कारकिर्दीतील सर्वात ‘लो पॉईंट’ : रोहित शर्मा
वृत्तसंस्था/ मुंबई
भारताचा कर्णधार रोहित शर्माने रविवारी घरच्या मैदानावरील न्यूझीलंडविरुद्धच्या 0-3 अशा अभूतपूर्व व्हाईटवॉशचे आपल्या कारकिर्दीतील सवात ‘लो पॉईंट’ असे वर्णन केले आहे आणि कसोटी मालिकेतील पराभवाची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. रोहितने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, हा माझ्या कारकिर्दीतील अत्यंत खालचा टप्पा आणि मी त्याची संपूर्ण जबाबदारी घेतो.
घरच्या मैदानावर अशी कसोटी मालिका गमावणे सहज पचण्याजोगे नाही, असेही तो पुढे म्हणाला. मालिका, कसोटी सामना गमावणे हे कधीच सोपे नसते. ते सहज पचनी पडणारे नाही. आम्ही आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळलो नाही. न्यूझीलंडने संपूर्ण मालिकेत चांगला खेळ केला. आमच्याकडून खूप चुका झाल्या, असे रोहित सामन्यानंतरच्या समारंभात म्हणाला.
पहिल्या दोन कसोटीत आम्ही पहिल्या डावात पुरेशा धावा केल्या नाहीत. या सामन्यात आम्हाला 30 धावांची आघाडी मिळाली आणि लक्ष्य आवाक्यातील होते. एक संघ म्हणून आम्ही अयशस्वी झालो. जेव्हा तुम्ही लक्ष्याचा पाठलाग करत असता तेव्हा तुम्हाला धावा हव्या असतात. ते माझ्या मनात होते आणि ते घडले नाही, असे तो पुढे म्हणाला.
रोहितनेही स्वत:च्या कामगिरीवर निराश झाल्याचे मान्य केले. मी काही योजना घेऊन उतरतो आणि ते या मालिकेत साध्य करता आले नाही. या परिस्थितीत आम्ही आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळलो नाही आणि त्याचे परिणाम भोगत आहोत. कर्णधार म्हणून मी संघाचे नेतृत्व करण्यात तसेच फलंदाजीतही सर्वोत्तम नव्हतो, असे भारतीय कर्णधार म्हणाला.