शेवटचा श्रावण सोमवार भक्तिभावाने साजरा
शिवालयांमध्ये घुमला महादेवाचा जयघोष : पूजा-अर्चा-महाप्रसाद वितरण
बेळगाव : शहर परिसरात शेवटचा श्रावण सोमवार भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शिवमंदिरांतून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळपासून पूजा-अर्चा, अभिषेक, आरती, तीर्थप्रसाद, पालखी प्रदक्षिणा आणि महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. याबरोबरच मंदिरांतून फळा- फुलांची आरास करण्यात आली होती. विशेषत: सोमवाराने सुरुवात झालेल्या श्रावणाची उत्साहात सांगता झाली.
शहरातील कपिलेश्वर मंदिर
कॅम्प मिलिटरी महादेव मंदिर, बिस्कीट महादेव मंदिर, वडगाव शिवमंदिर, विजयनगर शिवमंदिर, हिंडलगा कलमेश्वर मंदिर यासह इतर मंदिरांतून शेवटचा श्रावण सोमवार विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. हर हर महादेवाच्या गजरात शिवमंदिरे दुमदुमून गेली. वडगाव येथील शिवमंदिरात शेवटच्या सोमवारनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. मंदिरात विविध फळांची आरास करून आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. तसेच सकाळपासून भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
पाईपलाईन रोड, विजयनगर येथील शिव मंदिरात शेवटच्या सोमवारनिमित्त सकाळपासून विविध धार्मिक विधी पार पडले. पहाटे रुद्राभिषेक, पूजा, महाआरती झाली. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. भाविकांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घेतला.
कपिलेश्वर मंदिरात शिवतांडव
शेवटच्या सोमवारनिमित्त कपिलेश्वर मंदिरात शिवतांडव स्तोत्र-संगीत कार्यक्रम भक्तिभावाने उत्साहात पार पडला. यावेळी महिलांनी शिवतांडव स्तोत्र पठण केले. याबरोबरच शिवशंभोवर आधारित संगीताचा कार्यक्रम झाला. मंदिरात रात्री प्रदक्षिणा व महाआरती झाली. दर्शनासाठी मंदिरात सकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती. सायंकाळी भर पावसातही भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. या प्रसंगी कपिलेश्वर महादेव ट्रस्ट व पदाधिकारी व भक्त उपस्थित होते.