सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ फुलली
डेकोरेशनचे साहित्य खरेदीसाठी झुंबड : सजावटीच्या साहित्यात नवीन वस्तूंचा समावेश
बेळगाव : गणपतीच्या सजावटीसाठी बेळगावची बाजारपेठ सजली आहे. मखर, लायटिंग, चौरंग तसेच प्लास्टिकचे सजावटीचे साहित्य सर्वत्र दिसू लागले आहे. यावर्षी सजावटीच्या साहित्यात नवीन वस्तूंचा समावेश झाला असून खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. लहान फुलांपासून मोठ्या तोरणांपर्यंत डेकोरेशनसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्यामुळे गणरायाच्या सजावटीमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. घरगुती गणेशमूर्ती सजावटीसाठी अनेक प्रकारचे साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहे. एलईडी माळा, एलईडी बल्ब, फोकस लाईट्स, फ्लॅश लाईट, संगीताच्या तालावर उडणारे कारंजे, धबधबे यासह इतर देखावे विक्री केले जात आहेत. थर्मोकोलसोबतच यावर्षी पुठ्ठा व कार्डबोर्डमध्ये मखर विक्रीसाठी आले आहेत. कार्डबोर्डमध्ये एलईडी बसवून नवीन प्रकारचे मखर गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत.
त्याचबरोबर कापडी मखर व मंडप अनेक ठिकाणी विक्रीसाठी आले आहेत. त्याचबरोबर सजावटीसाठी थर्मोकोलचे प्राणी, मंडपाचे खांब, नक्षीदार शीट्स विक्री केल्या जात आहेत. सजावटीसाठी प्लास्टिकच्या माळा, झुंबर, लहान दिवे, फळांच्या आकारातील दिवे विक्री केले जात आहेत. फोमशीटचा वापर करून तयार करण्यात आलेले बॅकग्राऊंड, हिरवे गवत, पाने-फुले यांची विक्री दहा रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत करण्यात येत आहे. पूजेसाठी लाकडी तसेच स्टीलचे वर्क केलेले चौरंग विक्री केले जात आहेत. गणरायासाठी शेला, किरीट, मुकुट, विविध आकारातील फुले गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. पांगुळ गल्ली परिसरात सजावटीचे प्लास्टिकचे साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. कडोलकर गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोड या परिसरात मखर तसेच इतर सजावटीचे साहित्य विक्री करण्यात येत आहे. गणपत गल्ली, मारुती गल्ली, भातकांडे गल्ली, मेणसी गल्ली, शनिमंदिर रोड या परिसरात प्लास्टिक व सजावटीचे साहित्य विक्री केले जात असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे.
हरितालिका पूजन उद्या 
भाद्रपद शुक्ल तृतीया मंगळवारी (दि. 26) असून या दिवशी हरितालिका पूजन होणार आहे. बाजारात हरितालिका मूर्ती आल्या आहेत. एका बाजूला पार्वती, दुसऱ्या बाजूला तिची मैत्रीण व मध्यावर शिवलिंग अशा मातीच्या रंगीत कलाकृती घरी आणून त्यांचे पूजन केले जाते. प्रजापत दक्षाची कन्या पार्वतीने शंकराला जोडीदार म्हणून मिळविण्यासाठी हरितालिकेचे व्रत केले होते, असा संदर्भ पुराणात आढळतो. पती मनासारखा मिळावा म्हणून कुमारिकांनी हरितालिकेचे व्रत करण्याचा प्रघात आहे. विवाहानंतर मनासारखा जोडीदार मिळाला. जन्मोजन्मी असाच जोडीदार मिळावा म्हणून विवाहानंतरही सुहासिनी हरितालिकेचे व्रत व पूजन करतात. श्रावणातील मंगळागौर पूजेप्रमाणेच हरितालिकेचे पूजन करण्याची पद्धत आहे. हरितालिकेचे पूजन करणाऱ्या सुहासिनींनी त्या दिवशी शिजवलेले अन्न खाऊ नये. दिवसभर उपवास करावा. हरितालिकेची कथा वाचावी किंवा ऐकावी. दुसऱ्या दिवशी सकाळी शिवलिंगाची उत्तरपूजा करून उपवास सोडण्याची पद्धत आहे. गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर असून साहित्य खरेदीसाठी तोबा गर्दी होत आहे. हरितालिका मूर्तींचीही महिलांकडून खरेदी सुरू होती.