मतदानावेळी चित्रीकरण केल्यास गुन्हे दाखल करणार
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत : स्थानिक पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात
कोल्हापूर :
विधानसभा निवडणूकीसाठी बुधवारी (दि. 20) होणारे मतदान होत आहे. यासाठी पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे सशस्त्र जवान सज्ज झाले आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान 8 हजार 157 पोलिस आणि जवानांचा खडा पहारा ठेवण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. नजर चुकवून मोबाईल नेवून मतदान केल्याचे चित्रीकरण केल्यास, संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी दिली.
विधानसभा निवडणूकीसाठी बुधवारी मतदान होत आहे. या दरम्यान जिह्यात कायदा सुव्यवस्था टिकविण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन केले आहे. पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे सशस्त्र जवान सज्ज झाले आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान 8 हजार 157 पोलिस आणि जवानांचा खडा पहारा ठेवण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर पोलिस, मुंबई, लोहमार्ग, तुरची प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर होमगार्ड, कर्नाटक होमगार्ड असा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. मतदारांना मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाता येणार नाही. पोलिस आणि मतदान कर्मचाऱ्यांची नजर चुकवून कोणी मोबाइलवर मतदानाचे व्हिडिओ केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती अधीक्षक पंडित यांनी दिली. लोकसभा निवडणुकीत असे प्रकार घडल्याने यावेळी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.
उपद्रवी केंद्रावर करडी नजर
जिह्यातील उपद्रवी केंद्रांची स्वतंत्र यादी केली आहे. विशेषत: कागल, कोल्हापूर दक्षिण, उत्तर, इचलकरंजी मतदार संघांवर पोलिसांनी करडी नजर आहे. काही ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवण्याचा धोका आहे. यातील काही उपद्रवी केंद्रांवर पोलिसांसह केंद्रीय सशस्त्र दलांचे जवान तैनात केले जाणार आहेत. यापूर्वी निवडणुकांमध्ये वाद, गोंधळ झालेल्या गावांमधील राजकीय नेते, राजकीय गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही अधीक्षक पंडित यांनी दिला आहे.
जिह्यातील पोलीस बंदोबस्त खालीलप्रमाणे
कोल्हापूर पोलिस - 2550
मुंबई, लोहमार्ग, तुरची प्रशिक्षण केंद्रातील पोलिस - 800
कोल्हापूर होमगार्ड - 447
कर्नाटक होमगार्ड - 3360
(बेळगाव, बागलकोट, हसन, कोलार, कारवार, बंगळुरू, म्हैसूर येथील होमगार्ड)
सीएपीएफ - 6 कंपन्या
एसएपी - 3 कंपन्या
एसआरपीएफ - 1 कंपनी
(प्रत्येक कंपनीत 100 जवान)