सर्वात लांब सायकल
इंजिनियर्सच्या कामगिरीचा नमुना पाहून व्हाल दंग
तुम्ही आतापर्यंत अनेक प्रकारच्या सायकल्स पाहिल्या असतील, परंतु जगातील सर्वात लांब सायकलविषयी ऐकले नसेल. ही सायकल 180 फूट, 11 इंच लांब असून ती ती लोकांसमोर सादर करण्यात आली आहे. या सायकलच्या नावावर आता जगातील सर्वात लांब सायकलचा विश्वविक्रम नोंद झाला आहे. या आश्चर्यजनक कामगिरीचे श्रेय नेदरलँडच्या 8 इंजिनियर्सना दिले जाते, ज्यांनी याची कल्पना सत्यात उतरवून दाखविली आहे.
180 फूट 11 इंच लांब या सायकलने 2020 मध्ये ऑस्ट्रेलियात बर्नी रयान यांच्याकडून निर्मित सायकलचा मागील विक्रम मोडीत काढला आहे. त्यांची सायकल 155 फूट 8 इंच लांबीची होती. हा विक्रम मोडीत काढत ही सायकल केवळ देखाव्यासाठी निर्माण करण्यात आलेली नाही, तर यावरून प्रवासही केला जाऊ शकतो. परंतु तुम्ही या सायकलवरून शहरात फिरत स्वत:ची कामे करू शकणार नाहीत. कारण ही सायकल चालविण्यासाठी तुम्हाला फार मोठ्या जागेची गरज भासणार आहे.
बालपणीचे स्वप्न पूर्ण
गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार ही सायकल निर्माण करणाऱ्या टीमचे नेतृत्व 39 वर्षीय इवान शल्क यांनी केले आहे. शल्क हे बालपणापासून अशाप्रकारची एक विशाल सायकल निर्माण करू इच्छित होते. त्यांनी 2018 मध्ये या प्रकल्पावर काम सुरू केले होते. यानंतर ते स्वत:च्या गावी ‘प्रिंसेनबीक’ येथे गेले आणि तेथे त्यांनी स्वत:ची टीम तयार केली. त्यांनी स्वत:चे सत्य सत्यात उतरल्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मी या कल्पनेविषयी अनेक वर्षांपासून विचार करत होतो. मला एकदा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे एक पुस्तक मिळाले होते, ज्यात या विक्रमासंबंधी माहिती मिळाली. मग माझ्या मनात काहीतरी असेच करण्याचा विचार आल्याचे शल्क यांनी सांगितले आहे.
यापूर्वीचे विक्रम
लांब सायकलचे विश्वविक्रम वेळोवेळी मोडीत निघत राहिले आहेत. मागील 60 वर्षांमध्ये हा विक्रम अनेकदा नव्याने नोंदविला गेला आहे. पहिला विक्रम 1965 मध्ये जर्मनीच्या कोलोनमध्ये निर्मित सायकलच्या नावावर झाला होता. ही सायकल 8 मीटर लांब होती. तर त्यानंतर न्यूझीलंड, इटली, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँडच्या दोन टीम्ससोबत अनेक देशांच्या लोकांनी हा विक्रम नोंदविला होता. भविष्यात 180 फूट लांबीच्या सायकलचा विक्रमही मोडीत निघणे शक्य आहे.