बाजार तिसऱ्या दिवशीही विक्रमी टप्प्यावर
एफएमसीजी, दूरसंचार व आयटी क्षेत्रांमध्ये सर्वाधिक तेजी
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात सलग तिसऱ्या दिवशीच्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक हे विक्रमी कामगिरी करत बंद झाले आहेत. यामध्ये दैनंदिन साहित्याची निर्मिती करणाऱ्या कंपन्या (एफएमसीजी), दूरसंचार आणि आयटी क्षेत्रांमधील समभागांमध्ये विक्री झाल्याने बाजार मजबूत स्थितीत राहिला होता.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 51.69 अंकांनी वधारुन निर्देशांक उच्चांकी अशा 80,716.55 वर स्थिरावला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 26.30 अंकांनी वधारुन निर्देशांक 24,613.00 वर बंद झाला आहे. दिवसभरातील कामगिरी दरम्यान सेन्सेक्स 80,898.30 च्या विक्रमी पातळीवर राहिला होता. तसेच निफ्टीनेही काहीकाळ 24,661.25 ची झेप घेतली होती.
अभ्यासकांच्या माहितीनुसार सेन्सेक्स व निफ्टी यांनी शुक्रवारी विक्रमी नोंद केली होती. याचा परिणाम म्हणून विदेशी संस्थांत्मक गुंतवणूकदारांनी विक्री केली आहे. एफआयआय केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या अगोदरच भारतीय बाजारात विक्रीचा माहोल राहिला होता. यामुळे शेअर बाजारात काही कंपन्यांमध्ये उत्साहाची स्थिती राहिली होती.
मुख्य कंपन्यांमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, इन्फोसिस, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, आयटीसी आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग हे प्रामुख्याने तेजीत राहिले आहेत.
अन्य कंपन्यांमध्ये कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग हे नुकसानीत राहिले आहेत. शेअर बाजारातील उपलब्ध आकडेवारीनुसार सोमवारी 2,648.78 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी झाली आहे.
जागतिक स्थिती
जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई आणि चीनचा शांघाय कम्पोझिट हे लाभात राहिले आहेत. तर हाँगकाँगचा हँगसेंग हा प्रभावीत होता. तसेच जागतिक बाजारात कच्चे तेल ब्रेंट क्रूड 0.80 टक्क्यांनी घसरुन 84.13 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.