लक्ष्मीपूजनाच्या तयारीची बाजारात तोबा गर्दी
दिवाळीपर्वाला उत्साहात प्रारंभ : पूजेचे साहित्य, खातेकीर्द वह्यांची विक्री : काही व्यापाऱ्यांकडून लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम गुरुवारीच आटोपला
बेळगाव : दिव्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीपर्वाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. गुरुवारी लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात दिवाळीच्या खरेदीसाठी तोबा गर्दी झाली होती. विशेषत: पूजेचे साहित्य, हार, फळे, आकाशकंदील आणि इलेक्ट्रॉनिक व गृहोपयोगी साहित्याची मागणी वाढली होती. त्याचबरोबर व्यापाऱ्यांकडून खातेकीर्द वहीची खरेदी करण्यात आली. त्यामुळे बाजारात लगबग पाहावयास मिळाली.
पूजेच्या साहित्याची लगबग
बाजारात विशेषत: पूजेच्या साहित्याची लगबग पाहावयास मिळाली. अगरबत्ती, कापूर, नारळ, लक्ष्मीची मूर्ती, सुगंधी उटणे, तोरण, फळे, फुले, ऊस आदींची खरेदी झाली. बत्ताशे 180 रु., पाच फळे 60 ते 100 रु., हार 20 रु., पाच ऊस 80 रु., झेंडू दीडशे रुपये किलो, कोहाळे 100 रुपयांना एक, केळीची पाने आदींची मागणी मोठ्या प्रमाणात होती.
झेंडूचा दर भरमसाट
यंदा अतिवृष्टीमुळे फूलशेतीला फटका बसला आहे. त्यामुळे झेंडूची आवक कमी झाली आहे. परिणामी बाजारात झेंडूच्या फुलांचा दर भरमसाट वाढला आहे. एरवी 50-60 रु.किलो मिळणारा झेंडू दीडशे रुपये झाला आहे. शहरातील विविध भागात झेंडू व झेंडूच्या माळा विक्री होऊ लागल्या आहेत.
पाडव्याच्या मुहूर्तासाठी नवीन खरेदी
साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन खरेदीला पसंती दिली जाते. त्यामुळे इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक आणि वाहनांच्या शोरुममध्ये नवीन वाहनांच्या खरेदीसाठी बुकिंगही केले जात आहे. त्यामुळे शोरुममध्ये नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. त्याबरोबरच सोन्या-चांदीच्या दुकानांमध्येही खरेदी होत आहे.
पारंपरिक खातेकीर्द वह्यांची खरेदी
दिवाळीत व्यावसायिक, उद्योगधंदे आणि इतर किरकोळ व्यावसायिकांकडून पारंपरिक पद्धतीने खातेकीर्द वह्यांची खरेदी होत आहे. यामध्ये रोजकीर्द रजिस्टर, व्यापारी वह्या, खातेकीर्द वह्या, विविध वर्गणी रजिस्टर, कॅशबुक, संस्थांचे रजिस्टर, बचतगट, दूध संस्था आदी वह्यांच्या खरेदीसाठी बुकडेपोमध्ये नागरिकांची वर्दळ पाहावयास मिळत आहे. खातेवही 450 ते 480 रु., रोजमेळ 1100 रु., लक्ष्मी नोटबुक 100 रुपये अशा वह्यांच्या किमती आहेत. 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन आणि राज्योत्सव दिन एकाच दिवशी आल्याने होणारी गैरसोय टाळण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी गुरुवारीच लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम केला. राज्योत्सव दिनानिमित्त शहरात गर्दी आणि गोंधळाचे वातावरण असते. त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी गुरुवारीच लक्ष्मीपूजन करणे पसंत केले. त्यामुळे गुरुवारीही बाजारात लक्ष्मीपूजनाची धामधूम पाहावयास मिळाली.
आज लक्ष्मीपूजनाची धामधूम
बाजारात शुक्रवारी लक्ष्मीपूजनाची धामधूम पाहावयास मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांकडून तयारी सुरू आहे. दुकानांवर विद्युत रोषणाईबरोबर हार, फुलांची सजावट केली जात आहे. शुक्रवारी सायंकाळी लक्ष्मीपूजनाची एकच घाई पाहावयास मिळणार आहे.