दुलीप ट्रॉफी स्पर्धेची शेवटची फेरी आजपासून
श्रेयस अय्यरवर दडपण, संजू सॅमसन, रियान पराग, रिंकू सिंग यांच्या कामगिरीवर लक्ष
वृत्तसंस्था/ अनंतपूर
श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, रियान पराग, रिंकू सिंग यासारख्या खेळाडूंना रेडबॉल क्रिकेटमधील आपली क्षमता दाखवून देण्याची आणखी एक संधी आजपासून मिळणार असून दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील शेवटच्या फेरीतील सामन्यात हे खेळाडू विविध संघातून खेळताना दिसतील.
मोसमातील या पहिल्या स्पर्धेसाठी बाद फेरी ठेवण्यात आलेली नसल्याने सर्वाधिक गुण मिळविणारा संघ विजेता ठरणार आहे. भारत क ने दोन सामन्यांत 9 गुण मिळवित गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर आहे. इंडिया ब ने 7 गुणांसह दुसरे, इंडिया अ 6 गुणांसह तिसरे स्थान मिळविले आहे तर इंडिया ड संघाला अद्याप गुणांचे खाते खोलता आलेले नाही. अग्रस्थानावर असणाऱ्या इंडिया क संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करीत असून गुरुवारपासून त्यांची लढत मयांक अगरवालच्या इंडिया अ संघाविरुद्ध आणि अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखालील इंडिया ब संघाची लढत इंडिया ड विरुद्ध होत आहे. इंडिया ड संघाला एकही गुण मिळविता आलेला नसल्याने या संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर खूपच दडपणाखाली आहे. याशिवाय बीसीसीआयने त्याला चमक न दाखविल्यास राष्ट्रीय संघात स्थान मिळणार नसल्याचे स्पष्ट केले असल्याने त्याच्यावरील दबाव आणखी वाढला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी श्रेयसकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर त्याला आपली बाजू मैदानावर मांडण्याची चांगली संधी मिळाली होती. पण आतापर्यंत सामन्यांत त्याला फारशी चमक दाखविता आलेली नाही. त्यामुळे चांगली कामगिरी करून संघातील इतर खेळाडूंना प्रेरित करण्याचे काम करावे लागेल.
इंडिया ड संघातील फलंदाज संजू सॅमसन व वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांच्या कामगिरीवरही निवड समितीचे लक्ष असेल. भारत ब कँपमध्ये रिंकू सिंग मोठी खेळी करण्याचा प्रयत्न करेल, आधीच्या सामन्यात त्याला फारशा धावा काढता आल्या नव्हत्या. भारत अ व भारत क यांच्यातील लढतीत निवड सदस्यांना मयांक अगरवाल, रियान पराग व साई सुदर्शन यांच्याकडून धावांची अपेक्षा आहे. परागने आतापर्यंत आत्मविश्वासपूर्ण प्रदर्शन केले असेल तरी त्याला खेळपट्टीवर दीर्घ काळ टिकत मोठी खेळी करून दाखवण्याची गरज आहे.
वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने आधीच्या सामन्यात दुखापतीनंतर पुनरागमन केले होते. तोदेखील प्रभावी प्रदर्शन करण्यासाठी प्रयत्नशील राहील तर शम्स मुलानी अनुकूल खेळपट्टीवर आणखी एक मॅचविनिंग कामगिरी करून दाखविण्यास उत्सुक राहील. रेडबॉल क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर इशान किशनने शानदार शतक नोंदवत पुनरागमन जोरात साजरे केले. निवड समितीचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्याला आणखी एक मोठी खेळी करण्याची गरज असेल.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेची शेवटची फेरी
भारत अ वि. भारत क
भारत ड वि. भारत ब