For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भक्ष्याच्या शोधात बिबट्या थेट येतोय दारात

06:22 AM Oct 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
भक्ष्याच्या शोधात बिबट्या थेट येतोय दारात
Advertisement

निसर्गसंपन्न आणि जैव विविधतेने नटलेल्या कोकणात अलीकडच्या काळात मानवी वस्तीमध्ये बिबट्यांचा वावर वाढत चालला असल्याने अनेक गावांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. काही ठिकाणी तर बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्ष टीपेला पोहोचल्याचे पहायला मिळाले आहे. यावर्षी मार्च महिन्यात स्व-संरक्षणार्थ बिबट्याला ठार करण्याची वेळ चिपळूण तालुक्यातील एका शेतकऱ्यावर आली होती. वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील हा वाढता संघर्ष अधिक तीव्र होऊ न देता तो नियंत्रणात आणण्याचे आव्हान आता वनविभागासमोर आहे. वनविभागाने त्यादृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पण वनविभागाच्या उपाययोजनांना लोकांची साथ पण तितकीच महत्त्वाची ठरणार आहे.

Advertisement

अभ्यासकांच्या मते, बिबट्या हा प्राणी स्वत:ला कुठेही ‘अॅडजेस्ट’ करतो. समुद्रकिनाऱ्याजवळच्या गावांमध्येही आता त्याचे वास्तव्य दिसू लागले आहे. त्याच्यासाठी कोकणातील जंगलात पुरेसे खाद्य नाही, असे नाही. रानडुक्कर, ससा व इतर प्राण्यांची संख्या भरपूर आहे. मात्र बिबट्याची शिकार करण्याची पद्धती, त्याच्यापासून असलेला धोका आणि त्याचे वास्तव्य याची चाहूल या प्राण्यांना लागत असल्याने त्याच्यापासून स्वत:चा बचाव करण्यात त्याचे भक्ष्य असलेले प्राणी पटाईत झाले आहेत. त्यामुळे जंगली प्राण्यांना शोधून पकडण्यात बिबट्याची दमछाक होते आहे. ही दमछाक टाळण्यासाठी बिबट्या आता रात्रीच्यावेळी जंगलालगतच्या मनुष्यवस्तीतील कुत्र्यांना लक्ष्य करू लागला आहे. गोठ्यातील पाळीव जनावरांवरही तो हल्ला चढवू लागला आहे. कारण हे भक्ष्य त्याला अगदी सहज मिळते आहे. रात्रीच्यावेळी मानवी वावर कमी झाल्यानंतर ते वस्त्यांमध्ये शिकारीसाठी येत असल्याचे या विषयातील अभ्यासकांचे निरीक्षण आहे. त्याचबरोबर रानडुक्कर, ससे आदी वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी रात्रीच्यावेळी जंगलात तळ ठोकणाऱ्या शिकाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे, हेदेखील वनविभागाला नाकारून चालणार नाही. शिकारीच्या साहित्यासह संशयास्पदरित्या वावरणाऱ्या व्यक्तींना वनविभागाने ताब्यात घेतल्याच्या घटना अधूनमधून समोर येत असतात. मात्र कारवाईचे हे प्रमाण शिकाऱ्यांच्या तुलनेत कमी असल्याचे निसर्गप्रमींचे म्हणणे आहे. रात्रीच्यावेळी जंगल भ्रमंतीसाठी जाणाऱ्या निसर्गप्रेमींना अनेकदा शिकाऱ्यांचा वावर दिसून येतो. पण वनविभागाच्या मर्यादांमुळे या सर्वच शिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. परिणामत: शिकाऱ्यांना रान मोकळे होत असल्याने बिबट्यासाख्या वन्यप्राण्यांना सहज भक्ष्य मिळवणे कठीण होऊन बसले आहे. म्हणूनच बिबटे कुत्र्यांच्या शोधार्थ मानवी वस्ती गाठत आहेत. वनविभागाने उपाययोजनांचा एक भाग म्हणून वन्यप्राण्यांची अवैध शिकार करणाऱ्या टोळ्यांचा अगोदर बंदोबस्त केला पाहिजे. प्राण्यांच्या अधिवासात शिरकाव करण्याबरोबरच आपण आता त्यांचे खाद्यही हिरावू लागलो तर वन्यप्राण्यांनी करायचे काय, हा एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतोच. जंगलांची बेसुमार तोड आणि चुकीच्या पद्धतीने झालेल्या विकासकामांमुळे वन्यप्राण्यांनी आपले हक्काचे जलस्त्राsत गमावले आहेत. मोठ्या प्रमाणात होत असलेली जंगलतोड, त्यामुळे उजाड झालेले डोंगर आणि उन्हाळ्यात लागणारे वणवे यामुळे जंगलात भक्ष्य मिळत नसल्याने बिबट्यासह अनेक वन्यप्राणी आता पोटासाठी मानवी वस्तीकडे वळत असल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट होत आहे. एकप्रकारे वन्यप्राण्यांचाही जगण्यासाठीचा संघर्ष सुरु झाला असल्याचे म्हणावे लागेल. म्हणूनच एरव्ही जंगलात पाळीव प्राण्यांवर हल्ले चढवणाऱ्या बिबट्यांचा दिवसेंदिवस भरवस्तीमध्ये वावर वाढत चालला आहे.

