5 कंपन्यांचे बाजार भांडवल 1 लाख 67 हजार कोटीने घटले
बाजार 1100 अंकांनी घसरणीत होता : एचडीएफसी
मुंबई :
आघाडीवरच्या 10 पैकी 5 कंपन्यांचे बाजार भांडवल शेअरबाजारात मागच्या आठवड्यात 1 लाख 67 हजार कोटी रुपयांनी घटले आहे. यामध्ये एचडीएफसी बँक सर्वाधिक नुकसानीत राहिली आहे.
मागच्या आठवड्यात शेअरबाजारात बीएसई सेन्सेक्स 1144 अंकांनी घसरणीत होता. 20 जानेवारी शेअरबाजाराचे विशेष सत्र घेतले होते. रिलायन्स इंडस्ट्रिज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या भांडवलात घट झाली. पण दुसरीकडे आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, भारती एअरटेल, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि आयटीसी या कंपन्यांचे बाजार भांडवल वाढले आहे. एचडीएफसी बँकेच्या बाजार भांडवलात 1,22,163 कोटींची घट होऊन 11,22,662 कोटी रुपयांवर राहिले होते. शुक्रवारी या बँकेचे समभाग सलग तिसऱ्या दिवशी घसरणीत हेते. हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल 17,845 कोटी रुपयांनी घटून 5,80,184 कोटी रुपयांवर पोहचले आहे. टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 7720 कोटींनी आणि स्टेट बँकेचे मूल्य 2008 कोटी रुपयांनी घसरणीत राहिले होते. एलआयसीच्या भांडवल मूल्यात 67,456 कोटींनी वाढ होत ते 5,92,019 कोटी रुपयांवर पोहचले होते. पाठोपाठ भारती एअरटेलने बाजार भांडवल मूल्यात 26,380 कोटींनी वाढ केली असून मूल्य 6,31,679 कोटी रुपयांवर पोहचले आहे.