जीवन गौरव एका वादकाचा आणि सुरांचा...
प्रकाश साळोखे या सॅक्सोफोन वादकाला आज जीवन गौरव पुरस्कार
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
वेगवेगळ्या वाद्यांना एका सुरात, एका लयीत आणून संगीताचे नियोजन करणे हे संगीतकाराचे कौशल्य असते. त्याबद्दल त्याला गौरविलेही जाते. पण त्याच्या पाठीमागे जो पाच पन्नास वाद्यांचा वादकांचा ताफा असतो. त्यातल्या एखाद्याचा क्वचित कधीतरी कौतुकाने उल्लेख होतो. आणि ही कौतुकाची एक अनोखी संधी कोल्हापूरच्या प्रकाश साळोखे या वादकाच्या वाट्याला आली आहे. सॅक्सोफोन या वाद्यावर 53 वर्षे राज्य करणाऱ्या प्रकाश साळोखे या वादकाचा सोमवारी कोल्हापूरकरांच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. एका वादकाला प्रथमच इतका मोठा सन्मान लाभणार आहे.
सॅक्सोफोन या वाद्याचा उच्चार अवघड. ते हाताळणेही अवघड आणि वाजवणे तर त्याहून अधिक अवघड. पण कोल्हापूरच्या प्रकाश साळोखेंनी बँड वादनाच्या त्यांच्या पारंपरिक व्यवसायात सॅक्सोफोन आपल्या हातात घेतला. रस्त्यावर विविध घरगुती, सार्वजनिक कार्यक्रमात तो वाजवत त्यांच्या संगीताचा प्रवास सुरू झाला. आणि मान्यवर संगीतकारांच्या ताफ्यात त्यांचा समावेश होऊ लागला. त्याही पुढे जाऊन त्यांच्या वैयक्तिक सॅक्सोफोन वादनाचा कार्यक्रम तर वेगवेगळ्या सोहळ्याचे खास आकर्षण ठरू लागला. एरव्ही वयोमानानुसार प्रकाश साळोखेही थांबले असते. पण सॅक्सोफोनच्या सुरांनी त्यांना बळ दिले व आता वयाच्या 70 व्या वर्षांपर्यंत सॅक्सोफोनच्या सुरातच ते बांधले गेले.
त्यांच्या या सुराच्या प्रवासाची कोल्हापूरकरांनी वेगळी दखल घेतली. सोमवारी सायंकाळी सहा वाजता गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवलक्लबमध्ये त्यांना कोल्हापूरकरांच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. नितीन सोनटक्के व त्यांच्या सहकाऱ्यांनी याचे नियोजन केले. या सोहळ्याचे वैशिष्ट्या असे की प्रकाश साळुंखे यांचे नातू सोहम व त्यांची म्हणजेच आजोबा नातवांची सॅक्सोफोनची जुगलबंदी, डॉक्टर सचिन जगताप यांची बासरी व केदार गुळवणी यांचे व्हायोलिनचे सूर कोल्हापूरकरांना ऐकायला मिळणार आहेत.