कोकणातील अनेक गावांमध्ये आज बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे भीतीचे वातावरण आहे. पण त्याचबरोबर भक्ष्याच्या शोधार्थ मानवी वस्त्यांच्या दिशेने जाणाऱ्या बिबट्यांच्या अपघाती मृत्यूच्या घटनाही वाढत चालल्या आहेत. रस्ता ओलांडताना वाहनांच्या धडकेत मृत पावणाऱ्या बिबट्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. वनविभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात 2022 ते 2024 या कालावधीत 33 बिबट्यांच्या मृत्यूंची नोंद आहे. तर दुसरीकडे विविध घटनांमध्ये अडकलेल्या 27 बिबट्यांची सुटका करण्याच्या मोहिमाही यशस्वी झाल्या आहेत. 2022 मध्ये 3, 2023 मध्ये 13 तर 2024 मध्ये 14 मृत बिबट्यांची नोंद झाली आहे. याचा अर्थ मृत बिबट्यांची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. 2025 मध्येही ती थांबलेली नाही. बिबट्यांची मृत्यूंची संख्या निश्चितच काळजीत टाकणारी असली तरी त्यापेक्षा काळजीची बाब म्हणजे मृत्यूची कारणे. निम्म्यापेक्षा अधिक मृत्यू हे नैसर्गिक नाहीत, ही चिंतेची गोष्ट आहे.

Advertisement

बिबट्यांचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यात फासकीत अडकलेल्या तसेच विहिरीत पडलेल्या बिबट्यांची नोंद लक्षणीय आहे. त्याचबरोबर अज्ञात वाहनांच्या धडकेत, विहिरीत कोसळल्याने तसेच उपासमारीमुळे बिबट्यांचे मृत्यू वाढत चालले आहेत. मध्यंतरी फासकीत अडकून मृत्यूमुखी पडणाऱ्या बिबट्यांची संख्या वाढल्यानंतर पोलीस आणि वनविभागाने फासकीविरोधात कडक धोरण अवलंबले. त्यामुळे त्यामध्ये घट दिसून येत असली तरी आता हळूहळू फासकी डोके वर काढत असल्याचे अधूनमधून घडत असलेल्या घटनांवरून स्पष्ट होत आहे. भक्ष्याचा पाठलाग करत असताना बरेच बिबटे उघड्या विहिरींमध्ये पडतात. तरी अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाने उघड्या विहिरींचा सर्वे करून त्या बंदिस्त करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. अशा प्रकारची मागणी आजवर सातत्याने होत आलेली आहे. मात्र त्यावर प्रभावी अंमलबजावणी झालेली दिसत नाही. मार्च महिन्यात चिपळूण तालुक्यातील तोंडली-वारेली येथे भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याने शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. यात 55 वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाला होता. बिबट्याच्या हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या शेतकऱ्याने अखेर स्व-संरक्षणार्थ भाल्याने प्रतिहल्ला करत त्या बिबट्याला ठार केले होते. 2011 मध्येही ओमळी-कांबळेवाडी येथेही अशाच प्रकारे बिबट्याने घरात घुसून महिलेसह तिघांवर प्राणघातक हल्ला केला होता. आठवडाभरापूर्वीच चिपळूण तालुक्यातील एका गावात भर दुपारी गवारेडा रस्त्यावर आडवा आल्याने मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला होता. या सर्व घटना सर्वांनाच विचार करायला लावणाऱ्या आहेत. कारण बिबट्या, गवारेडा आदी वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीलगत वावर वाढला आहे. त्यामुळे ‘वन्यप्राणी-मानव’ यांच्यातील भविष्यातील संघर्षाचा धोका टाळण्यासाठी वन विभाग आणि विविध सामाजिक संस्थांकडून काही उपक्रम राबविण्याची गरज वाढू लागली आहे. अशा उपक्रमांना लोकसहभागही महत्त्वाचा ठरणार आहे.

महेंद्र पराडकर

Advertisement
Tags :

.