For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आशा कार्यकर्त्या ‘चलो बेळगाव’च्या तयारीत

12:37 PM Dec 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
आशा कार्यकर्त्या ‘चलो बेळगाव’च्या तयारीत
Advertisement

हिवाळी अधिवेशनकाळात सरकारचे लक्ष वेधून घेणार 

Advertisement

बेळगाव : आगामी हिवाळी अधिवेशन अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपले असून आपल्या विविध मागण्यांसाठी संघ-संस्थांनी मोर्चा, आंदोलनाची तयारी चालविली आहे. दरम्यान, आपल्या मागण्यांसाठी आशा कार्यकर्त्याही अधिवेशन काळात ‘चलो बेळगाव’ची हाक देण्याची तयारी करत असून राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यात येणार आहे. आपल्या हक्कांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आशा कार्यकर्त्या आंदोलनाचे अस्त्र हाती घेऊन लढा देत आहेत. मात्र दरवेळी राज्य सरकारकडून आश्वासनच देण्यात येते. पण अंमलबजावणी करण्यात येत नाही. राज्यात सुमारे 42 हजार आशा कार्यकर्त्या कार्यरत असून त्या विविध 34 विभागांची कामे  नि:स्वार्थपणे करत आहेत. मात्र त्यांना मेहनतीप्रमाणे वेतन मिळत नाही. आशा कार्यकर्त्यांना दरमहा 8 ते 9 हजार रुपयांचे वेतन देण्यात येते. यामध्ये केंद्र 3 ते 4 हजार तर राज्य सरकार 5 हजार रु. वेतन देते.

या वेतनातून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालविणे कठीण आहे. यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मुख्यमंत्र्यांनी 1 हजार रुपयांचे वेतनवाढ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र याकडेही कानाडोळा करण्यात येत आहे. तसेच केंद्राने आशा कार्यकर्त्यांना काम करणे सोईचे व्हावे, या उद्देशाने स्पर्श सॉफ्टवेअर प्रणाली लागू केली. त्यानुसार कर्नाटक ही प्रणाली लागू करणारे पहिले राज्य आहे. मात्र डाटा एंट्री करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. या सॉफ्टवेअरमध्ये डाटा एंट्री होत नसल्याने केंद्राकडून 500 ते 1 हजार रुपये कमी मिळत आहेत. तसेच ही प्रणाली लागू केल्यापासून तीन महिन्यांपासून केंद्राकडून वेतनही मिळालेले नाही. यामुळे समस्येत आणखी भर पडली आहे. काम जास्त व वेतन कमी असूनही त्या काम करत आहेत. पण समस्यांकडे दुर्लक्ष होत असून सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी हिवाळी अधिवेशनावेळी आंदोलनाच्या तयारीत आशा कार्यकर्त्या आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.