जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाचे रुपडे पालटले
जुन्या इमारतीची दुरुस्ती, रंगरंगोटीसह नूतनीकरण
बेळगाव : क्लब रोड येथील जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाचे रुपडे पालटले जात आहे. मागील चार वर्षात गळतीमुळे सर्व थरातून टीका झाल्यानंतर मागील सहा महिन्यांपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ब्रिटिशकालीन इमारतीला धक्का न पोहोचविता इमारतीचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचे केंद्र असलेल्या जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाची इमारत जीर्ण झाली होती. दोन वर्षांपूर्वी छताला गळती लागल्यामुळे पावसाचे पाणी थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर पडत होते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात छत्री घेऊन कामकाज करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामुळे शिक्षण विभागावर टीकेची झोड उठवण्यात आली होती.
त्यावेळी जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे यांनी कार्यालयाची पाहणी करून कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाची इमारत ही ब्रिटिशकालीन असल्याने त्या इमारतीच्या मुख्य गाभ्याला धक्का न पोहोचवता नूतनीकरण करण्यात आले. फरशी बसविणे, भिंतीचे रंगकाम, छताची दुरुस्ती, फर्निचर इत्यादी कामे केली जात आहेत. त्याचबरोबर कार्यालयाच्या समोरील जीर्ण झालेली खोली हटवून त्या जागेचाही वापर केला जात आहे. या नूतनीकरणामुळे कार्यालयाचे रुपडे बदलण्यात येत आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांची या ठिकाणी नियमित ये-जा असते. सरकारी, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित शाळांचे शिक्षक, संस्थाचालक या ठिकाणी ये-जा करत असल्यामुळे कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. अजून काही दिवस नूतनीकरणाचे काम सुरू राहण्याची शक्यता आहे.