भोसलेवाडीतील लाखो रूपयांच्या लुटीतील मुख्य संशयीतास अटक!
अटकेतील संशयीत रोकड मालक कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाचा चालकच; रोकडसह त्यांचे अन्य साथिदार अद्यापी पसार; संशयीताच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगली पथके तैनात
कोल्हापूर प्रतिनिधी
भोसलेवाडी चौकालगतच्या माझी शाळेसमोरून कन्स्ट्रक्शन व्यावसायिक राहुल भोसले यांच्या चार चाकी गाडीतील 18 लाखाची रोकड बुधवारी भरदिवसा एका तरुणाने पळवून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासाअंती कन्स्ट्रक्शन व्यावसायिक भोसले यांच्या गाडीचा चालक हाच या घटनेतील मुख्य संशयीत असल्याचे उघड होताच त्याला अटक केली. महेश पाटील ( रा. पासार्डे, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. तर या गुह्यातील अन्य दोन संशयीताचा शोध सुरू असून, त्या दोन संशयीताकडेच पळवून नेलेली 18 लाकांची रोकड असल्याने, ती रोकड जप्त करण्यास यश आले नाही. या दोघा संशयीताच्या शोधासाठी पोलिसांची वेवेगळी पथके रवाना केली आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत म्हणाले, कन्स्ट्रक्शन व्यावसायीक भोसले यांच्या चार चाकी गाडीवर संशयीत आरोपी महेश पाटील ( रा. पासार्डे, ता. करवीर) चालक म्हणून दोन वर्षापासून काम करतो आहे. त्यांच्याकडे बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कंपनीचा मॅनेजर प्रसाद गावडे शाहूपुरी दुसऱ्या गल्लीतील एका बँकेतून कंपनीच्या खात्यावरून काढलेली 18 लाखांची रोकड दिली होती. ही रोकड पोत्यामध्ये ठेवून, हे पोते त्यांने चार चाकी गाडीच्या पुढच्या सीट खाली ठेवलेले होते. तो या रोकडीसह व्यावसायिक भोसले यांच्या मुलीला घेण्यासाठी भोसलेवाडी चौकालगतच्या माझी शाळेसमोर गाडी घेवून थांबला. त्याच दरम्यान एका तरूणाने गाडीतील 18 लाखांची रोकडीचे पोत घेवून पोबारा केला. या प्रकरणाची गुन्हा शाहुपूरी पोलिसात नोंद झाला आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान लाखोंची रोकड घेवून पळून गेलेल्या संशयीत चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे, सीसीटीव्ही फुटेज हाती लागले. त्यावरुन संशयीताचा शोध सुरु केला आहे.
याचवेळी पोलिसांच्या तपासात या गुह्यात कन्स्ट्रक्शन व्यावसायीक भोसले यांच्या चार चाकी गाडीवर चालक महेश पाटील यांनेच रोकड लुटण्याचा प्लॅन करून, त्या प्लॅनमध्ये दोन मित्रांना सामावून घेवून, त्या मित्राच्या मदतीने लाखोची रोकड लुटल्याची माहिती समोर आली. त्यावरून चालक पाटील याला बुधवारी रात्रीच अटक केली. पण पोलिसांना रोकड घेवून गेलेल्या त्या दोन संशयीत तरूणाचा पत्ता लागलेला नाही.