महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुक्त अर्थव्यवस्थेचा ‘सरदार’ हरपला

06:59 AM Dec 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन : दिल्ली एम्समध्ये अखेरचा श्वास : देश महान अर्थतज्ञाला मुकल्याची भावना

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गुरुवारी रात्री आठच्या सुमारास दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले होते. 92 वर्षीय मनमोहन सिंग यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत. मुक्त अर्थव्यवस्थेचा ‘सरदार’ हरपल्याची भावना देशभरातून व्यक्त होत आहे.

डॉ. मनमोहन सिंग हे दोनवेळा देशाचे पंतप्रधान झाले होते. त्यांना अनेक दिवसांपासून आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत होता. याआधीही प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवार, 26 डिसेंबरला पुन्हा त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना एम्सच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना एम्समध्ये नेण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती उपचारांना साथ देऊ शकली नाही. काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांनी ट्विट करत त्यांच्या निधनाची माहिती दिली. तसेच एम्सच्या डॉक्टरांनीही त्यांच्या प्रकृतीसंबंधीची माहिती जारी करत निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पश्चात पत्नी श्रीमती गुरशरण कौर यांना तीन मुली आहेत.

काँग्रेस नेत्यांची इस्पितळात धाव

डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार प्रियांका गांधी यांनी ‘एम्स’मध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच कर्नाटकातील बेळगाव येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठक आणि अधिवेशन शताब्दी सोहळा आयोजित केल्यामुळे बडे नेते गुरुवारी बेळगावमध्ये होते. या नेत्यांपैकी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी गुरुवारी रात्रीच बेळगावमधून दिल्लीला रवाना झाले होते.

डॉ. मनमोहन सिंग 2004 ते 2014 पर्यंत भारताचे पंतप्रधान होते. त्यापूर्वी ते भारताचे अर्थमंत्री आणि वित्त सचिवही होते. नरसिंह राव यांच्या सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणात त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे मानले जाते. ते त्यांच्या नम्रता, कठोर परिश्रम आणि कामाप्रती बांधिलकी यासाठी ओळखले जातात.

अर्थशास्त्राचे ‘पंडित’

डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अविभाजित भारतातील पंजाब प्रांतातील एका गावात झाला. 1948 मध्ये पंजाब विद्यापीठातून त्यांनी मॅट्रिक पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठातून घेतले. 1957 मध्ये त्यांनी अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी सन्मान पदवी प्राप्त केली. त्यानंतर 1962 मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या न्यूफिल्ड कॉलेजमधून अर्थशास्त्रात डी.फिल केले. मनमोहन सिंग 1971 मध्ये वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले. 1972 मध्ये त्यांची अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. अर्थ मंत्रालयाचे सचिव डॉ. नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी यशस्वीपणे कर्तव्य बजावले होते. मनमोहन सिंग 1991 ते 1996 पर्यंत भारताचे अर्थमंत्री होते. देशाच्या आर्थिक जडणघडणीसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा होता.

अनेक सन्मान प्राप्त

डॉ. मनमोहन सिंग यांना अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे. यापैकी महत्त्वाचे म्हणजे भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण (1987), भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार (1995), आशिया मनी अवॉर्ड फॉर फायनान्स मिनिस्टर ऑफ द इयर (1993 आणि 1994), युरो मनी पुरस्कार (1993), केंब्रिज विद्यापीठाचा अॅडम स्मिथ पुरस्कार (1956), सेंट जॉन्स कॉलेज केंब्रिज येथील विशिष्ट कामगिरीसाठी राइट पुरस्कार (1955) आदी सन्मानांनी त्यांना गौरवित करण्यात आले होते.

डॉ. मनमोहन सिंग यांची कारकीर्द

- डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानमधील गाह या गावी

- 1947 साली फाळणीदरम्यान विस्थापित होऊन सिंग कुटुंब भारतात आले.

- पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. डॉ. मनमोहन सिंग यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी घेतली.

- 1966 ते 1969 या काळात मनमोहन सिंग यांनी संयुक्त राष्ट्रात काम

नंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू

-1972 ते 1976 मध्ये भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार

-1982 ते 1985 या काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर

- 1985 ते 1987 या काळात नियोजन आयोगाचे अध्यक्ष

- 1996 साली मनमोहन सिंग हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते.

- 2004 साली यूपीएची सत्ता आल्यानंतर 13 वे पंतप्रधान म्हणून शपथ.

- 2004 ते 2014 या काळात दोनवेळा पंतप्रधान म्हणून पदभार

- एप्रिल 2024 साली त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली.

 आर्थिक संकटात अर्थमंत्रिपदी

वर्ष 1991 सालाच्या आर्थिक संकटकाळी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडून मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रिपदी निवड. अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करण्यात आले. भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली.

पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली

भारत आपल्या सर्वात प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहे. सर्वसामान्य वर्गातून पुढे आलेले मनमोहन सिंग एक प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ बनले. त्यांनी अर्थमंत्र्यांसह अनेक पदांवर काम केले. आमच्या आर्थिक धोरणावर वर्षानुवर्षे खोल छाप सोडली. संसदेतील त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी पंतप्रधान म्हणून त्यांनी लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले. त्यांची बुद्धिमत्ता आणि नम्रता अद्वितीय होती. या दु:खद प्रसंगी डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या मित्रांना आणि असंख्य चाहत्यांसाठी मी संवेदना व्यक्त करतो. ओम शांती’

मी माझ्या गुरुला मुकलो : राहुल गांधी

मनमोहन सिंग यांनी अफाट शहाणपण आणि सचोटीने भारताचे नेतृत्व केले. त्यांची नम्रता आणि अर्थशास्त्राची सखोल जाण यातून राष्ट्राला प्रेरणा मिळाली. श्रीमती कौर आणि कुटुंबियांना माझ्या मन:पूर्वक संवेदना. मी एक मार्गदर्शक आणि गुरु गमावला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व देशवासीय अत्यंत अभिमानाने आठवतील.

 

देशाच्या वाटचालीत मोठे योगदान : राजनाथ सिंह

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने खूप दु:ख झाले. कठीण काळात भारताच्या अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांची सेवा आणि बुद्धी यासाठी त्यांचा सर्वत्र आदर होता. भारताच्या प्रगतीत त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीय आणि निकटवर्तियांप्रति माझ्या मन:पूर्वक संवेदना. ओम शांती!

 

डॉ. मनमोहन सिंगजी, इतिहास तुम्हाला दयाळूपणे न्याय देईल!

माजी पंतप्रधानांच्या निधनाने भारताने एक दूरदर्शी राजकारणी, अभेद्य सचोटीचा नेता आणि अतुलनीय उंचीचा अर्थतज्ञ गमावला आहे. त्यांच्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाने आणि अधिकारांवर आधारित कल्याणकारी प्रतिमानाने कोट्यावधी भारतीयांच्या जीवनात खोलवर बदल घडवून आणला. त्यांच्या त्यांच्या मंत्रिमंडळाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे.

सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राष्ट्रीय पातळीवर सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून रात्री उशिराने यासंबंधीची घोषणा करण्यात आली. केंद्र सरकारसोबतच कर्नाटक सरकारनेही सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्रीय दुखवट्याच्या काळात सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध राहतात.

 

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article