पृथ्वीवरचा शेवटचा मार्ग
कोणताही मार्ग म्हटला, की त्याला शेवट हा असतोच, हे आपल्याला माहीत आहे. मात्र, आपली पृथ्वी गोलाकार, अर्थात चेंडूसारखी आहे. त्यामुळे तिचा प्रारंभ कोठून होतो आणि शेवटचे टोक कोणते, हे सांगता येत नाही. किंबहुना कोणत्याही गोल वस्तूला प्रारंभीचे आणि शेवटचे टोक नसतेच. पण मार्गांचे तसे नसते. त्यांना प्रारंभ आणि अंत असतोच. पृथ्वीवरच्या प्रत्येक देशात अनेक महामार्ग, मार्ग, सडका इत्यादी असतातच. पण या सर्व मार्गांमधला सर्वात शेवटचा मार्ग कोणता, यासंबंधी आपल्या मनात काहीवेळा प्रश्न निर्माण झाला असण्याची शक्यता आहे.
असा एक मार्ग आहे खरा. तो उत्तर ध्रूवाजवळच्या नॉर्वे या देशात आहे. त्याचा क्रमांक ‘ई-69’ असून तो महामार्ग आहे. तोच जगातला सर्वात शेवटचा मार्ग मानला जातो. तसा तो मानला जातो, कारण त्या मार्गाच्या शेवटच्या टोकानंतर कोणताही मार्ग नाही आणि मानवाला वस्ती करण्यायोग्य असे कोणते स्थानही नाही. पश्चिम युरोपचे उत्तरेकडचे शेवटचे टोक म्हणजे हा देश आहे. याच देशातला हा शेवटचा मार्ग जगातील शेवटचा मार्ग मानण्याची प्रथा आहे.
मात्र, या मार्गावरुन एकट्याने प्रवास करण्यास अनुमती नाही. तसेच हा मार्ग उंचसखल प्रदेशांमधून जातो. त्यामुळे या मार्गात पाच बोगदे आहेत. हा अतिथंड प्रेशातील मार्ग असून त्याच्या निर्मितीकार्याचा प्रारंभ 1930 मध्ये झाला. या मार्गावर वर्षाचे सहा महिने सूर्यदर्शन होत नाही. सध्या त्याचा उपयोग एक पर्यटनस्थळ म्हणून होत आहे. तसेच, तो हिंवाळ्यातील सहा महिने सुरु नसतो. या मार्गावरुन जाण्यासाठी नव्हे, तर तो मार्गच पाहण्यासाठी सहस्रावधी पर्यटक प्रतिवर्ष येतात.