‘मलप्रभा’कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात
खानापूर : खानापूर, कित्तूर आणि बैलहोंगल तालुक्याची एकेकाळी भूषण आणि शेतकऱ्यांचा आधारस्तंभ असलेल्या मलप्रभा साखर कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देणे हे आमचे आद्यकर्तव्य आहे.यासाठी मी स्वत: आणि सर्व संचालक मंडळ प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्यांनी या कारखान्याला मोठ्या प्रमाणात ऊस पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मलप्रभा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी व्यक्त केले. सुरुवातीला काद्रोळी मठाचे स्वामी डॉ. पालाक्ष शिवयोगी, बैलूर मठाचे निजगुणानंद स्वामी यांच्या हस्ते गव्हाणीचे आणि उसाच्या गाडीचे पूजन करण्यात आले.
यानंतर अध्यक्ष, संचालक मंडळ आणि उपस्थित शेतकऱ्यांच्या हस्ते गव्हाणीत ऊस टाकून गळीत हंगामाला चालना देण्यात आली. यावेळी कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार चन्नराज हट्टीहोळी बोलताना म्हणाले, कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जपले जाईल. कारखान्याचा संपूर्ण व्यवहार पारदर्शकतेने करण्यात येईल. यावर्षी 4 लाख टन उसाचे गाळपाचे उद्दीष्ठ ठरविण्यात आले असून यासाठी ऊस तोडणीसाठी 300 टोळ्यांचे नियोजन केलेले आहे. शेतकऱ्यांनी कोणतीही घाई न करता मलप्रभा साखर कारखान्याला ऊस पाठविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी केले. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी, शेतकऱ्यांनी मलप्रभा साखर कारखान्याला ऊस पाठवण्याचे आवाहन केले. उपाध्यक्ष शिवनगौडा पाटील, संचालक रामण्णा पाटील, ललिता पाटील यासह संचालक वर्ग, कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.