For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महामेळावा कोणत्याही परिस्थितीत होणारच!

12:30 PM Dec 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
महामेळावा कोणत्याही परिस्थितीत होणारच
Advertisement

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

Advertisement

बेळगाव : सीमावासियांचा बुलंद असा महामेळावा सोमवार दि. 9 रोजी बेळगाव येथे घेऊन कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर दिले जाईल. बेळगाव शहरामध्ये हा महामेळावा कोणत्याही परिस्थितीत होणारच. यासाठी सीमावासियांनी आपापल्या भागात जनजागृती करून महामेळावा यशस्वी करण्यासाठी तयारीत राहिले पाहिजे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी कॉलेज रोडवरील समितीच्या कार्यालयात झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते.

सरचिटणीस मल्लाप्पा गुरव यांनी प्रास्ताविक केले. मनोहर किणेकर पुढे म्हणाले, 2006 पासून बेळगावमध्ये कर्नाटक सरकार हिवाळी अधिवेशन घेत आहे. अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी म. ए. समिती व सीमावासियांच्यावतीने महामेळावा घेण्यात येतो. बेळगावात अधिवेशन घेऊन कर्नाटक सरकार आपला हक्क ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु महाराष्ट्र सरकारच्यावतीने हा वादग्रस्त सीमाभाग महाराष्ट्रात सामील व्हावा व सीमावासियांना न्याय मिळावा, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. गेली काही वर्षे कर्नाटकने सीमावासियांना महामेळावा घेण्यासाठी अनेक अडचणी करूनही महामेळावा होत होता. परंतु गेल्या दोन वर्षांपासून कर्नाटकने सीमावासियांचा आवाज दाबण्यासाठी व महामेळावा होऊ नये यासाठी अडचणी निर्माण करत आहे.

Advertisement

महामेळाव्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. परंतु अद्याप दखल न घेता महामेळावा होऊ नये यासाठीच आपला रेटा पुढे चालवला आहे. पोलीस खाते व जिल्हा प्रशासनाचे कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही. म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी महामेळावा यशस्वी करण्यासाठी तयारीत राहिले पाहिजे, असे आवाहन केले. यावेळी आर. एम. चौगुले म्हणाले, म. ए. समिती व सीमावासीय लोकशाहीमार्गाने आंदोलन करीत आहेत. तेव्हा जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन सीमावासियांना महामेळावा घेण्यासाठी सहकार्य करावे. जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नाही तर कुठल्याही परिस्थितीमध्ये सीमावासियांनी महामेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे, असे आवाहन केले. यावेळी म. ए. समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर, आर. एम. चौगुले, लक्ष्मण होनगेकर, रामचंद्र मोदगेकर, अॅड. एम. जी. पाटील, मल्लाप्पा गुरव, आर. के. पाटील, बी. एस. पाटील, मनोहर हुंदरे, अनिल पाटील, राजू किणयेकर, लक्ष्मण पाटील, बाळासाहेब फगरे, मनोहर संताजी, शंकर कोनेरी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.