीय बाजारामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा वाटा हा दिवसेंदिवस वाढतच असून विविध व्यवसायांना नवे रूप देण्यासाठीही कंपनीचे प्रयत्न राहिले आहेत. या एकंदर कंपनीच्या कामगिरीकडे पाहून गुंतवणूकदारांनीदेखील गुंतवणूक करण्यासाठी समर्थता दर्शवली आहे. मॉर्गन स्टॅनलेच्या मते रिलायन्स इंडस्ट्रीजचे उत्पन्न 2023-24 ते 2025-26 यादरम्यान बारा टक्के वार्षिक दराने वाढू शकते. ज्यामध्ये सर्व क्षेत्रात कंपनीची प्रगती राहणार असून उत्पन्न देखील वाढलेले पाहायला मिळणार आहे.