जगातील सर्वात मोठा ससा
श्वानाइतका असतो या प्रजातीचा आकार
ससा हा अत्यंत गोंडस प्राणी असल्याने लोक घरांमध्ये त्याला पाळीव प्राण्याप्रमाणे वागवू लागले आहेत. सशाचा लहान आकार, त्याचा गुबगुबीतपणा पाहून लोक त्याला हातांमध्ये घेत प्रेमाचा वर्षाव करत असतात. अत्यंत हलके आणि छोटे असल्याने सहजपणे घरात सामावले जाऊ शकतात. परंतु जर तुमच्या मनात सशाबद्दल अशीच प्रतिमा असेल तर निश्चितच तुम्हाला बेल्जियमधील सशाच्या एका प्रजातीबद्दल कल्पना नसणार. या प्रजातीचा ससा जगातील सर्वात मोठा ससा मानला जातो.
फ्लेमिश जायंड या प्रजातीचे हे ससे असतात. बेल्जियमच्या फ्लेमिश जायंट प्रजातीच्या सशांना पाळले जाते. या सशांचा आकार एखाद्या श्वानाइतका असतो. जर तुम्ही एखादा श्वान आणि या प्रजातीचा ससा पाहिल्यास यात फरक करणे अत्यंत अवघड ठरते.
22 किलोपर्यंत असते वजन
अनेक वर्षांपासून या प्रजातीच्या सशांना त्यांचे फर आणि मांसासाठी पाळले जाते. अन्य प्रजातीच्या सशांच्या तुलनेत हे ससे खूपच शांत स्वभावाचे असते. या सशांची उत्तम देखभाल केल्यास ते सर्वात चांगले पाळीव प्राणी ठरू शकतात. यांचे वजन खूपच अधिक असते. फ्लेमिश जायंट सशाचे वजन 10 किलोपर्यंत असते. परंतु काही सशांचे वजन 22 किलोपर्यंत होऊ शकते. तसेच या सशांची उंची 4 फूटांपर्यंत असते. याचमुळे या प्रजातीला सशांचा राजा म्हटले जाते.
अत्यंत मैत्रिपूर्ण
या सशांचा आहार हा अन्य आणि छोटय़ा सशांच्या तुलनेत अधिक असतो. या प्रजातीचे ससे 16 व्या शतकापासून आढळत आहेत. बेल्जियन स्टोन रॅबिटद्वारे हे विकसित झाल्याचे मानले जाते. 1910 पर्यंत या प्राण्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर फारच कमी ओळख मिळाली होती, परंतु त्यानंतर जगभरात या प्रजातीचे नाव पोहोचले आहे. या प्रजातीचे ससे लहान मुलांसोबत सहजपणे ऍडजस्ट होत असल्याचा दावा केला जातो.