आठवड्याची बाजाराची सुरुवात तेजीने
सेन्सेक्स 131 अंकांनी वधारला : नेस्ले इंडिया तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअरबाजार तेजीसोबत बंद होण्यात यशस्वी झाला आहे. सेन्सेक्स 131 अंकांनी वधारत बंद झाला असून 19 समभाग तेजीत राहिले होते.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 131 अंकांनी वाढत किंवा 0.17 टक्के वाढत 77,341 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 36 अंकांनी किंवा 0.16 टक्के वधारत 23,537 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 19 समभाग तेजीसोबत बंद झाले होते. सेन्सेक्समध्ये महिंद्रा आणि महिंद्रा, पॉवरग्रिड कॉर्प, सन फार्मा, नेस्ले इंडिया आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग सर्वाधिक वधारलेले होते. जागतिक बाजारात मात्र सोमवारी मिळताजुळता कल पाहायला मिळाला. सुरुवातीच्या सत्रात बाजारात काहीसा दबाव पाहायला मिळाला. पण दुसऱ्या सत्रात शेअरबाजार सावरताना दिसला.
बाजारात एनटीपीसी, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, टायटन, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, एअरटेल, एल अँड टी, टीसीएस, एशियन पेंटस्, मारुती सुझुकी, जेएसडब्ल्यू स्टील, एचयुएल आणि टेक महिंद्रा यांचे समभागही मजबुतीसह कार्यरत होते. तर सेन्सेक्समध्ये 11 समभाग घसरणीसह बंद झाले असून यात इंडसइंड बँक, अदानी पोर्टस्, टाटा स्टील, रिलायन्स आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग मोठ्या घसरणीत होते. यासोबत बजाज फायनान्स, एचसीएल टेक, इन्फोसिस, एसबीआय, टाटा मोटर्स आणि कोटक बँक यांचे समभागसुद्धा नुकसानीसोबत बंद झाले.
मागच्या शुक्रवारी भारतीय शेअरबाजार 269 अंकांनी घसरुन 77,209 अंकांवर बंद झाला होता. सलग 6 सत्रात शेअरबाजार याआधी तेजीत होता. याचदरम्यान बाजारातील नियामक सेबीने संदीप टंडन यांची कंपनी क्वांट म्युच्युअल फंडच्या कार्यालयावर धाड टाकून कारवाई केली असून अधिक तपास सुरु आहे.